समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडून मदत जाहीर, नरेंद्र मोदी म्हणाले…

 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर शनिवारी (१४ ऑक्टोबर) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ६ वर्षांच्या एका चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार झाले आहेत. समृद्धी महामार्गाने बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हलरमधील १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तसेच २३ जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पंतप्रधान कार्यालयानेही अपघातग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.




मुख्यमंत्री कार्यालयाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे, मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले, याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पंतप्रधानांकडूनही मदत जाहीर

या अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान यांनीदेखील मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातातल्या जीवितहानीचं वृत्त ऐकून खूप दुःख झालं. या अपघातात ज्यांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं, मी त्यांच्याबरोबर आहे. अपघातातील जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. तसेच या अपघातातील मृतांच्या कुटुबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीद्वारे प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत केली जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post