66 देशांतून 1 लाख 70 हजार किमी प्रवास करणाऱ्या महिलेवर भारतात सामूहिक बलात्कार - latursaptrangnews

Breaking

Monday, March 4, 2024

66 देशांतून 1 लाख 70 हजार किमी प्रवास करणाऱ्या महिलेवर भारतात सामूहिक बलात्कार

 




66 देशांतून 1 लाख 70 हजार किमी प्रवास करणाऱ्या महिलेवर भारतात सामूहिक बलात्कार


झारखंडमध्ये एका स्पॅनिश पर्यटक तरुणीसोबत झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे.

झारखंडचे डीजीपी अजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर तीन आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल.”

हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. त्यांनी म्हटलं की, “जे कोणी दोषी असतील, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.”

परदेशी पर्यटकासोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या या घटनेने झारखंडमधील पोलीस प्रशासन आणि कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती

मूळ ब्राझीलची असलेली स्पॅनिश तरूणी हियाना आणि तिचा नवरा जॉन (दोघांचीही नावं बदललेली आहेत) या दोघांनीही 2 मार्चला सकाळी आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसमध्ये ही गोष्ट लिहिली होती.

हे या दोघांचं एकत्रित अकाउंट आहे. त्यासोबतच दोघांनी दोन व्हीडिओही पोस्ट केले होते.

या व्हीडिओमध्ये हियाना आणि जॉन यांनी त्यांच्यासोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. स्पॅनिश भाषेत रेकॉर्ड केलेला त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हीडिओमध्ये त्यांनी म्हटलं की, “आमच्यासोबत जे झालं, ते इतर कोणासोबतही होऊ नये असं आम्हाला वाटतं. सात जणांनी माझ्यावर बलात्कार केला. त्या लोकांनी आम्हाला मारहाण केली आणि लूटमारही केली. त्या लोकांना माझ्यावर बलात्कारच करायचा होता. आम्ही आता पोलिसांसोबत हॉस्पिटलमध्ये आहोत. आमच्यासोबतची ही घटना भारतात झाली आहे.”

दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये जॉन सांगतात, “माझा चेहरा खराब झाला आहे. पण माझ्यापेक्षाही वाईट अवस्था हियानाची आहे. त्या लोकांनी मला हेल्मेटने मार दिला. त्यादिवशी जॅकेट घातलं होतं. त्यामुळे कमी मार बसला. त्यासाठी ईश्वराचे आभार.”

या व्हीडिओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमांचे व्रण दिसत आहेत. हा व्हीडिओ हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे.

त्यानंतर हियानाने आपल्या वैयक्तिक इन्स्टाग्राम प्रोफाइलवर स्टेटस ठेवून सांगितलं की, पोलिसांनी तिला या प्रकरणाची माहिती पोस्ट करण्यासाठी मनाई करत आहेत. कारण त्यामुळे तपासात अडचणी येऊ शकतात.

जॉन आणि हियाना स्पॅनिश पर्यटक आहेत. जॉन स्पेनमधील ग्रेनेडा शहरातील आहेत. हियाना मूळ ब्राझीलची आहे, मात्र तिने स्पेनचे नागरिकत्व स्वीकारलं आहे. या दोघांकडेही स्पॅनिश पासपोर्ट आहेत.

हे दोघं नवरा-बायको मोटरसायकलवरून जगभ्रमंतीला निघाल्याचं त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर नमूद केलं आहे. गेल्या पाच वर्षांत दोघांनी 66 देशांमधून प्रवास करत एक लाख 70 हजार किलोमीटरचं अंतर पार केलं आहे.

महिला

फोटो स्रोत,FACEBOOK

भारतातून ते नेपाळमध्ये आणि तिथून ऑस्ट्रेलियाला जाणार होते. हे दोघंही स्वतंत्रपणे त्यांच्या मोटरसायकलवरून सोबत निघाले होते.

जॉन आणि हियाना इराण, इराक, तुर्कीए, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबिया, जॉर्डन, इटली, जॉर्जिया आणि अफगाणिस्तानचा प्रवास करून आले होते.

हे जोडपं सहा महिन्यांपासून भारतात होतं. झारखंडमध्ये येण्याआधी त्यांनी दक्षिण भारत, काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या होत्या.

सोशल मीडियावर या दोघांचेही लाखो फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामखेरीज ते युट्यूबवरही सक्रीय आहेत.

झारखंडमध्ये नेमकं काय झालं?

हियाना आणि जॉन त्यांच्या मोटरसायकलवरून झारखंड मार्गे भागलपूरकडे निघाले होते. बिहारमार्गे नेपाळला जाण्याचं त्यांचं नियोजन होतं. हे दोघेही टूरिस्ट व्हिसावर भारतात फिरत होते.

एक मार्चच्या रात्री ते दुमका जिल्ह्यातील कुरमाहाट (कुंजी) या छोट्याशा गावाजवळ रस्त्यापासून थोडं लांब एका ठिकाणी तंबूमध्ये झोपले होते. तेव्हा तिथे काही मुलं पोहोचली. त्यांनी आपल्या दुसऱ्या साथीदारांनाही बोलावून घेतले. ते सगळे तंबूमध्ये घुसले आणि त्यांनी हियानाला ताब्यात घेतलं.

हियाना आणि जॉनला मारहाण करण्यात आली. हियानासोबत कथितरित्या बलात्कार करून ही मुलं घटनास्थळाहून फरार झाली. या दरम्यान त्यांनी लूटमारही केली.

कुमरहाट

फोटो स्रोत,RAVI PRAKASH /BBC

या घटनेमुळे प्रचंड घाबरलेले जॉन आणि हियाना आपलं सामान घेऊन रस्त्यावर आले. पेट्रोलिंगवर असलेल्या हंसडीहा स्टेशनच्या पोलिसांनी रात्री साडे दहाच्या आसपास दोघांनाही वाईट अवस्थेत पाहिलं आणि त्यांची विचारपूस केली.

नंतर पोलीस त्यांना घेऊन सरैयाहाट इथल्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांना हियानासोबत सामूहिक बलात्कार आणि लूट झाल्याची माहिती मिळाली.

संवाद साधण्यात अडचणी

दुमकाचे पोलिस अधीक्षक पीतांबर सिंह खेरवार यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांची अवस्था पाहूनच त्यांच्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचं हंसडीहा पोलिसांच्या लक्षात आलं.

पण भाषेच्या अडचणीमुळे त्यांना थेट संवाद साधताना अडचण येत होती.

पीतांबर सिंह खेरवार यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “ते दोघं केवळ स्पॅनिश बोलत होते. त्यांचं इंग्रजी पण मोडकं-तोडकं होतं. आमचे पोलीस त्यांच्याशी हिंदीमध्येच बोलत होते. त्यामुळे सुरूवातीला कळलंच नाही की, त्यांच्यासोबत नेमकं काय झालंय ते.”

“हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने पोलिसांना त्यांनी सगळं सांगितलं. त्यांनी आरोपींचंही वर्णन केलं. मध्यरात्री मला सगळ्या घटनेची माहिती मिळाली आणि मी घटनास्थळी दाखल झालो.

पोलिसांनी रात्रीतूनच काही आरोपींना अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी या घटनेतला आपला सहभाग मान्य केला आणि आपल्या अन्य साथीदारांची नावंही सांगितली. आम्ही त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या अनेक टीम या कामी सक्रीय झाली आहेत.”

झारखंड पोलिस

फोटो स्रोत,RAVI PRAKASH /BBC

“आम्ही लवकरच सर्व आरोपींना अटक करू. हे प्रकरण परदेशी नागरिकांशी संबंधित आहे. त्यामुळे आम्हाला तपासादरम्यान आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलही पाळावे लागत आहेत. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्यांना दुमका इथे आणून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे, जेणेकरून पुढील कारवाई नीट पार पडेल.”

त्यांनी माहिती दिली की, स्पॅनिश पर्यटकांचा जबाब न्यायालयात सीआपपीसीच्या कलम 164 अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांकडे परदेशी पर्यटकांच्या दुमका इथे येण्याची आणि कँप करून राहण्याची कोणतीही माहिती नव्हती.

दूतावासाला माहिती

स्पॅनिश नागरिकांसोबत घडलेल्या या घटनेनंतर भारतातील स्पॅनिश दूतावासातील अधिकाऱ्यांनी झारखंडमधील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

माध्यमांमधील वृत्तानुसार दूतावासातील एक अधिकारी दुमका इथे जाऊन पीडितेची भेट घेतील आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतील.


झारखंडमध्ये दरदिवशी 4 हून अधिक महिलांवर बलात्कार

झारखंडमध्ये महिलांविरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढत आहेत.

झारखंड पोलिसांच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार दररोज सरासरी चारहून अधिक महिलांसोबत बलात्काराच्या घटना घडत आहेत.

गेल्या 9 वर्षांत झारखंडमध्ये बलात्काराच्या एकूण 13,533 घटना नोंदविण्यात आल्या. या प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्याची आकडेवारी फार समाधानकारक नाही.

झारखंड पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2015 ते 2023 दरम्यान राज्यात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचे एकूण 13,533 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment