Beed Crime: दुचाकीवर बोकड खरेदीसाठी आले,अपेक्षेपेक्षा जास्त पैसे दिले, सत्य समजलं तेव्हा शेतकऱ्याला धक्का बसला

 


Beed Crime: दुचाकीवर बोकड खरेदीसाठी आले,अपेक्षेपेक्षा जास्त पैसे दिले, सत्य समजलं तेव्हा शेतकऱ्याला धक्का बसला


बीड: बोकड आणि पाठ विकत घेताना दोन तोतया व्यापाऱ्यांनी चक्क शेतकऱ्याला चुनाच लावल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस झाला आहे. शेतकऱ्याला यासाठी देण्यात आलेल्या नोटा बनावट असल्याचं आढळून येताच शेतकरी दाम्पत्याच्या पायाखालची जमीन सरकली. आष्टी तालुक्यातील कडा येथील देवळाली रोडवरील डोंगरगण येथील नमाजी भाऊ घोडके हे शेळी पालन करतात.

नामदेव घोडके यांच्याकडे सहाशेळ्या आहेत. मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान दोन व्यापारी चक्क त्यांच्या घरापर्यंत आले. त्यांच्याकडून पाठ आणि बोकड घेण्याची या व्यापाऱ्यांनी इच्छा देखील व्यक्त केली. यात घोडके यांनी त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेलं बोकड आणि पाठ दाखवली. व्यापाऱ्यांनी पसंती दर्शवत किती रुपये देणार हे देखील सांगून टाकलं. अपेक्षा पेक्षा समोरील व्यापारी आपल्याला जास्त भाव देतोय आपल्याला काही बोलायची गरज पडत नाही, असा समज झाल्यानं घोडके यांनी अधिक माहिती घेतली नाही.

एक बोकड आणि पाठ याचा एकूण साडे नऊ हजाराला सौदा ठरला. दोन्ही व्यापाऱ्यांनी साडे नऊ हजारांची रक्कम घोडके यांच्या पत्नी कुसुम यांच्याकडे घरात जाऊन पैसे दिले. पत्नीकडून पैसे घेताच घोडके यांना आपल्याला दिलेल्या नोटा चक्क खोट्या असल्याचं समजलं. दोन हजारांच्या चार तर पाचशे रुपयांच्या तीन नोटा बनावट असल्याचं आढळून आलं.

साडेनऊ हजारांच्या नोटा बनावट निघून आपली फसवणूक झाल्याचं घोडके यांच्या लक्षात येईपर्यंत तोतया व्यापाऱ्यांनी पळ काढला होता. तोतया व्यापाऱ्यांनी गंडा घातल्याचा शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर शेतकरी घोडके यांनी पत्नीसह अंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या ठिकाणी याप्रकरणी पोलिसांना तक्रार देऊन आपल्यावर घडलेला प्रसंग देखील सांगितला.

जे बोकड आणि पाठ विकून पाच ते सहा हजार रुपये मिळाले असते तिथं जादा पैशांच्या प्रलोभनाला बळी पडल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात तोतया व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध पोलीस प्रशासन घेत असल्याचे माहिती देण्यात आली आहे.

आष्टी तालुक्यात या प्रकारानं खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यात अनेक अशा बाजारपेठा आहेत की ज्यात जनावरांची खरेदी विक्री देखील केली जाते. तोतया व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील आवाहन केलं आहे. आपला व्यवहार करत असताना नोटा खऱ्या आहेत की नाही हे तपासून व्यवहार करावा असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post