दिवसभरातील ताज्या घडामोडी
⚖️ निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे सुप्रीम कोर्टात :
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण शिंदे गटाला कायमस्वरुपी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेद्वारे उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष पुन्हा मिळवण्यासाठी अखेरची झुंज देत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देणार?, हे फार महत्त्वाचे ठरणार आहे.
👍 शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंना दिलासा :
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करत महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा दिलासा दिला आहे.
📱 पंकजा मुंडे यांचा उद्धव ठाकरेंना फोन :
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी एक सामान्य कार्यकर्ता नेतृत्व करू शकतो, हे दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
🚨 राऊतांविरोधात नाशिक, ठाण्यात गुन्हा दाखल :
संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाण्यातही राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
💐 नीलम गोऱ्हे यांना मातृशोक :
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचं निधन झालं आहे. त्या 87 वर्षांच्या होत्या. सिल्वररॉक्स, हरेकृष्ण मंदिर पथ मॉडेल कॉलनी पुणे, येथे आज दुपारी अडीच ते साडेचारच्या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.