विवेकानंद रुग्णालयात क्लिष्ट हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
लातूर : येथील विवेकानंद रुग्णालयात आणखी एका रुग्णावर क्लिष्ट हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
विवेकानंद रुग्णालयात मागील दोन वर्षांमध्ये गंभीर, जन्मजात हृदय विकृतींसाठी शेकडो यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व हृदय शस्त्रक्रिया समाजहितैषी दात्यांच्या सहकार्यामुळे व विविध योजनांतर्गत विनामूल्य करणे रुग्णालयाला शक्य झाले आहे. या अंतर्गतच जून २०२४ महिन्यातील हृदय शस्त्रक्रिया शिबिरात एक १९ वर्षीय स्त्री रुग्ण दाखल झाली. तिला, VSD (Ventricular Septal Defect) व DCRV (Double Chambered Right Ventricle) या जन्मजात हृदय विकृती होत्या. VSD मध्ये हृदयाच्या डाव्या व उजव्या निलयामध्ये छिद्र असल्याकारणाने दोन्ही निलयातील रक्त एकत्र मिसळते. परिणामी हृदयाची कार्यक्षमता कमी होते, तसेच DCRV मध्ये उजच्या निलयामध्ये उच्च दाद व कमी दाव असे दोन भाग तयार होतात. या हृदय विकृतीसाठी VSD Repair (Closure) व DCRV Repair ही शस्त्रक्रिया केली जाते. तर वर उल्लेख केलेल्या रुग्णास भूक न लागणे, वजनात वाढ न होणे, क्रियाशक्ती कमी असणे अशी लक्षणे दिसत होती. ही रुग्ण यापूर्वी उपचारासाठी २ - ३ रुग्णालयात गेली होती. परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च परवडत नसल्याकारणाने (कुटुंबामध्ये आई एकटी आहे) रुग्णाने शस्त्रक्रिया टाळली. विवेकानंद रुग्णालयात होणाऱ्या मोफत हृदय शस्त्रक्रिया शिविराची माहिती मिळताच रुग्ण उपचारासाठी दाखल झाली. दि. २९.०६.२०२४ रोजी आवश्यक पूर्व तपासण्या केल्यानंतर VSD Closure ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या रुग्णावर करण्यात आली. दोन गंभीर स्वरुपाच्या हृदय विकृतीमुळे शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती. तरीही सदर शस्त्रक्रिया डॉक्टरांनी कुठल्याही गुंतागुंतीशिवाय पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची प्रकृती स्थिर होती. शस्त्रक्रियेनंतरही रुग्णामध्ये समाधानकारक सुधारणा होत राहिली. एक आठवड्यानंतर रुग्णास सुट्टी करण्यात आली. आज एक महिन्यानंतर रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. सदर रुग्णाच्या आईने 'माझ्या गंभीर हृदय विकृतीने ग्रस्त असणाऱ्या मुलीवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करुन बरे केले ही आम्हाला खूप मोठी मदत झाली' असे भावपूर्ण उद्गार काढले, तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन ऑपरेशन करण्याचा पर्याय आम्हाला सुचवला गेला होता. परंतु विवेकानंद रुग्णालयावर आमचा विश्वास असल्यामुळे येथे आलो. डॉक्टर व संपूर्ण टिम, रुग्णालय प्रशासन यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. या रुग्णावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया डॉ. सारंग गायकवाड हृदय शल्यचिकित्सक (मुंबई), डॉ. नितीन येळीकर हृदयरोग तज्ज्ञ (लातूर) व त्यांची टिम डॉ. प्रविण लोहाळे (भूलतज्ञ), डॉ. प्रमोद तोष्णीवाल (बालरोग तज्ञ), डॉ. चंद्रशेखर औरंगाबादकर (अतिदक्षता विभाग तज्ञ), निवासी वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ वा चमूने पार पाडली.
No comments:
Post a Comment