भाजपला मोठा धक्का! 2024 मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार ?
सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. आज तक आणि सी वोटर यांनी जानेवारीमध्ये 'मूड ऑफ द नेशन' अंतर्गत राजकीय सर्वे घेतला होता. सध्याच्या घडीला निवडणूक झाली काय निकाल लागू शकतो, यावर सर्वे घेण्यात आला होता. यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 298 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 153 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 92 जागांवर समाधान मानावे लागेल, असं सर्वेतून समोर आलेय.
भाजपला का धक्का ?
सहा महिन्यापूर्वी (ऑगस्ट 2022 ) सी वोटरनं घेतलेल्या सर्वेत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 307 जागा मिळतील असा अंदाज होता. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 125 जागांची शक्यता होती. त्याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष असे 111 जागांचा अंदाज होता. पण जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेत भाजपच्या जागांमध्ये 9 जागांची घरसरण झाल्याचं दिसून आले. तर यूपीएच्या जागांमध्ये 28 ने वाढ जाल्याचं समोर आलेय. त्यावरुन काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसतेय तर भाजपला फटका बसल्याचं दिसेतय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा झाल्याचं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलेय.
मतांची टक्केवारी काय?
सी वोटरच्या ऑगस्ट 2022 मधील सर्वेनुसार यूपीएची मताची टक्केवारी 28 टक्के होती, ती जानेवारी 2023 मध्ये 29 टक्के झाली आहे. काँग्रेसच्या मतामध्ये एक टक्के वाढ झाल्याचे दिसतेय. तर भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये भाजपला 41 टक्के मते मिळण्याची शक्यता होती तर जानेवारी 2023 मध्ये त्यांना 43 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. भाजपच्या मतांमध्ये दोन टक्के वाढ झाल्याचं सर्वेतून समोर आलेय.