भीषण अपघातात तिघांचा जीव गेला
रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मार्गावर मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अभ्यासाचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे दाखल झालेत. पेण खोपोली मार्गावरील हेटवणे कॉलनी नजीक इको कार आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ईकोमधील ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली, असून ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. विक्रम गोविंद दिंडे (वय ५०), नागेश विक्रम दिंडे (वय २६), प्राजक्ता नागेश दिंडे (वय २४) अशी मृतांची नावं आहेत. या अपघातातील मृत्यू झालेले कुटुंब कोल्हापूर येथील एका मंदिरात दर्शनाला जात होते. कोल्हापूर येथे बाळूमामाच्या यात्रेसाठी हे कुटुंब निघाले होते.
पेण तालुक्यातील सावरसई येथून इको गाडीने सात जण खोपोलीच्या दिशेला जात असताना अतिवेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात इको गाडीने समोरून येणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक बसली. यामुळे हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या झालेल्या अपघातात तीन प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चार जखमींपैकी दोन जणांना पेण येथील हॉस्पिटलमध्ये तर दोन जणांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अपघातग्रस्तांना देवदूत ठरलेले कल्पेश ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह पेण पोलिस घटनास्थळी हजार होऊन अधिक तपास करत आहेत.
Tags
महाराष्ट्र