अजित पवारांकडून दुहेरी हल्ला, अखेर शिंदे-फडणवीस सरकार नमलं; - latursaptrangnews

Breaking

Tuesday, March 7, 2023

अजित पवारांकडून दुहेरी हल्ला, अखेर शिंदे-फडणवीस सरकार नमलं;

 


अजित पवारांकडून दुहेरी हल्ला, अखेर शिंदे-फडणवीस सरकार नमलं;


धाराशिव : राज्य सरकारकडून आपल्या कामाची माहिती देण्यासाठी जाहिरातांचा सपाटा लावण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसवर मोठ्या प्रमाणात सरकारी जाहिराती लावण्यात आल्या आहेत. याच जाहिरातबाजीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. खराब अवस्थेतील बसवर सरकारने केलेल्या जाहिरातीचा फोटो दाखवत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या सरकारने थेट सदर एसटी बस आगारातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीच नव्हतीच, तर सरकारने जाहिरातींवरील उधळपट्टी थांबवावी, असं आमचं म्हणणं असल्याचं नंतर अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईवरून सोशल मीडियासह इतर माध्यमांतून सरकारला लक्ष्य केलं जात होतं. या पार्श्वभूमीवर अखेर सरकारने माघार घेत ३ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.


भूम आगारातील ३ एसटी कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवत प्रशासनाने निलंबन केले होते. या प्रकरणातील डी. बी येडके, वाहन परीक्षक ए. यू शेख, सहायक कारागीर यांत्रिक एस. एन. हराळ, वाहन परीक्षक या तिन्ही कर्मचाऱ्यांचे निलंबन आज मागे घेऊन त्यांना आजपासून कामावर रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२३ फेब्रुवारी रोजी एम. एच. २० बी. एल. ०२०६ दिंडोरी - बार्शी ही खिडकी नसलेली बस रस्त्यावर उतरवण्यात आली होती. या खराब अवस्थेतील बसवर राज्य सरकारची जाहिरात असल्याने सदर बसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सदर गाडीचा उल्लेख झाला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे वाहन परीक्षक हे कर्तव्य करत असताना सर्व तपासणी करुन व सुस्थितीत वाहन रस्त्यावर पाठवणे आवश्यक होते. परंतु निष्काळजीपणा करून सदर बस देण्यात आल्याचं सांगत सरकारकडून तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे, रोग हाल्याला आणि इंजेक्शन पखालीला, या ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे आहे, असा हल्लाबोलही अजित पवार यांच्याकडून राज्य सरकारकडून करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment