कचरा व्यवस्थापन कामगारांचे कौशल्य विकास प्रशिक्षण
लातूर, दि. 9 (प्रतिनिधी): मुंबईतील पॉलिसी एडव्होकसी रिसर्च सेंटरच्या (पीएआरसी) पुढाकाराने कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कामगारांसाठी 'सफाई मित्र - सर्वांगीण क्षेत्रीय परिचय, सुरक्षितता आणि कौशल्य अभ्यासक्रम' राबवला जात आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रदेशिक अधिकारी परमेश्वर कांबळे यांच्या हस्ते या प्रशिक्षणास सुरवात झाली.
दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि. ९) हा कार्यक्रम झाला. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य बालाजी कांबळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रवींद्र क्षीरसागर, पीएआरसी संस्थेच्या अमरजा कुलकर्णी, मुग्धा महाबळ, जन -आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील पॉलिसी एडव्होकसी रिसर्च सेंटर (पीएआरसी), इन्स्टिट्यूट ऑफ़ केमिकल टेक्नोलॉजी, ग्रीन शिफ्ट एनर्जी प्रा. लि. व जन- आधार फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री कांबळे उद्घाटनप्रसंगी म्हणाले, की कुठल्याही क्षेत्रात काम करताना तंत्र व कौशल्ये महत्वाची आहेत. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पीएआरसीचा हा पायोनियर प्रकल्प आहे. या प्रशिक्षणामुळे कचरा व्यवस्थापनातील कामगारांच्या कौशल्यात भर पडून सुरक्षित काम करता येईल. त्यासोबत शहराची स्वच्छता होईल.
पीएआरसी संस्थेच्या अमरजा कुलकर्णी म्हणाल्या, की घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे ६४० कामगार व संबंधित घटकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल. घनकचरा व त्यातील विविध घटक, कचऱ्याचे प्रकार, घातक कचरा हाताळणी, कामगार सुरक्षा, काम करताना घ्यायची काळजी, कामगारांचे आरोग्य व तातडीची वैद्यकीय मदत अशा अनुषंगिक विषयांवर हे प्रशिक्षण होत आहे. यातून कामगारांची कौशल्ये विकसित होण्यासह त्यांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक उन्नती घडवून आणणे अशी प्रशिक्षणाची उद्दिष्टे आहेत. प्रशिक्षणात आधुनिक तंत्राचा वापर होत आहे. सहा महिन्यांनी कामगारांच्या जीवनात अमूलाग्र बदल होतील, अशी अपेक्षा असल्याचे श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले. उपप्राचार्य कांबळे म्हणाले, की सफाई कामगार हेच खरे योद्धे असल्याचे कोविडच्या काळात सिद्ध झाले. सफाई कामगार सुरक्षित राहिले तरच शहर व जनता सुरक्षित राहील, असेही ते म्हणाले.
कचरा व्यवस्थापन क्षेत्राचा परिचय, सुरक्षा, जोखमी, आणि त्यासाठी लागणारे प्रतिबंधात्मक उपाय, कचरा व त्यामधील साहित्य ओळख, हाताळणी, कार्य सुविधेच्या ठिकाणच्या सर्वोत्तम पद्धती यांवर मार्गदर्शन करण्यात आले. तंत्रशिक्षण क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेने कचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे कर्मचारी डोळ्यासमोर ठेवून, पॉलिसी रिसर्च आणि औद्योगिक दृष्टीने एकत्र येउन तयार केलेला कौशल्य विकासासाठीचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. या आधीच प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाचा प्राथमिक टप्पा 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात पार पडला आहे. संतोष कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापनातील ४० प्रशिक्षणार्थी कामगार व महिला कर्मचारी व 15 प्रशिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment