प्रियकराने चक्क प्रेयसीच्या मुलाचं अपहरण केलं
उस्मानाबाद : प्रेयसीचे लाड पुरवता पुरवता प्रियकर कर्जबाजारी झाला. मात्र जिच्यासाठी भले मोठ्ठे कर्ज घेतले, तिनेच प्रियकराला वाऱ्यावर सोडले. याचा राग मनात धरुन प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी प्रियकराने चक्क प्रेयसीच्या मुलाचं अपहरण केलं. हा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील काडगाव येथे घडला आहे.
सोलापूर येथील महिला व मोहोळ तालुक्यातील किरण लादे यांची २०२० मध्ये शेअर चॅटवर ओळख झाली, नंतर त्यांची मैत्री झाली. २०२० मध्ये घरात तक्रार झाल्यामुळे महिलेने किरण लादेकडे मदत मागितली. आरोपी किरण लादे आणि महिला सांगली येथे रहायला गेले. तिथे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे कोल्हापूर, पुणे येथे २०२२ पर्यंत एकत्र राहिले. या दरम्यान किरण लादे याने महिलेचे लाड पुरवण्यासाठी कर्ज घेतले होते.
आठ दिवसांपूर्वी संबंधित महिला सोलापूर येथे पतीकडे रहायला आली. पुतणीच्या लग्नासाठी मुलासह ती उस्मानाबाद जिल्ह्यातील काडगाव येथे आली होती.
३१ जानेवारी रोजी किरण लादे याने त्याच्या दोन साथीदारांना घेऊन काडगाव गाठले. २ लाखांसाठी त्याने प्रेयसीच्या चिमुकल्याचे अपहरण केले. महिलेकडे मुलाच्या सुटकेसाठी त्याने २ लाख रुपयाची मागणी केली.
महिलेने नळदुर्ग पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपासाची सूत्रे जलद गतीने फिरवली. कोल्हापूर येथून अपहरणग्रस्त मुलगा, आरोपी किरण लादे आणि त्याचे दोन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले.
कोर्टासमोर आरोपीला हजर करताच न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर गोरे हे आरोपीला पकडण्यात यशस्वी झाले आहेत.