गर्भवती बायकोला नवऱ्याने झोपेतचं संपवलं - latursaptrangnews

Breaking

Friday, October 6, 2023

गर्भवती बायकोला नवऱ्याने झोपेतचं संपवलं

 




गर्भवती बायकोला नवऱ्याने झोपेतचं संपवलं


लातूर : पाच महिन्याचा संसार केलेल्या दोन महिन्याच्या गर्भवती असलेल्या नवविवाहितेचा तिच्याच पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून तीची हत्या केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना लातूर तालुक्यातील कसारगाव येथे घडलीय. जना सुनील घावीट असं मयत विवाहितेचं नाव आहे.

जोशी समाजातील गावोगावी फिरून भिक्षा मागून खाणारे प्रभाकर भोसले दिव्यांग. पदरी चार लेकरं आणि अशा परिस्थितीत पती संसाराचा गाडा ओढणार कसा म्हणून पत्नीनेही गावोगावी फिरून आभूषण विक्रीला सुरुवात केली. कसेबसे थोडे पैसे जमवून ऐपतीप्रमाणे खर्च करून लातूर जिल्ह्यातील कासारगाव येथील सुनील घावीट यांच्याशी मे २०२३ मध्ये लेकीचा विवाह लावून दिला.
सुखी संसाराची स्वप्न पाहत हळव्या मनाची जना घावीट कुटुंबात आली. गोड स्वप्नात महिना लोटला अन सेंट्रिंगच काम करणाऱ्या नवऱ्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. "माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये", म्हणून कुरबुर करू लागला. सासू सासऱ्यांनीही तगादा लावला. सुखी संसाराच्या स्वप्नाला पैशाच्या मागणीचे ग्रहण लागले. आई बापाची परिस्थिती गरीब म्हणून ती सहन करू लागली. मात्र, २ ऑक्टोबरची रात्र काळरात्र ठरली. सासू सासऱ्याच्या मदतीने पतीनेच कुऱ्हाडीने घाव घातले अन् झोपेत असलेल्या जनाचे जीवनचं संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे जना दोन महिन्याची गर्भवती होती.

ही घटना प्रभाकर भोसले यांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच कासारगावला धाव घेतली. पोटच्या पोरीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. माय धाय मोकलून रडू लागली. दिवाळीला पैसे द्यायचं ठरलं होतं. त्यासाठी दोघेही पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत होते. पैसे दिल्यास पोर सुखी राहील असं त्यांना वाटलं होतं. पण दिवाळीआधीच त्यांनी पोरीचा घात केला. पोरीच्या सुखासाठी पाहिलेले माय बापाच्या लेकीच्या सुखी संसारचे स्वप्न उध्वस्त झाले.

या प्रकरणी जनाचे पिता प्रभाकर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात जनाचे पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केलीय.

No comments:

Post a Comment