सोलापूरजवळील बंद कारखान्यातून १६ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त

 




सोलापूरजवळील बंद कारखान्यातून १६ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त


सोलापूर : पुणे रस्त्यावरील चिंचोळी एमआयडीसीमध्ये एका बंद कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून सुमारे १६ कोटी रूपये किंमतीचा ८ किलो उत्तेजक एमडी औषधांचा साठा जप्त केला. तसेच मोठ्या प्रमाणावर कच्चा मालही हस्तगत केला. या कारवाईने अमलीपदार्थ उत्पादन क्षेत्रात सोलापूरचे नाव मुंबईसह परदेशाला जोडले गेल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे.

मुंबई पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष क्र. ९ चे प्रमुख दया नायक यांच्या पथकाने चिंचोळी एमआयडीसीतील एका बंद कारखान्याचा पर्दाफाश करून मोठी कारवाई केली. १६ कोटी रूपये किंमतीच्या ८ किलो एमडी ड्रग्जबरोबर त्यासाठी लागणारा कच्चा मालही या कारवाईत सापडला. दोघे गवळी बंधू एमडी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईत आले असताना त्यांना पकडण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी चिंचोळी एमआयडीसीत येऊन पुढील कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गवळी बंधुंनी एमडी ड्रग्ज कोणाकोणाला विकले, त्यांचे सूत्रधार कोण, याचा तपास केला जात आहे.

मुंबई आणि थेट विदेशाशी असलेले ड्रग्ज कनेक्शन हे नवीन नाही. यापूर्वी २०१६ साली याच चिंचोळी एमआयडीसीत एव्हान नावाच्या कंपनीत औषध निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांचा तब्बल १८ टन एफेड्रिन ड्रग्ज नावाचा साठा ठाणे पोलिसांना सापडला होता. त्याची किंमत सुमारे दोन हजार कोटी होती. त्या प्रकरणात प्रमुख सूत्रधार विकी गोस्वामी आणि सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी व इतरांवर कारवाई झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post