कानातून रक्त येईपर्यंत चिमुकलीला मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? - latursaptrangnews

Breaking

Sunday, October 15, 2023

कानातून रक्त येईपर्यंत चिमुकलीला मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

 नागपूर: होमवर्क न केल्याने शिक्षकांनी दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कानातून रक्त येईपर्यंत मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील रामदासपेठ परिसरातील सोमलवार इंग्रजी प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीला झापड मारली. ज्यामुळे त्या विद्यार्थिनीच्या कानातून रक्त येऊ लागले. या घटनेनंतर शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या आईला फोन करून याबाबत कळवले. तिची आई शाळेत पोहचली तेव्हा मुलगी खूप रडत होती. त्यानंतर मुलीच्या काकांनी तिला धीर देत प्रेमाने विचारणा केली असता तिला शिक्षकाने होमवर्क न केल्यामुळे मारहाण केल्याचे तिने सांगितले.





पिराजी मायगु चाचेरकर (४०, रा. गोकुळपेठ) असे या शिक्षकांचे नाव आहे. यापूर्वीही या शिक्षकाने इतर विद्यार्थिनींना देखील अशा प्रकारची मारहाण केल्याची माहिती पुढे आली. मात्र ते पोलिसांपर्यंत आली नाही. ते प्रकरण शाळेतच संपविण्यात आले होते. या घटनेनंतर पिडीत विद्यार्थिनीला तिचे पालक घरी घेऊन गेले. मात्र घरी गेल्यावरही तिचा कान दुखत असल्याने रडत होती. अखेर तिला रूग्णालयात नेण्यात आले. अखेर मुलीच्या आईने याप्रकरणी त्या शिक्षकाचा विरोधात सीताबर्डी पोलिसात तक्रार केली.पोलिसांनी आरोपी शिक्षक चाचेरकर याच्या विरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. घडलेली घटना अतिशय गंभीर असून अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करणे आमच्या शिक्षण संस्थेची संस्कृती नाही. आरोपी शिक्षक जिल्हा परिषद शाळेतून अतिरिक्त (सरप्लस) झाल्याने २ वर्षांपूर्वी आमच्या संस्थेत रुजू झालेत. या शिक्षकाच्या विरोधात यापूर्वीही काही तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment