निकम वसावे या युवकाचे डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलंय.
नंदुरबार : नवापूर रस्त्यावर बस, कार आणि दुचाकीच्या तिहेरी भीषण अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीवर त्याच्या सोबत असलेला त्याचा भाऊ गंभीर जखमी झालाय. नियतीने घात केला आणि धडगावच्या निकम वसावे या युवकाचे डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलंय. परीक्षेला जात असलेल्या निकम वसावेचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील अस्तंभा सिसा येथील रहिवासी असलेल्या निकम वसावे या युवकाचे डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. काल नवापूर येथील परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा देण्यासाठी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकी व कारला दिलेल्या धडकेमुळे घडलेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला मोठा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघात घडल्यानंतर बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला. या प्रकरणी बसचालकविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिहेरी अपघातात परीक्षेसाठी जाणारा युवक ठार
धडगाव तालुक्यातील अस्तंभा सिसा येथील निकम वसावे (वय १८) याची नीटची परीक्षा नवापूर येथील केंद्रावर होती. यामुळे मोठा भाऊ संदिप वसावे (वय २३) याच्यासोबत तो दुचाकीने नवापूरकडे जात होते. काल (दि.६) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नंदुरबार-नवापूर रस्त्यावर खामगाव शिवारातील सन सिटीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एस.टी.बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन दुचाकीला व कार (क्र.एम.एच.१८ डीसी ५६१४) ला धडक दिल्याने हा अपघात घडला.
या अपघातात दुचाकीवरील दोघे भाऊ दूर फेकले गेले. रस्त्यावर जोराने आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. निकम वसावे याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. संदिप वसावे यालाही गंभीर दुखापत झाली आहे. संदिप समोरच भाऊ निकम याने प्राण सोडला.
निकमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडला होता. नागरिकांनी जखमी संदिप वसावे व मयत निकम वसावे या दोघांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात रवाना केले. संदिप वसावे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दुचाकी व कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला.