Monsoon Withdrawal: पुढच्या आठवड्यात मान्सूनची माघार? राज्यातील ९ जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत

 


Monsoon Withdrawal: पुढच्या आठवड्यात मान्सूनची माघार? राज्यातील ९ जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत


राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. राज्यातून नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मुंबईतून मान्सून माघारी फिरण्यास १० ऑक्टोबरनंतरच मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या महिन्यात (सप्टेंबर) सुरुवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळजवळ संपूर्ण महिनाभर राज्यात पावसाने हजेरी लावली. मान्सून आता माघारी फिरणार असल्याने मुंबईसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे. आठवडाभर विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यात या वर्षी काही जिल्ह्यांमध्ये कमी तर काही जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. राज्यात एकूण सरासरीच्या ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड या 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे.

९ जिल्ह्यांमधील पावसाची आकडेवारी

सांगलीत चार महिन्यांत सरासरी ४८६.१ मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा २७२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सांगलीत यावर्षी ४४ टक्के पावसाची तूट आहे.

साताऱ्यात यंदा ५३५.६ मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ८४४.६ मिमी पाऊस होत असतो, त्यामुळे ३७ टक्के पावसाची तूट आहे.


सोलापुरात सरासरी ४५८.१ मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा फक्त ३१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापुरात ३० टक्के पावसाची तूट आहे.

मराठवाड्यातील जालन्यात सरासरीपेक्षा जास्त तूट आहे. जालन्यात सरासरी ५९१.८ मिमी पाऊस होतो. ३३ टक्के पावसाची तूट असून यंदा ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बीडमध्ये सरासरी ५५७.४ मिमी पाऊस होत असतो, मात्र यंदा ४३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीडमध्ये २१ टक्के तूट आहे.

उस्मानाबादेत प्रत्यक्षात ४४२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबादेत सरासरी ५७९.६ मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा २४ टक्क्यांची तूट आहे.

हिंगोलीत ५८३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा २३ टक्के पावसाची तूट दिसते आहे.

पश्चिम विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट दिसतेय. अकोल्यात प्रत्यक्षात ५३२.९ मिमी पाऊस झालाय. सरासरी ६९४.२ मिमी पाऊस होत असतो अशात २३ टक्के पावसाची तूट दिसते आहे.

अमरावतीमध्ये सरासरी ८२२.९ मिमी पाऊस होतो. यंदा ६०४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीत २७ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.

राज्यातील मुंबईसह उपनगरांत, ठाणे, पालघर आणि नांदेडमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post