Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन भारतात दाखल, हिंसाचारात 90 हून अधिक मृत्युमुखी

     

    शेख हसिना

    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन भारतात दाखल, हिंसाचारात 90 हून अधिक मृत्युमुखी


    बांगलादेशात काय घडतंय?

    • बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी देश सोडल्याचं आणि राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
    • 2009 पासून शेख हसीना पंतप्रधान पदावर होत्या. बीबीसी बांगलाच्या माहितीनुसार त्यांनी भारतात दिल्लीमधील हिंडन विमानतळावर दाखल झाल्या.
    • गेले अनेक दिवस बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी राजीनामा दिला आहे. या हिंसाचारात किमान 90 जणांचे प्राण गेले आहेत असं सांगण्यात येत आहे.
    • काही आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरावर चालून गेल्याचं सांगण्यात येत आहे.
    • आम्ही देशातल्या सर्व पक्षांना इथं चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. सर्वांशी चर्चा केल्यानंतर आम्ही अंतरिम सरकार स्थापन करत आहोत, असं बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार यांनी म्हटलंय. आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या जातील. आंदोलकांनी हिंसक आंदोलन करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
    • भारताच्या सीमा सुरक्षा दलाने बांगलादेशशी असलेल्या 4,096 किमी सीमेवर अलर्ट जाहीर केला आहे.

    फोटो स्रोत,Getty Images

    शेख हसीना भारतातच का आल्या असाव्यात?

    शेख हसीना यांचं भारतासोबत जुनं नातं आहे. त्यांचे पिता आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते शेख मुजीबुर रहमान यांची 1975 साली कुटुंबासोबत हत्या झाली होती.

    त्यानंतरच्या काळात भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या शेख हसीना आणि त्यांच्या बहि‍णींना दिल्लीत आश्रय दिला होता. हसीना तेव्हा जवळपास सहा वर्ष दिल्लीत राहिल्या होत्या.

    1996 साली शेख हसीना पहिल्यांदा सत्तेत आल्या होत्या, तेव्हापासूनच शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीग या पक्षाशी भारताचं उत्तम नातं आहे आणि या नात्याचा दोन्ही देशांना फायदाही झाला.

    2009 नंतर म्हणजे गेली पंधरा-सोळा वर्ष ढाकामध्ये हसीनांचं सरकार असणं भारतासाठी महत्त्वाचं ठरलं.

    बांगलादेशच्या तीन बाजूच्या जमिनीवरील सीमा भारतातल्या ईशान्येकडील राज्यांनी व्यापल्या आहेत. इथल्या काही राज्यांमधल्या फुटीरतावाद्यांचा बिमोड करताना, भारताला बांगलादेशाशी असलेल्या मैत्रीचा फायदा झाला.

    शेख हसीना सत्तेत असताना त्यांनी देशातल्या भारतविरोधी कट्टरवादी गटांवर कारवाई केली होती, ज्यामुळे त्यांचं दिल्लीसोबतचं नातं आणखी चांगलं झालं. ईशान्येकडेच्या राज्यांतून भारतात होणाऱ्या वाहतुकीला बांगलादेशातून जाण्यासाठी हसीना यांनी परवानगी दिली होती.

    2022 साली भारताच्या दौऱ्यावर संवाद साधताना शेख हसीना यांनी भारतानं 1971 च्या युद्धात बांगलादेशची मदत केली होती याची आपल्या मायदेशातल्या लोकांना आठवण करून दिली होती,

    पण दिल्लीसोबतचं हसीना यांचं घनिष्ठ नातं आणि भारताचा त्यांना असलेला पाठिंबा यावर विरोधी पक्षांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा टीका केली आहे. या टीकाकारांचं म्हणणं आहे, की भारतानं बांगलादेशच्या लोकांना मदत करायला हवी, कुठल्या एका पक्षाला नाही.

    बांगलादेशात सरकारविरोधी ताज्या हिंसाचारात किमान 90 जण मारले गेले आहेत. याठिकाणी पोलीस आणि सरकारविरोधी आंदोलकांमध्ये संघर्ष चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

    दरम्यान, बांगलादेशातील सिल्हेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांनी देशात राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांना दूतावासाशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे.

    बांगलादेश

    फोटो स्रोत,Getty Images

    विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत नागरी असहकाराची चळवळ सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा हिंसक आंदोलन सुरू झालं आहे.

    सिराजगंज जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर एकाचवेळी हजारो लोकांनी हल्ला केला. यात 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    पोलिसांनी रविवारी काही भागांमध्ये आंदोलकांवर रबरी गोळ्या आणि अश्रुधुराचा मारा केल्याचंही पाहायला मिळालं. यामध्ये सुमारे 200 जण जखमी झाले आहेत.

    देशभरात सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनानं रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.

    गेल्या महिन्यात बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेली कोटा सिस्टीम बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं. पण आता या आंदोलनानं सरकारविरोधी आंदोलनाचं व्यापक रूप घेतलं आहे.


    बांगलादेशमधील प्रशासन या प्रकरणात संयम बाळगत असल्याचं, कायदे मंत्री अनिसुल हक यांनी बीबीसीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

    “आम्ही संयम दाखवला नसता, तर प्रचंड रक्तपात झाला असता. पण आमच्या संयमालाही मर्यादा आहेत,” असं हक म्हणाले.

    बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

    ढाका परिसरातील 4G इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून ब्रॉडबँड सेवा सुरू राहणार असल्याचं, बांगलादेश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी कमिशन (BTRC) च्या अधिकाऱ्यांनी बीबीसी बंगालीशी बोलताना सांगितलं.

    4G आणि 3G चा वापर करून लोकांना मोबाईलद्वारे संवाद साधता येणार नाही. या सेवा कधी पूर्ववत होतील, याबाबत मात्र काहीही माहिती समोर आलेली नाही.


    हसिनांनी पायउतार व्हावे-आंदोलक

    देशभरात आंदोलकांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना समोर येत आहे. बोगरा, पाब्ना आणि रंगपूर या जिल्ह्यांतही अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत.

    बांगलादेशातील ढाक्याच्या मुख्य चौकात हजारो लोक जमल्याचं पाहायला मिळालं. तसंच देशभरात इतर भागांतही हिंसक आंदोलनं पाहायला मिळाली आहेत.

    काही भागांमध्ये आवामी लीगचे समर्थक आणि सरकारविरोधी आंदोलक यांच्यात संघर्ष होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

    “संपूर्ण शहरालाच जणू युद्धभूमीचं रूप आलं आहे,” अशी प्रतिक्रिया एका पोलीस कर्मचाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. हजारोंच्या संख्येत आलेल्या आंदोलकांनी रुग्णालयाबाहेरच्या कार, दुचाकींना आग लावल्याचंही त्यांनी सांगितलं.

    बांगलादेशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात पुन्हा हिंसाचार भडकला आहे.

    फोटो स्रोत,Getty Images

    फोटो कॅप्शन,बांगलादेशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात पुन्हा हिंसाचार भडकला आहे.

    सरकारविरोधी आंदलोनामागं असलेल्या 'स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन' या गटानं पंतप्रधानांनी पायउतार व्हावं अशी मागणी केली आहे.

    या गटानं रविवारपासून देशभरात असहकार चळवळीची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत नागरिकांनी कर आणि सेवांची बिलं न भरण्याची विनंती करण्यात आली आहे. तसंच सर्वप्रकारचे कारखाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

    जुलैमध्ये बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात सुमारे 200 हून अधिक लोक मारले गेले होते. त्यापैकी अनेकजण पोलिसांच्या गोळीनं मारले गेले होते.

    भारतीय दूतावासाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

    बांगलादेशातील सिल्हेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांनी तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांना दूतावासाशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे.

    भारतीय सहाय्यक उच्चायोगाने म्हटले आहे की, "सिल्हेटमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहण्याची विनंती करण्यात आली आहे आणि त्यांनी सतर्क रहावं."

    दूतावासाकडून आपत्कालीन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. "आपत्कालीन परिस्थितीत, कृपया +88-01313076402 वर संपर्क साधा," अशा सूचना भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

    बांगलादेशातील सिल्हेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
    फोटो कॅप्शन,बांगलादेशातील सिल्हेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना

    बांगलादेशातील भारतीय दूतावासाने 18 जुलै रोजी जारी केलेल्या सूचना त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पिन करून ठेवल्या आहेत.

    या सल्ल्यानुसार, "लोकांना स्थानिक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे लोक जिथे आहेत तिथेच थांबण्याचा आणि घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे."

    दोन आठवड्यांत 10 हजार आंदोलकांना अटक

    गेल्या दोन आठवड्यांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सुमारे 10,000 लोकांना अटक करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विरोधकांचे समर्थक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

    आवामी लीगच्या वतीनंही रविवारी देशभरात मोर्चे काढण्यात आले.

    या दोन्ही गटांसाठी आगामी काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

    "शेख हसिना यांनी फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांच्यावर लोकांची हत्या, लूटमार आणि भ्रष्टाचार प्रकरणी खटला चालवायला हवा,” अशी मागणी विद्यार्थी नेते नाहीद इस्लाम यांनी केली आहे. शनिवारी ढाक्यात हजारो लोकांना संबोधित करताना त्यांनी ही मागणी केली.

    आंदोलन

    हे आंदोलन म्हणजे शेख हसिना यांच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. जानेवारीत झालेल्या निवडणुकीत सलग चौथ्यावेळी शेख हसिना यांची सत्ता आली होती. पण प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला.

    त्यानंतर बांगलादेशच्या 1971 च्या युद्धात सहभागी असलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांत देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या महिन्यात विद्यार्थी रस्त्यांवर उतरले होते.

    सरकारच्या एका निर्णयानंतर बहुतांश कोटा कमी करण्यात आला. पण त्यानंतरही या आंदोलनात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले विद्यार्थी यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच होतं. आता या विद्यार्थ्यांनी हसिना यांनी पदावरून उतरावं अशी मागणी केली आहे. हसिना यांच्या समर्थकांनी मात्र राजीनामा देऊ नये असं म्हटलं आहे.


    शेख हसिना यांनी विद्यार्थ्यांबरोबर बिनशर्त चर्चेची तयारी दाखवली होती. हिंसाचार संपवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतल्याचं म्हटलं होतं.

    "मला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर बसून त्यांचं म्हणणं ऐकूण घ्यायचं आहे. मला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे," असं त्यांनी म्हटलं होतं.

    पण आंदोलक विद्यार्थ्यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळला होता.

    गेल्या महिन्यात आंदोलनात अनेक पोलीस ठाणी आणि सरकारी कार्यालयं जाळल्यानंतर हसिना यांनी लष्कराला पाचारण केलं होतं.

    त्यानंतर लष्करानं एक निवेदन जारी केलं होतं. बांगलादेशच लष्कर कायम लोकांबरोबर आहे. लोकांच्या हितासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी काम करत राहणार असल्याचं त्यात म्हटलं होतं.

    1947 - भारतावरील ब्रिटिशांचं वसाहतवादी साम्राज्याचा शेवट. भारताच्या दोन्ही बाजूस मुस्लिम बहुसंख्याक पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यामध्ये 1,500 किमी पेक्षा जास्त भारतीय भूप्रदेश पसरलेला आहे.

    1949 - पश्चिम पाकिस्तानपासून स्वायत्तता मिळवण्यासाठी अवामी लीगची स्थापना झाली.

    1970 - अवामी लीगनं पूर्व पाकिस्तानात निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला. पश्चिम पाकिस्तानातील सरकारनं निवडणुकीचा निकाल स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यातून दंगली झाल्या.

    पूर्व पाकिस्तानला चक्रीवादळाचा तडाखा बसला, 5,00,000 लोक मारले गेले.

    पूर्व पाकिस्तानचं स्वातंत्र्य

    1971 - अवामी लीगनं पूर्व पाकिस्तान हा स्वतंत्र बांगलादेश असल्याची घोषणा केली. भारताच्या मदतीनं युद्धात पाकिस्तानचा पराभव.

    1972 - अवामी लीगचे नेते शेख मुजिबुर रहमान बांगलादेशचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी देशातील प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यास सुरूवात केली.

    1974 - बांगलादेशात आलेल्या महापूरामुळे धान्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, अंदाजे 28,000 लोकांचा मृत्यू झाला.

    1975 - ऑगस्टमध्ये झालेल्या लष्करी उठावात पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान यांची हत्या करण्यात आली. बांगलादेशात मार्शल लॉ लावण्यात आला.

    1977 - जनरल झियाउर रहमान बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झाले.

    1981 - अयशस्वी झालेल्या उठावात राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांची हत्या झाली.

    इर्शाद युग

    1982 - जनरल हुसैन मुहम्मद इर्शाद यांनी सत्ता काबीज केली.

    1983 - मर्यादित राजकीय हालचालींना परवानगी देण्यात आली.

    1986 - राष्ट्राध्यक्ष इर्शाद यांनी मार्शल लॉ हटवला आणि राज्यघटना पुन्हा प्रस्थापित केली.

    1987 - विरोधकांची निदर्शनं आणि संपानंतर देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली.

    1988 - इस्लाम हा राष्ट्रीय धर्म बनला. पुरामुळे लाखो लोक बेघर झाले.

    1990 - मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इर्शाद यांनी पदाचा राजीनामा दिला.

    1991 - राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांच्या विधवा बेगम खालिदा झिया देशाच्या पंतप्रधान झाल्या. सत्तेची सूत्रं राष्ट्राध्यक्षांपासून दूर जातात.

    अवामी लीग सत्तेत परतली

    1996 - शेख मुजिबुर रहमान यांची मुलगी शेख हसीना वाजिद यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीग सत्तेत परतली.

    1998 - आतापर्यतच्या सर्वात विनाशकारी पुरात दोन-तृतियांश देश उद्ध्वस्त झाला. 1975 मध्ये राष्ट्राध्यक्ष मुजिबुर रहमान यांच्या हत्येतील सहभागाबद्दल पंधरा माजी लष्करी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

    2001 ऑक्टोबर - खालिदा झिया यांची नॅशनॅलिस्ट पार्टी आघाडी सरकारद्वारे सत्तेत आली.

    2002 मार्च - महिलांवरील वाढत्या हिंसेमुळे निर्माण झालेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अॅसिड हल्ल्यांसाठी फाशीची शिक्षा असणारा कायदा आणला.

    2004 मे - बांगलादेशच्या संसदेत महिला खासदारांसाठी 45 जागा राखीव ठेवण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली.

    2007 एप्रिल - वर्षभराच्या हिंसक राजकीय अशांततेनंतर काळजीवाहू सरकारनं शेख हसीना यांच्यावर खूनाचा आरोप ठेवला. बेगम खालिदा झिया यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.

    2008 डिसेंबर - सार्वत्रिक निवडणुका : अवामी लीगनं संसदेच्या 300 पैकी 250 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. शेख हसिना यांनी जानेवारी महिन्यात देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

    2009 फेब्रुवारी - वेतन आणि अटींबाबत नाराज असलेल्या सीमासुरक्षा दलाच्या जवानांनी (बॉर्डर गार्ड्स) ढाक्यात बंड केलं. त्यामध्ये जवळपास 74 लोक, ज्यात बहुतांश लष्करी अधिकारी होते, ठार झाले. पोलिसांनी सीमासुरक्षा दलाच्या 700 जवानांना अटक केली. मे महिन्यात आणखी 1,000 जवानांना ताब्यात घेण्यात आलं.

    2013 एप्रिल - इस्लामवरील टीकेला बेकायदेशीर ठरवणाऱ्या इस्लामिक विधेयकाविरुद्ध शेख हसीना यांनी व्हेटोचा वापर केला.

    2013 मे - एप्रिल महिन्यात कपड्यांच्या एका कारखान्याची इमारत कोसळून 1,100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर युरोपियन किरकोळ विक्रेत्यांनी कारखान्यांमधील सुरक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी करार करण्याचं आश्वासन दिलं.

    2013 जुलै - जमात-ए-इस्लामी पक्षाचे नेते गुलाम आझम यांना 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धामध्ये युद्धगुन्हे (war crimes) करण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं. नंतरच्या काळात जमातच्या इतर अनेक नेत्यांना दोषी ठरवलं गेलं.

    2015 मे - बांगलादेशात अन्सारुल्लाह बांगला टीम या इस्लामिक दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात आली. या संघटनेनं धर्मनिरपेक्षतेला समर्थन देणाऱ्या नेत्यांची हत्या करण्याची आणि त्यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

    2016 जुलै - ढाक्यामधील डिप्लोमॅटिक क्वार्टरमधील एका कॅफेमध्ये हल्ला केल्याचा दावा इस्लामिक स्टेट संघटनेनं केला. त्यामध्ये 20 जणांना ओलिस ठेवण्यात आलं होतं. ज्यात 18 जण परदेशी नागरिक होते. हे 20 जण ठार झाले होते. मात्र सरकारनं इस्लामिक स्टेटचा दावा फेटाळत सांगितलं की या हल्ल्यासाठी जमात-उल-मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना जबाबदार आहे.

    2017 ऑक्टोबर - म्यानमार मधील राखाइन प्रांतातील लष्करी कारवाईनंतर तिथून पलायन करून बांगलादेशात शरण घेणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांची संख्या अंदाजे दहा लाख होती.

    2018 फेब्रुवारी - विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावर्षी होणारी निवडणूक लढवण्यास त्यांना अपात्र ठरवण्यात आलं.

    2018 डिसेंबर - सत्ताधारी अवामी लीगनं संसदेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड विजय मिळवला. मात्र हिंसाचार, धमकावणं आणि मतांमध्ये घोटाळा झाल्याच्या वृत्तांमुळे प्रचाराला फटका बसला. अवामी लीग आणि विरोधकांच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत किमान 17 जणांचा मृत्यू झाला.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad