ग्राहकांनो, चला खरेदीला! सोनं झालं खूप स्वस्त, चांदीच्या दरातही घट; पाहा आजचे दर

 



ग्राहकांनो, चला खरेदीला! सोनं झालं खूप स्वस्त, चांदीच्या दरातही घट; पाहा आजचे दर


नवी दिल्ली : सध्या पितृपक्ष काळात ग्राहकांनी सोन्या-चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवली असली तरी पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. अशा स्थितीत सणोत्सव असो किंवा लग्नसराईच्या निमित्त सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या किंवा मौल्यवान धातूत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशभर सोने-चांदीचा भाव दररोज बदल असतो, त्यामुळे मौल्यवान धातू खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्या दरांची माहिती असणे आवश्यक आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव
भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे तर, नोव्हेंबरपासून लग्नसराईचा हंगामही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील, तर हीच योग्य वेळ आहे. गुडरिटर्न्सच्या ताज्या आकडेवरीनुसार सराफा बाजारात सोन्याचा भाव किमान २०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. ५ ऑक्टोबर रोजी, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव १९० रुपये घसरणीसह ५२ हजार ४०० रुपयांवर आला तर, २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ५७ हजार १६० रुपये आहे. त्याचप्रमाणे आज सकाळच्या सत्रात प्रति किलो चांदीचा भाव ७० हजार ७०० रुपयांवर स्थिर राहिला आहे.

दुसरीकडे, MCX वर मौल्यवान धातूत वाढ नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे डिसेंबर फ्युचर्स (वायदे) ०.२९१ टक्के वाढीसह ५६ हजार ८८६ रुपये प्रति १० ग्रॅम वर व्यापार करत होते. तर चांदीचे डिसेंबर फ्युचर्स ०.८३९ टक्के वाढीसह ६७ हजार ४४६ रुपये प्रति किलोवर व्यापार करत होते. सोन्याच्या किमतीतील चढउतारांवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. सोन्याची जगभरातील मागणी, चलन मूल्यांमधील तफावत, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंबंधीचे सरकारी नियम यासारखे घटक सोन्याच्या दरातील बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

सोन्या-चांदीच्या घसरणीमागे कारण काय?
अमेरिका आणि युरोपमधील महागाई आटोक्यात आली असून गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर वाढलेला महागाईवर लगाम लागली आहे. याशिवाय पक्ष पंधरवड्यात ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरवली असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. तसेच डॉलर निर्देशांकातील मजबुती आणि सोन्याची मागणी कमी झाल्याने दरात कमालीची पडझड होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post