पाकिस्तानची सवय जाईना! आता चीन अन् सौदी अरेबियासमोर पसरले हात; मागितली 11 अब्ज डॉलर्सची मदत
पाकिस्तानात सरकार बदलल्या नंतरही आर्थिक संकट कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळेच आयएमएफकडून मदत मिळाल्यानंतरही पाकिस्तानने पुन्हा चीन आणि सौदी अरेबियाकडे हात पसरले आहेत. या देशांकडून पाकिस्तानने 11 अब्ज डॉलर्सची मदत मागितल्याचं म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील काळजीवाहू सरकारने ही मागणी केली आहे. पाकिस्तानातील आघाडीचं वृत्तपत्र असलेल्या 'डॉन'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. इस्लामाबादमध्ये गुरुवारी (28 सप्टेंबर) सिनेटर सलीम मांडवीवाला यांच्या अध्यक्षतेखाली वित्त आणि महसूल विषयक स्थायी समितीसमोर एक धोरण जाहीर केलं. यामध्ये मदतीचा उल्लेख आहे.
पुढील महिन्यात चर्चा
पाकिस्तानचे काळजीवाहू अर्थमंत्री शमशाद अख्तर यांनी सांगितलं, की आमच्या नव्या सरकारकडे मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी अगदी मर्यादित वेळ आणि पैसे आहेत. मात्र, IMF कडून मिळणाऱ्या 700 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी या सुधारणा पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. याबाबत ऑक्टोबरच्या अखेरीस IMF सोबतच चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आयएमएफचा बेलआउट कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पाकिस्तानला काही प्रमाणात काम केलेलं दाखवावं लागणार आहे. यासाठी त्यांनी आता चीन आणि सौदी अरेबियाकडे मदत मागितली आहे. यासोबतच, काळजीवाहू सरकार हे अतिरिक्त तीन ट्रिलियन रुपयांच्या मदतीसाठी न्यायालयांची मदत मागत आहे.
No comments:
Post a Comment