नांदेडमधील या गावात २० वर्षांपासून सरपंचच नाही

 




नांदेडमधील या गावात २० वर्षांपासून सरपंचच नाही

नांदेडः राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून या निवडणुकीचा प्रचार सुरू होता. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. मात्र महाराष्ट्रात एक गाव आहे तिथे मागील २० वर्षांपासून एकदाही ग्रामपंचायतची निवडणूक झाली नाही. (Gram Panchayat Election 2022 Voting Live)
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील वसराम नाईक तांडा या गावाला मागील २० वर्षांपासून सरपंच नाहीये. तर मागील १० वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. त्यामुळे या गावाचा विकास खुंटला आहे. १९०० नागरिकांची वस्ती असलेल्या या गावात केवळ बंजारा समाजातील लोक राहतात. इतर जातीचे व समाजाचे एक ही घर या गावात नाहीय. मागील २० वर्षांपासून दर पंचवार्षिक निवडणुकीत या गावचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सुटत आहे. त्यामुळे या गावाने मागील २० वर्षांपासून सरपंचच पाहिला नाही.

२० वर्षांपासून या गावावर प्रशासक राज आहे. त्यामुळे या गावाचा विकास झाला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आज १८ डिसेंबर रोजी अनेक ग्रामपंचायतिच्या निवडणूक होत आहेत. पण सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने या गावात या प्रवर्गाचा एक ही व्यक्ती नसल्याने गावात निवडणूक लागली नाही. ज्या गावात बंजारा समाजाव्यतिरिक्त इतर कुठल्याही समाजाचे नागरिक नाहीत अशा गावच्या सरपंचपदाचे आरक्षण हे इतर जातीसाठी राखीव करणे हे चुकीचे आहे. बंजारा जातीसाठीचे आरक्षण आरक्षित करता यावं, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. पण प्रशासनाने मात्र या प्रकारावर आज पर्यंत डोळेझाक केली आहे. सर्वत्र निवडणूक होत असताना या गावात मात्र ग्रामपंचायतची निवडणूक होत नसल्याचे चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post