मतमोजणीच्या फेऱ्या पार पडत राहिल्या, धंगेकरांची आघाडी वाढत गेली - latursaptrangnews

Breaking

Thursday, March 2, 2023

मतमोजणीच्या फेऱ्या पार पडत राहिल्या, धंगेकरांची आघाडी वाढत गेली



     

मतमोजणीच्या फेऱ्या पार पडत राहिल्या, धंगेकरांची आघाडी वाढत गेली


पुणे: राज्यातील बहुचर्चित कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी वरचष्मा राखला. केवळ एखाद-दुसऱ्या फेरीचा अपवाद वगळता हेमंत रासने यांना एकदाही रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेता आली नाही. कसब्यातील लढत ही अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यातच झाली. परंतु, रवींद्र धंगेकर यांनी पहिल्या फेरीतच ३००० मतांची आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत भाजपच्या हेमंत रासने यांनी आघाडी घेत कमबॅक करण्याचे प्रयत्न केले. परंतु, १७ व्या फेरीपर्यंत हेमंत रासने यांना एकदाही आघाडी घेता आली नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेत आपले मताधिक्य वाढवत नेले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार १७ व्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ७४०० मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे हेमंत रासने यांचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.
    
या सगळ्या घडामोडींनंतर रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून कसब्यात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. तर हेमंत रासने हे आज सकाळपासूनच मठात ध्यानाला बसले आहेत. आपल्याला विजय नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी सकाळी व्यक्त केला होता. मात्र, मतमोजणीच्या एकापाठोपाठ फेऱ्या पार पडत गेल्या आणि रवींद्र धंगेकर यांची लीड वाढत गेली. त्यामुळे सध्या भाजपच्या गोटात सन्नाटा पसरला आहे. परंतु, काँग्रेसच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या रविवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाजवळ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थक व नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. गुलाल उधळत, झेंडे नाचवत आणि पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देत धंगेकर यांचे कार्यकर्ते जोरदार जल्लोष करत आहेत.

No comments:

Post a Comment