Ravikant Tupkar : लाठीचार्ज पूर्वनियोजित, नक्षलवाद्यांसारखी वागणूक ; रविकांत तुपकरांचे गंभीर आरोप

 






Ravikant Tupkar : लाठीचार्ज पूर्वनियोजित, नक्षलवाद्यांसारखी वागणूक ; रविकांत तुपकरांचे गंभीर आरोप




बुलडाणा : सत्ताधाऱ्यांनी पक्षातील काही नेत्यांच्या सांगण्यावरुन आत्मदहन आंदोलन दडपले. लाठीचार्ज हा पूर्वनियोजित होता. सरकारने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. नक्षलवाद्यांसारखी वागणूक देण्यात आली. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीची लढाई सुरुच राहणार आहे. पुढच्या महिन्यात सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊंचे दर्शन घेऊन जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी जिल्हा आणि राज्यात यात्रा काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.


तुपकर पुढे म्हणाले की, अतिवृष्टीची मदत, पीक विमा, सोयाबीन-कापसाला भाव यासह इतर मागण्यांसाठी आम्ही लढा देत आहोत. आधीच्या आंदोलनात आम्हाला यश होते. त्यानंतर आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला. त्याचा धसका घेत आंदोलनाच्या एक दिवसापूर्वी १० फेब्रुवारी रोजी पीकविम्याचे ९ कोटी ७८ लाख शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आले तर आंदोलनानंतर ४२ कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, हे या आंदोलनाचे यश आहे.

आम्ही अंगावर लाठ्यांचे वार झेलले, जेलमध्ये गेलो पण या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झाली याचे समाधान आहे, शेतकऱ्यांसाठी हजार वेळा जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असेही यावेळी तुपकरांनी सांगितले.


सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. काही विशिष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.

काही पोलिस आंदोलनात मुद्दामहून शिवीगाळ करत होते, वातावरण पेटवत होते. शेतकऱ्यांना उचकविण्याचे काम करीत होते. तर काही विशिष्ट पोलिस अधिकारी आपली पोस्टींग टिकविण्यासाठी, सुपारी घेतल्यासारखे वागत होते. पोलिसांनी दिलेली वागणूक दहशतवाद्यांपेक्षाही अधिक भयंकर होती, आपल्याला संपविण्याचा डाव आखल्या गेला होता, असा गौप्यस्फोट रविकांत तुपकरांनी या पत्रकार परिषदेत केला.


Post a Comment

Previous Post Next Post