माझी काटेमुंढरीची शाळा : काटेरी जीवनाची अनुभूती देणारी कादंबरी
माझी काटेमुंढरीची शाळा : काटेरी जीवनाची अनुभूती देणारी कादंबरी
महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला जंगलव्याप्त गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जंगल,नदी,नाले,डोंगर,दऱ्या,वन् यपशु-पक्ष्यांच्या सहवासात आदिम जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडते.या जिल्ह्यात आदिवासींची आगळीवेगळी संस्कृती,शिक्षणाबाबत असलेली अनास्था,पोटापाण्यासाठी भटकंती,भाषेचा फरक,दृढनिश्चयी आदिवासी जमात,सामूहिक सहकार्य आदी विविध बाबींशी जवळून परिचय होतो.नक्षलवादी चळवळीचे मुख्यकेंद्र समजल्या जाणाऱ्या प्रदेशात गो.ना.मुनघाटे सारख्या ध्येयवादी शिक्षकाने घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे.ग्रामीण दुर्गम भागात जिथे रस्ता,दिवाबत्तीची सोय नसलेल्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळालेली मास्तरांची नियुक्ती तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर ठरणारे मडगू पाटील,डाफ्या कोतवाल,शिदू नावाच्या विद्यार्थी या भोवती ही कादंबरी केंद्रभूत आहे.
माझी काटेमुंढरीची शाळा ही कादंबरी लेखक गो.ना.मुनघाटे यांनी लिहिली आहे.आपल्या शैक्षणिक प्रवासातील जीवनाच्या अनुभूती मांडल्या आहेत.वनाने आच्छादलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शाळेची अवस्था सारखीच.ही कादंबरी वाचल्यानंतर व्यंकटेश माडगूळकर यांची 'बनगरवाडी' प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.प्रथम आवृत्ती २००३ साली प्रसिद्ध झाली असून आजतागायत बारावी आवृत्ती साधना प्रकाशन,पुणे येथून प्रकाशित झाली आहे.शिक्षणाच्या व्यथा व अवस्था ज्ञात व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठात बी.ए. च्या अभयसक्रमात ही कादंबरी अंतर्भूत आहे.लेखकाच्या अंतर्मनाची प्रेरणा,शिक्षण,समाज,आदिवासींची संस्कृतीचे यतार्थ दर्शन घडते.या कादंबरीला नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे डॉ.रमेश वरखेडे यांची शिफारस असून प्रसिद्ध शिक्षण सुधारक हेरंब कुलकर्णी यांची विस्तृत विवेचनात्मक प्रस्तावना लाभली आहे.आताच्या आवृत्तीचे मुखपृष्ठ गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी वृक्षाप्रमाणे कोलमडून पडलेल्या आदिवासींच्या समाजजीवनाला,निसर्गसौंदर्याला काटेरी वाट बाजूला सारून दगड-धोंड्यांशी खेळणाऱ्या बालकांना योग्य मार्ग दाखवितात.त्यातील त्याग,सेवाभाव, जोपासणाऱ्या शिक्षकांची प्रातिनिधिक हुबेहुब चित्रण मुखपृष्ठावरून दिसून येते.सदर लोकप्रिय व बहुचर्चित कादंबरी लेखकांनी तीर्थरूप आई,बाबा यांच्या स्मृतीस अर्पण केली आहे.माडिया आदिवासींच्या जडणघडणीत काम करतांना येणाऱ्या अडचनीची प्रातिनिधिक कथा ह्या अस्सल वाटायला लागतात.कधी कधी अंगावर शहारे येणारे प्रसंग,भितीदायक चित्र,मन विषण्ण करणारे आहेत.नागरी संस्कृतीपासून कोसो दूर असणाऱ्या पण संस्कृती जपणारी आदिवासी जमात दिसून येते.कादंबरीतील आतील चित्र भाऊ दांदडे यांनी जीव ओतून काढलेले आहे हे प्रसंगावरून,घटनेवरून स्पष्ट जाणवते.
अतिशय दुर्गम भागात जिल्हापरिषदेच्या शाळा आहेत.प्रथम जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची झालेली नियुक्ती.त्याच गावात आदिवासींनी मद्यप्राशन करून दुरवर्तन केलेल्या शिक्षकांचा झालेला मर्डर.तालुक्याच्या ठिकाणापासून जाण्यासाठी ट्रक्सने जावे लागते."बाबूजी काटेमुंढरी को काय को मरने जाते?" असा उलट केलेला प्रश्न..नंतर वारंवार शिक्षकांच्या स्मरणात राहतो.सांजगडला पोहचल्यावर गावातील मडगू पाटील बैलगाडीने घ्यायला येतो.तिथून काटेमुंढरी ८-१० मैल दूर,डोंगरदऱ्यातून, अंधाऱ्या रात्री,झुडुपांची गर्दी,गावाचा पूर्वेतिहास हा भयभीत करणारच ; पण आशावादी,ध्येयवादी शिक्षकाने कोणत्याही स्थितीत आलेले काटे वेचून मुंढरीची पंढरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती स्वस्थ बसू देईना.शिक्षण हे प्रवाही माध्यम आहे.शिक्षण,शिक्षक,समाज यांच्यात आंतरक्रिया होणे अगत्याचे.समाजाचे शिक्षकाकडून वाढलेल्या अपेक्षा.तीन-चार दशकांपूर्वीचे शिक्षक शाळेच्या गावी राहून अध्यापन धर्म चालायचा.शिक्षक हा पोटासाठी व्यवसाय असला तरी अध्यापनातून मार्ग दाखविणारा दिशादर्शकच.लेखक काटेमुंढरीच्या गावात मडगू पाटलाच्या घरी पोहचले.त्या गावातील ग्रामसभा म्हणजे कोर्टच.आदिवासी समाजात एखादी बाब सांगायची नाही ठरविले तर नाहीच आणि सांगितले तर "धब्बाच" म्हणजे गावातून बहिष्कृत.आनंदोत्सव असो वा दुःखद प्रसंग नृत्य आणि मद्यप्राशन नित्यनेमानेच.
गावातील दारिद्र्याच्या खितपत पडलेले कुटुंब.शिक्षणाबाबत अनास्था.शिकून काय करणार? ही मनःस्थिती त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठवत नाही.जेव्हा एक खुर्ची, एक टेबल एवढीच शाळेची मालमत्ता..हजेरी पट नाही.कोऱ्या कागदावर २३ विद्यार्थी पटावर पण उपस्थिती जेमतेम ७-५. त्यामुळे पालकांची घेतलेली सभा,भाषेचा होणारा अडसर,नातेसंबंध जोपासून शिकून शहाणे होण्यासाठी गावकऱ्यांना आपलेसे करण्यात मोलाचा हातभार.पगाराच्या दिवशी तालुक्यावर जातांना आवडता विद्यार्थी शिदू सांजगडपर्यंत पोहचवून देणे,दुसऱ्या दिवशी घ्यायला येणे,गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने स्वागत करणे.दारू न पिता सर्वाशी मिळून-मिसळून राहत असल्याने मास्तरची देवाची उपमा.शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी चार भिंतीच्या आड शिक्षण न देता रवींद्रनाथ टागोरांच्या विचाराने प्रेरित होऊन निसर्गाच्या सानिध्यात शाळा भरविल्यामुळे उपस्थिती वाढली.सात ही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शाळा भरविण्याचे दिलेले आश्वासन पण अचानक शिदू शाळेत गैरहजर राहू लागला.घरी गेल्यावर कळले की,आई-वडील मोलमजुरीच्या कामावर जात असल्याने लहान भावंडांना सांभाळण्यासाठी राहावे लागत होते.मनात प्रबळ शिकण्याची इच्छा असून देखील बाच्या शब्दाच्या बाहेर जाता येत नव्हतं.सामाजिक संकेत इतके दृढ होते की,कोणीही शाळेत न येण्याचे कारण सांगत नव्हते.शिदू शाळेत येईल व त्याचा भाऊ वातू ला सांभाळ करण्याची जबाबदारी डोकराबाई हिच्याकडे लुगडं घेऊन देण्याच्या अटीवर शिक्षकांनी केली.
लग्नसोहळा धुमधडाक्यात व्हावे यासाठी आठवडाभर रीतिरिवाज चालतात.नृत्य,मद्य प्राशन करणे,खाणे चालायचे.गरिबीचं जिणं असल्याने कामाचा थकवा दूर करण्यासाठी जात असायचे.जंगलात भटकंती करून शिकार करणे,मजुरी केल्यावर मिळालेले धान्य कांडून सकाळची चूल पेटत असायची.ही शिदू आणखी शाळेत गैरहजर राहिल्यावर घरी भेट दिल्यावर कळले.आठवड्यात सांजगडला बाजार त्यावेळी गावातील प्रत्येकजण सामानाची यादी देत असे.शिक्षक हा गावाचा एक सदस्य असल्याप्रमाणेच गावकऱ्यांची निष्ठा व श्रद्धा बसलेली होती.त्यात आदिवासींना कमी किंमतीत मिळावे म्हणून व्यापाऱ्यांशी वाद वाढू लागला.दळणवळणाची साधने नाही,नातेवाईकांची भेट नाही त्यामुळे जांभुळगाव बाजार व भीमगडची मंडई येथे दोन्ही गावाची भव्य यात्रा भरत असे.गावातील म्हातारे,तरुण-तरुणीसह यात्रेत वेशभूषा करून सहभागी होत.यात्रेचा इतिहास सांगत जत्रा म्हणजे लोकजीवन.मुलांची शिक्षणाची गती बघून रिपा पाटलीनसह इतर बायका देखील रात्रीच्या शाळेत गोटूलात आवर्जून उपस्थित असत.शिक्षकाला एका नव्या सांस्कृतिक बाबीची माहिती मिळाली.आदिवासी लोक मेल्यानंतर न जाळता जमिनीत पुरतात.अंतिम संस्कार करतांना पैसे द्यावे लागतात.तेच पैसे गोळा करून मृतकला मूठमाती देतात.शिदूच्या वडिलांकडे पैसे नसल्याने पितळेचा गडवा गहान ठेवायला लावतात.मनात नसतांना देखील ठेवावे लागते.खायला नसले तरी चालेल पण स्वाभिमानीपणाने जगायला शिकविणारी संस्कृतीचा परिचय होतो.दुःख व मूठमाती देतांना आनंद या दोन्हीचा संगम बघावयास मिळतो.
तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या बालक्रीडास्पर्धेत काटेमुंढरीच्या चमूने अव्वल स्थान पटकावले तरीही शिक्षकांच्या चेहऱ्यावर उदाशी दिसत होते कारण खरी निस्वार्थ सेवा ही गटेवाहिच्या नागोसे गुरुजींची दिसत होती.जन्मदात्याप्रमाणे मुलांची विचारपूस,काळजी,आपुलकीने वागणूक,क्रीडास्पर्धेत सर्वाना मदत त्यामुळे हेवा वाटावा असे आदर्श कार्य या शिक्षकांचे होते आणि काही शिक्षक केवळ सरपंचाच्या दाखल्याने वेतन उचलत होते.एका शिक्षकांची बदनामी म्हणजे साऱ्यांचीच. खुशाल हिवसे बिटेवाडीचा शिक्षक स्वतःची गोंडस बायको-पोरं सोडून खेम्याच्या सुबीले पळवून आणल्याने मन त्यांचे व्यतीत झाले होते त्यामुळे उद्याची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांची समाजात बदनामी हे चित्र विचित्र असल्याने बडतर्फ करण्यात यावे अशी ही भूमिका लेखकांनी मांडली आहे.बकाराम,बिसन गोसामी हे दलाल होते.रेडे धनिरामने पाणवठ्याकडे गेले.त्यात पाच तरुणी स्नानासाठी आलेल्या होत्या.त्यांचे कपडे पाळीवर ठेवलेले होते.चुकीने वारजू पाटलाच्या मुलीचा परकर शिंगावर अडकल्याने मुलींची छेड काढण्याचा संशय घेऊन धनिरामला पकडले.यातून सुटका करण्यासाठी मडगू पाटील व गुरुजींच करू शकतात म्हणून बकाराम विनवणी करीत होता नि अखेर सुटका केली.एखाद्या निष्पाप व प्रामाणिकपणा ठायी असलेल्या व्यक्तीला शिक्षा नको,असा भाव सदैव मडगू पाटलांचा असायचा.एखादी बातमी आणायची असेल तर कलंदर डाफ्या कोतवाल हुशार होते.धनिरामचे त्याच वारजू पाटलांच्या मुलीशी जातीच्या बाहेर विवाह होत असल्याने पैसे भरून विवाह सोपस्कार आटपून घेतला.आदिवासी जमात निसर्गाशी एकरूप होऊन कार्य करायचे.डोंगरीवर सहल नेण्याचे सूतोवाच कारु गोटाने केले.शिक्षक देखील घाबरत पण हिंस्त्र प्राण्यांना हाकलून कसब,साहस,शिकारीचे कौशल्य त्यामुळे कारु गोटा सहलीचा शिल्पकार ठरला.पक्ष्यांना पकडणे, औषधी वनस्पती इत्यादी नवीन बाबी मुलांकडून शिकायला मिळाले.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर.मोर जसा सुंदर तसे नृत्यही सुंदर करतो.मोर हा निसर्गाचा अनमोल ठेवा असल्याने शिकार करू नका.सुनबाई व मोर यांचे अनोखा लळा बघता तिच्या नवऱ्याने मोराला ठार केले.तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले.केवळ द्वेषापोटी व गैरसमजापोटी क्रूरपणे न वागण्याचे आवाहन लेखक करतो.तळ्यावरील शैक्षणिक भेटद्वारे विविध प्रकारचे पक्ष्यांची ओळख करून देतो.शाळेतील विद्यार्थ्यांकडून रूपचंद महाराज यांचे झालेले स्वागत बघून भारावून जातात.दुसऱ्या दिवशी मडगू पाटील व गुरुजींना बोलावणे केले जाते.गावातील त्यागी व कष्टी वृत्ती यामुळे महाराज यांच्याकडून चांदीचे नाणे भेट देण्यात येते.प्रत्येक कार्यात गुरुजींना गावकरी सामील करीत असे.त्यांच्यासाठी विश्वासू, दिशादर्शकच म्हणावा लागेल.रात्री चिटुक पारडीसाठी येण्याचा आग्रह.प्रत्येकाच्या हातात लांब काठी देऊन छोट्या काठीने त्याच्यावर आदळल्याने बारीक आवाज निघत होता त्यामुळे जंगलातील ससे सैरावैरा पळत आणि चक्रव्यूहात सापडत त्यामुळे गावकरी आनंदी होत पण गुरुजींना वन्य व निष्पाप जीवाची शिकार करू नका हे लेखक आदिवासी बांधवांना सांगून समजावू शकले नसल्याने मनातील खदखद व्यक्त करीत राहिले.
मडगू पाटील म्हणजे गावासाठी मसिहा.शाळेसाठी इमारत व्हावी म्हणून एका खोलीच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला पण चार खोल्या बनवायच्या असल्याने स्वतःच्या हिस्स्याची जमीन विकून निधी दिला.त्यांच्या पत्नीने स्वतःच्या गळ्यातील गोफ दिला.कोळकू पाटलाच्या मुलीचे लग्न चांदीची मुंदी दिल्याशिवाय होणार नाही हे माहीत होताच.गावाची इज्जत झाकण्यासाठी स्वतःची सोन्याची मुंदी नवरदेवाच्या बोटात घातली.मडगू पाटलाचे निसर्गज्ञान,पक्षी निरीक्षण भरपूर होते.मडगू पाटलाचे सामाजिक,सांस्कृतिक,पर्यावरणवि षयक ज्ञान,निसर्गजीवनाशी नाते घट्ट होते.काटेमुंढरीच्या नवीन शाळा इमारतीचा उदघाटन सोहळा रुपचंद महाराजांच्या हस्ते झाला.रुपचंद महाराजांनी जनतेचे खरे हृदयसम्राट मडगू पाटलासारखे सार्वजनिक कार्यकर्तेच आहे.आमच्या संस्थानाला असे शिक्षक लाभले नाही याची मनाला खंत असल्याचे बोलून दाखविले.जिल्ह्यात आदर्श म्हणून नावलौकिक असलेले नागोसे गुरुजींना पोलिसांनी अटक केले,गंभीर स्वरूपाची तक्रार केली.मुलाला नक्षलवादी चळवळीत पाठविण्यासाठी मदत केल्याचा संशय होता.गुरुजी व मडगू पाटलांनी सोडवून आणले पण समाजहित जोपासणारे गुरुजी व मडगू पाटील नक्षलवाद्याचे हस्तक असल्याची अफवा पसरविण्यात आली.चांगले कार्य करणाऱ्यांना अशी शिक्षा मिळत असेल तर काय म्हणावे??नागोसे गुरुजी बेचैन होऊन अन्नपाणी घेण्याचे टाळले.जगातील अन्यायी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी प्राण पणाला लावले.मडगू पाटील व गुरुजी यांच्यावर असलेला आरोप तत्कालीन आमदाराने मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून सुटका करवून घेतली.गुरुजीने शिकविलेल्या आवडता विद्यार्थी काटेमुंढरीच्या शाळेचा मुख्याध्यापक आहे.गणराज्यदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार असल्याची बातमी वर्तमानपत्रात लेखकांनी वाचली.एक ग्रामीण भागातील आदिवासी मुलगा त्याच्या यशाचे श्रेय लेखकाला दिल्याची बातमी ऐकून मनस्वी आनंद होतो.अश्या प्रकारे आज शिक्षकांच्या बांधीलकीवर समाजाची चर्चा केंद्रित होतांना,जुन्या काळातील शिक्षकांचा प्रतिनिधी ठरणारा काटेमुंढरीच्या गुरुजी कडून प्रेरणा घ्यावी.अतिशय मनाला भिडणारी,असलेल्या परिस्थितीवर मात करणारी,काटेरी जीवनाची अनुभूती ही कादंबरी देत असते.येणाऱ्या पुढील पिढीतील शिक्षकांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येक वाचकांनी ही कादंबरी संग्रही ठेऊन वाचनाचा आस्वाद घ्यावा.लेखकांना अशीच साहित्यकृती आपल्या हातून घडावी यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!
दुशांत बाबुराव निमकर
सहसंपादक,जीवन गौरव मासिक (म रा) जिल्हा चंद्रपूर
मो.नं : ९७६५५४८९४९
No comments