Corona : चीनमधील कोरोना लाटेबाबत अखेर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग बोलले; लाट मान्य करत म्हणाले...
नवी दिल्ली - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शनिवारी नवीन वर्षानिमित्त आपल्या देशातील कोरोनाग्रस्त नागरिकांना संबोधित केले. चीनमधील कोव्हिड लाटेने पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे आणि त्याचा सामना करणे हे एक कठीण आव्हान आहे हे त्यांनी मान्य केले. "असामान्य प्रयत्नांनी आम्ही अभूतपूर्व अडचणी आणि आव्हानांवर मात केली आहे. हा प्रवास सोपा नव्हता, असंही ते म्हणाले. (xi jinping news in Marathi)
गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा जिनपिंग यांनी देशातील कोविड परिस्थितीवर लोकांना संबोधित केले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) वारंवार आवाहन केल्यानंतर चीनने शुक्रवारी आपल्या अधिकाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांशी बोलण्याची परवानगी दिली.
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले की, अधिकारी, जनता, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी कोरोनाशी लढण्याचा दृढ निश्चय केला आहे. साथीचे रोग रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. यासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत. आशेचा किरण आपल्यासमोर दिसत आहे. आपण यावर मात करण्याचा आणखी एक प्रयत्न करूया कारण चिकाटी आणि एकात्मतेने विजय मिळतोच, असंही जिनपिंग म्हणाले.
ते पुढं म्हणाले की, कोरोना आल्यापासून आम्ही लोकांच्या जीवाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. विज्ञान-आधारित दृष्टिकोनाचे अनुसरण करून, आम्ही कोव्हिडविरूद्ध लोकांच्या जीविताचे आणि आरोग्याचे जास्तीत जास्त प्रमाणात संरक्षण करण्यासाठी कठोर आणि आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, 2022 मध्ये आपण भूकंप, पूर, दुष्काळ आणि जंगलातील आगीसह अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले आहे. आम्हाला कामाच्या ठिकाणी अपघातांना सामोरे जावे लागले. या सगळ्याच्या दरम्यान त्रासाला सामोरं जाण्यासाठी आम्ही एकत्रच राहिलो. संकटात सापडलेल्या इतरांना मदत करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुतीही दिली.