शेतात घाम गाळला पण उत्पन्नच मिळालं नाही, सत्तारांच्या मतदारसंघात निराश झालेल्या शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल - latursaptrangnews

Breaking

Monday, March 6, 2023

शेतात घाम गाळला पण उत्पन्नच मिळालं नाही, सत्तारांच्या मतदारसंघात निराश झालेल्या शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

 


शेतात घाम गाळला पण उत्पन्नच मिळालं नाही, सत्तारांच्या मतदारसंघात निराश झालेल्या शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल


छ्त्रपती संभाजीनगर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. सिल्लोड येथील अंधारी गावात एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय - ४६ वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय - ५५ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, भागिनाथ पांडव हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. त्यात त्यांनी व्याजावर पैसे घेऊन कलिंगडाची शेती लावली होती. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जमिनीतील ओलाव्यामुळे चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न झाले नसल्याने आता घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता त्यांना सतावत होती.त्यामुळे ते काही दिवसापासून पांडव हे चिंतेत होते. शुक्रवारी त्यांनी शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
पांडव यांच्या आत्महत्येला काही तास उलटत नाहीत तर गावातील दुसऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. तायडे हे ठोक्याने दुसऱ्याची जमीन कासायचे काम करत होते. त्यांनी जी जमीन ठोक्याने घेतली होती, त्यामध्ये अपेक्षेपेक्षा खूपच कमी उत्पन्न झाले होते. त्यामुळे आधीच डोक्यावर कर्ज आणि नापिकी अशा दुहेरी संकटामुळे नैराश्यातून त्यांनी झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या दोन्ही घटनांचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत शेतकऱ्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांचे असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच करतात. शिवाय राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. अशी आश्वासने दिली जातात. मात्र, त्याच सरकार मधील कृषीमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांच्याच सिल्लोड मतदार संघात एकापाठोपाठ दोन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे विदारक वास्तव आहे.

कांद्यामुळे शेतकऱ्यांची दैना


गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर गडगडले आहेत. शेकडो टन कांदा विकूनही बळीराजाच्या हातात एक-दोन रुपये पडत आहेत. या सगळ्याला वैतागलेल्या नाशिकमधील एका शेतकऱ्याने दीड एकरावरील आपल्या कांद्याची होळी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील कांदा जाळून टाकला.

No comments:

Post a Comment