पेट्रोल, डिझेल भरता भरता ८०० जणांना चलान, हजारोंचा दंड; नेमका प्रकार काय?

 


पेट्रोल, डिझेल भरता भरता ८०० जणांना चलान, हजारोंचा दंड; नेमका प्रकार काय?


नवी दिल्ली: तुम्ही वाहनात इंधन भरताय आणि त्याचवेळी कॅमेऱ्यानं तुमच्या वाहनाचा फोटो टिपून तुम्हाला चलान पाठवलं तर? पेट्रोल, डिझेल भरताना कोण कशाला फोटो काढेल आणि त्यामुळे चलान कशाला पाठवलं जाईल, असे प्रश्न तुम्हाला पडतील. पण दिल्ली सरकारच्या परिवहन विभागानं एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महिन्याभरात अनेकांना चलान पाठवण्यात आलं आहे.
    प्रदूषण करणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारनं मोहीम हाती घेतली आहे. परिवहन विभागानं दिल्लीच्या चार पेट्रोल पंपांवर एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. वाहन चालक इंधन भरुन घेत असताना तिथे असलेले कॅमेरे वाहनाच्या नंबर प्लेटचे फोटो टिपतात. त्यानंतर वाहनाची संपूर्ण कुंडली समोर येते. वाहनाचं पीयूसी म्हणजेच पोल्युशन अंडर चेक सर्टिफिकेट आहे की नाही, हे तपासलं जातं. सध्याच्या घडीला हा प्रकल्प लहान स्तरावर सुरू आहे. त्याचे परिणाम पाहून तो मोठ्या स्तरावर राबवला जाऊ शकतो.
    एका हिंदी वृत्तवाहिनीनं यासंदर्भातील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. कोणकोणत्या पेट्रोल पंपांवर परिवहन विभागानं हा प्रोजेक्ट सुरू केला आहे, याबद्दल अधिक तपशील विचारला. पण परिवहन विभागानं याबद्दलची माहिती देण्यास नकार दिला. पेट्रोल पंपांची नावं उघड केल्यास वाहन चालक त्या पंपांवर जाणार नाहीत. त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, असं विभागानं सांगितलं. या मोहिमेत वाहतूक विभागाला फारसा खर्चदेखील येत नाही. पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेलेच असतात. त्यामुळे वाहनांच्या नंबरप्लेट नीट दिसतात.
    वाहनांच्या नंबरप्लेटचे फोटो पेट्रोल पंपच्या सर्व्हरवरुन दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाच्या अतिरिक्त सीपीयूकडे पाठवले जातात. पुढील काम कॉम्प्युटरच करतो. त्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज लागत नाही. पेट्रोल पंपांची नावं गोपनीय ठेवण्यात आली आहेत. फोटो नेमका कोणत्या पेट्रोल पंपावर काढण्यात आला, याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. महिन्याभरात आठशेपेक्षा अधिक वाहन चालकांना चलान पाठवण्यात आलं आहे. ४ पेट्रोल पंपांवरील मोहीम यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता पंपांची संख्या २५ वर नेण्यात आली. येत्या काही महिन्यांत हा प्रयोग ५०० पंपांवर राबवण्यात येईल.

    Post a Comment

    Previous Post Next Post