रक्तदान शिबिराचं आयोजन करुन मुस्लिम मावळ्यांकडून शिवजयंती साजरी
कोपरगाव (अहमदनगर) : शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) राज्यासह देशभरात शिवप्रेमींकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त मुस्लिम तरुणांनी सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजित केलं होतं. शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे सेवा फाऊंडेशनचे हे सलग चौथे वर्ष आहे. कोरोना काळात देखील सेवा फाऊंडेशनने रक्तदान शिबिर आयोजित केल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे कोपरगावात सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडले असून नागरिकांकडून या मुस्लिम मावळ्यांचं कौतुक होत आहे.
यदि करनी हो मानवसेवा, रक्तदान हैं उत्तम सेवा.. तसेच रक्ताला नसते कोणती जात आणि पात... एक तेच तर आहे जे करते सर्व धर्मांवर मात.. अशा आशयाचे फलक रक्तदान केंद्रावर लावण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त आज सकाळपासून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत सेवा फाऊंडेशनचे मुस्लिम तरुण प्रत्येकाला रक्तदान करण्याची विनंती करत आहे. या रक्तदान शिबिरात विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी यथायोग्य पार पाडली.
समता ब्लड स्टोरेज सेंटर नाशिक आणि सेवा फाउंडेशन कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला आयुष्यभरासाठी रक्तदान कार्डवर, गरज भासल्यास रक्त मोफत मिळणार आहे तसेच रक्त खरेदीवर ५० टक्के सवलतीसह आदी सुविधा रक्तदात्याला मिळणार आहे.
समता ब्लड स्टोरेज सेंटर नाशिक आणि सेवा फाउंडेशन कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला आयुष्यभरासाठी रक्तदान कार्डवर, गरज भासल्यास रक्त मोफत मिळणार आहे तसेच रक्त खरेदीवर ५० टक्के सवलतीसह आदी सुविधा रक्तदात्याला मिळणार आहे.
राज्याचा उद्देश हा लोककल्याणसाठी आहे हा संदेश राजे शिवछत्रपतींनी दिला. उत्तम शासक कसा असावा याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले. त्यामुळेच शिवराय हे केवळ एक नाव नाही, तर एक विचार आहे.
Tags
महाराष्ट्र