Alandi Warkari : आळंदीतील वारकऱ्याने रक्तासह अंगावरची जखम दाखवली; पण पोलिसांचा वेगळाच दावा, म्हणाले... - latursaptrangnews

Breaking

Monday, June 12, 2023

Alandi Warkari : आळंदीतील वारकऱ्याने रक्तासह अंगावरची जखम दाखवली; पण पोलिसांचा वेगळाच दावा, म्हणाले...

 


Alandi Warkari : आळंदीतील वारकऱ्याने रक्तासह अंगावरची जखम दाखवली; पण पोलिसांचा वेगळाच दावा, म्हणाले...


 पिंपरी : 'पालखी प्रस्थान सोहळ्यात गेल्या वर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्याने काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मानाच्या दिंडीप्रमुखांनी त्याला मान्यता दिली होती. तरीही, रविवारी काही स्थानिक युवकांनी मंदिरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांशी किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी लाठीमार किंवा बळाचा वापर केलेला नाही,' असा दावा पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला.


'सर्व वारकरी प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,' असे आवाहनही त्यांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात ४७ दिंड्यांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. या दिंड्यांमधील अधिकच्या वारकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारला. या वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये सुरुवातीला वादावादी झाली आणि त्याचे पर्यावसान झटापटीत व सौम्य लाठीचार्जमध्ये झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मंदिर प्रशासनाने मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. दरम्यान, पोलिस आणि वारकरी यांच्यातील वादाचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
मान्यवरांची उपस्थिती

प्रस्थान सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, आमदार श्रीकांत भारतीय, पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी विश्वस्त सुधीर पिंपळे, डॉ. प्रशांत सुरू, अभय टिळक, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह वारकरी, मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्थान सोहळ्यावेळी झालेल्या प्रकाराबाबत माहिती घेत आहे. सोहळ्याला गालबोट लावण्याच्या अनुषंगाने कोणी जाणीवपूर्वक तर काही करत नाही ना? याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत. मुख्य मंदिराच्या आवाराच्या बाहेर प्रकार घडला आहे. त्याचा पालखी सोहळ्यावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. प्रस्थान आनंदी आणि उत्साही वातावरणात झाले.

No comments:

Post a Comment