शरद पवारांच्या घोषणेमागच्या ५ शक्यता - latursaptrangnews

Breaking

Tuesday, May 2, 2023

शरद पवारांच्या घोषणेमागच्या ५ शक्यता

 


शरद पवारांच्या घोषणेमागच्या ५ शक्यता


मुंबई : गेली ६२ वर्ष सार्वजनिक जीवनात वावरत असताना, देशाच्या राजकारणात विविध पदं भूषवलेली असताना, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या प्रमुखपदी काम केलेलं असताना आता कुठेतरी थांबलं पाहिजे. माणसाला जास्त मोह नसावा, अशी भावना बोलून दाखवताना सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचं अध्यक्षपदंही सोडण्याची चक्रावून टाकणारी घोषणा पवारांनी केली. त्यांच्या या घोषणेमागच्या टायमिंगची चर्चा होतीये. ही घोषणा करुन पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझ्या सांगाती' या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन सोहळ्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली. पवारांची ही घोषणा राज्याचं राजकारण ढवळून काढणारी ठरली आहे. शरद पवारांनी राजीनाम्याची ही घोषणा करण्यामागे काय कारणं असू शकतात ते पाहूया.

१) पक्षातील संभाव्य फूट टाळणे?

अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे. आपण असा कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केले असले तरी राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या या निर्णयाच्या शक्यता पूर्णपणे फेटाळली गेलेली नाही. अजित पवारांच्या वेगळ्या दिशेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना पुन्हा एकदा आपला खुंटा बळकट करून पक्षातील ताकद दाखवून द्यायची गरज वाटली असावी. म्हणजेच अशी घोषणा करून पवारांनी राष्ट्रवादीची पूर्ण ताकद आपल्या पाठीशी आणून अजित पवारांना असा काही निर्णय घेण्यापासून परावृत्त करण्याची शक्यता असावी. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला तरी मीच बिग बॉस आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे.

२) अजित पवारांच्या निर्णयापासून लांब राहणे ?

दुसरी शक्यता म्हणजे अजित पवार जर राष्ट्रवादीच्या आमदारांना मोठ्या संख्येनं घेऊन भाजपासोबत जाणार असतील तर त्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नसावी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेशी आपला संबंध नसावा, त्यासाठी आपण अध्यक्षपदावरुन पायउतार झालेलं बरं... ही दुसरी शक्यता व्यक्त केली जातेय.
३) सुप्रिया सुळेंचा मार्ग मोकळा करणे?

शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत तिसरी शक्यता म्हणजे सुप्रिया सुळे यांना नेतृत्वस्थानी बसवणे. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा जर शरद पवारांना सुप्रिया सुळेंच्या हाती सोपवायची असेल तर त्यांना आत्तापासूनच सुप्रिया सुळेंकडे नेृतृत्व सोपवण्याची प्रक्रिया करावी लागेल. शरद पवारांच्या जागेवर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष करून ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे सुप्रिया सुळेंना अध्यक्षपदी आणण्यासाठी शरद पवारांनी राजीनामा दिला असावा ही तिसरी शक्यता आहे.


४) वाढते वय आणि प्रकृतीचे कारण?

शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाची चौथी आणि महत्वाची शक्यता म्हणजे त्यांची प्रकृती. शरद पवारांचे वय आता ८३ वर्षं झालं आहे. ते सक्रिय असले तरी वाढत्या वयामुळे प्रकृतीची काळजी घेणे अत्यावश्यक वाटणे नाकारता येणार नाही. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जेव्हा शरद पवारांना राजीनाम्याचा फेरविचार करण्याचा आग्रह सुरू होता तेव्हा शेजारी बसलेल्या प्रतिभाताई पवार मात्र तुम्ही हा निर्णय मागे घेऊ नका असेच त्यांना सांगत होत्या. अर्थातच प्रतिभाताईंची ही भूमिका पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव असल्याचं मानलं जातं.


५) उद्धव ठाकरेंचं वाढलेलं महत्त्व कमी करणे?

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेनेचे दोन तुकडे पाडले. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी संघर्षाची भूमिका घेतल्याने राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी तेच आहेत. त्यांना राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळत असल्याने महाविकास आघाडीतही त्यांचं वजनही वाढतंय, जे मविआच्या सभांच्या माध्यमातून राज्याला पाहायला मिळतंय. मविआचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची इमेज बनत असताना पवारांनी आजचा बॉम्ब टाकल्याने पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी पवार आलेले आहेत. राज्याचं राजकारण आपल्याच भोवती फिरतं, हे मिथक शरद पवारांनी आज या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केलं

No comments:

Post a Comment