👀 ठाकरेंना निवडणूक आयोगाचा अजून एक धक्का :
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला. त्यानंतर आता निवडणूक आयोगानेही धक्क्यामागून धक्के देणे सुरू केले आहे. त्यात पहिला धक्का शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन दिला. तर आता दुसरा धक्का म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपुरतेच वापरता येणार आहे. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
⚡ मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन :
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसेनेचे धनुष्यबाण चोरीला गेले आहेत. त्या चोराला आम्ही पकडले आहे. त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला आव्हान देतो की तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुकीत समोर या. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येऊ. शनिवारी दुपारी मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला आव्हान दिले.
😎 प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, म्हणाले... :
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाकडे दिले आहे. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का?, हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
🗣️ संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल :
पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून कुत्रा मालक होत नाही आणि मालक भिकारी होत नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यावरुन आज कणकवली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट तसेच नारायण राणेंवरही घणाघाती टीका केली.
💁♂️ राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ :
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली आहे. राजभवनमधील दरबार हॉलमध्ये शनिवारी (दि.18) हा शपथविधी सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.