'जे माझ्यासोबत घडलं, ते इतर कुणासोबतही घडू नये,' रेल्वेत मारहाण झालेल्या अश्रफ यांनी काय सांगितलं?

 



'जे माझ्यासोबत घडलं, ते इतर कुणासोबतही घडू नये,' रेल्वेत मारहाण झालेल्या अश्रफ यांनी काय सांगितलं?

“मला त्यांनी लाथा बुक्क्यांनी चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर मारलं, लघवीच्या जागी मारलं. मी 72 वर्षांचा. मी एकटाच होतो आणि समोर 10-15 जण तरुण मुलं होती. मी काय बोलू शकलो असतो? तुम्हीच विचार करा.

मला नीट दिसतही नव्हतं, चालता येत नव्हतं. असा प्रसंग कधीही कोणासोबतही घडू नये भविष्यात. मला यामुळे खूप मानसिक धक्का बसला आहे,” उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगावचे रहिवासी असलेले 72 वर्षीय अश्रफ अली सय्यद हुसैन बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.

व्हीलचेअरवरती बसलेल्या अश्रफ यांचे डोळे सुजलेले दिसत होते. डोळ्याखाली मारहाणीचे व्रण दिसत होते. ते अजूनही ‘त्या’ दिवशीच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.


28 ऑगस्ट रोजी धुळे-मुंबई एक्सप्रेसमधून कल्याण येथे राहणाऱ्या आपल्या मुलीच्या घरी जाण्यासाठी प्रवास करत असताना त्यांना काही तरुणांनी मारहाण आणि धक्काबुक्की केली. तुमच्याजवळ 'गोमांस' आहे असा आरोप करत या तरुणांनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसंच या घटनेचा व्हीडिओ समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झाला.

अश्रफ अली गेल्या 15 वर्षांपासून चाळीसगाव ते मुंबई असा प्रवास करत आहेत. त्यांची मुलगी मुंबईजवळील कल्याण येथे राहते. तिला भेटण्यासाठी ते येत असतात.

28 ऑगस्ट रोजी आपल्या मुलीला भेटण्यासाठी ते चाळीसगावहून मुंबई एक्सप्रेसमध्ये चढले. ही रेल्वे नाशिकपर्यंत पोहोचली तोपर्यंत सीटवरून त्यांच्या समोर बसलेल्या काही मुलांसोबत त्यांची बाचाबाची झाली.

या घटनेचा धक्का अश्रफ यांच्या संपूर्ण कुटुंबाला बसला आहे.

फोटो स्रोत,Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन,या घटनेचा धक्का अश्रफ यांच्या संपूर्ण कुटुंबाला बसला आहे.

या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे आरोपी पोलीस भरतीसाठी धुळ्याहून मुंबईला चालले होते.

पोलिसांनी सुरुवातीला मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यामुळे आरोपींना तत्काळ जामीनही मिळाला.

परंतु 2 सप्टेंबर रोजी पोलिसांनी धार्मिक भावना भडकवणे, मालमत्तेची चोरी आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे जामीन मिळालेल्या तीन आरोपींना पुन्हा अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. तसंच अद्याप तीन आरोपी फरार आहेत.

अश्रफ यांची प्रकृती आता कशी आहे?

2 सप्टेंबर रोजी अश्रफ यांची तब्येत खालावल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात. तसंच त्यांना गंभीर जखमा झाल्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी त्यांना 2 सप्टेंबरला सुरुवातीला ठाणे सरकारी रुग्णालय, कळवा सरकारी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात हेलपाटे घालावे लागल्याचं त्यांचे वकील सैफ आलम सांगतात.

अश्रफ यांची प्रकृती आता कशी आहे?

फोटो स्रोत,Shardul Kadam/BBC

ते म्हणाले, “2 सप्टेंबरला तब्बल 12 तासांपासून आम्ही त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचणी करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयात फिरत आहोत. कुठे MRI होत नाही तर कुठे डोळ्याची चाचणी होत नव्हती. यामुळे आम्ही दिवसभरात त्यांना घेऊन तीन सरकारी रुग्णालयं पालथी घालावी लागली. रात्री 10 वाजल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्या आम्ही करू शकलो. त्यासाठीही आम्हाला राजकीय नेत्यांची मदत घ्यावी लागली.”

अश्रफ यांना सध्या उजव्या डोळ्याने नीट दिसत नसून लघवी करतानाही त्रास होत असल्याचं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

‘चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून द्या.... ते बोलत होते’

रेल्वेतील घटनेची माहिती देताना ते म्हणाले, “ माझ्यासमोर 10-15 मुलं बसली होती. माझी दाढी आणि टोपी पाहून त्यांनी मला बॅगेत काय आहे विचारलं. मी म्हणालो, काही नाहीय. त्यावर ते म्हणाले की, आम्हाला वाटतं यात मटण आहे. मी नाही म्हणाल्यावर त्यांनी मला पिशवी उघडण्यासाठी सांगितलं. तुम्ही कोण आहात हे सांगणारे, असं मी उत्तर दिल्यावर त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. मला मारायला सुरुवात केली.”

अश्रफ यांना कल्याणला उतरायचे होते, पण त्यांना उतरू दिले नाही.

“कल्याणपासून ते ठाणे स्टेशन येईपर्यंत ते मला मारत होते. त्यांच्यापैकी एक-दोन मुलं म्हणाली की ‘याला बाहेर फेकून द्या, चालत्या गाडीतून बाहेर फेका’ पण प्लॅटफॉर्मवरती गाडी पोहोचल्याने त्यांनी मला बाहेर फेकलं नाही. बाकीचे काही लोक त्या मुलांना समजवत होते की वृद्ध आहेत असं करू नका, त्यांना सोडून द्या,” अश्रफ हताश होऊन सांगत होते.

अश्रफ यांचा मुलगा अश्फाक

फोटो स्रोत,Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन,अश्रफ यांचा मुलगा अश्फाक

हा प्रसंग खूप धक्कादायक होता आणि आपल्या संपूर्ण 72 वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आपल्यासोबत हे असं घडल्याचं अश्रफ सांगतात.

“तसंच, आपला शर्ट फाडून त्यातून 2,800 रुपये होते ते काही मुलांनी घेतले, मोबाईल घेतला आणि मोबाईलचं लॉक खोलायला लावलं.” असंही ते सांगतात.

ते पुढे म्हणाले, “माझ्यासोबत जे घडलं ते कोणत्याही मनुष्यासोबत घडू नये. असा अत्याचार कोणाही सोबत होऊ नये. मला मारल्यानंतर नीट दिसत नव्हता ना नीट चालता येत नव्हतं. मी तसाच तिथून निघून गेलो.”

अश्रफ यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना जामिनानंतर पुन्हा अटक केली जाणार आहे. तर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे.

“मला हिंदुस्थान, भारत देशाच्या न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. दोषींना शिक्षा झाली पाहिजे," असं अश्रफ म्हणाले.

‘संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे’

या घटनेचा धक्का अश्रफ यांच्या संपूर्ण कुटुंबाला बसला आहे. त्यांना मारहाण करताना व्हीडिओ व्हायरल झाल्याने अधिक त्रास होतोय तसंच अनेक जण घरापर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी पोहचतायत असंही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

अश्रफ यांचा मुलगा अश्फाक हा त्यांच्यासोबत असून हॉस्पिटलमधील वैद्यकीय प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहे. तसंच सुरुवातीला आरोपींना तात्काळ जामीन मिळाला यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अश्फाक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “माझे वडील बोलण्याच्या परिस्थिती नाहीत. ते डिप्रेशनमध्ये आहेत. आरोपींवर गंभीर कलमं दाखल करावीत जेणेकरून असं पुन्हा कोणी करू नये. रविवारच्या दिवशी आरोपींना जामीन कसा मिळाला. हा अन्याय आहे. एका वृद्धाला मारतानाही त्यांना दया आली नाही. आमचे घरवालेही डिप्रेशनमध्ये आहेत."

पोलिसांनी दोन दिवसांनी अधिक गंभीर कलमं का लावली?

या प्रकरणाचा तपास ठाणे रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे. अश्रफ यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून सहापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. परंतु, 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.

यानंतर विरोधी पक्षांकडूनही याप्रकरणी आवाज उचलण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न यांसारख्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवी अशी मागणी केली होती.

तसंच या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही एक्स समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

ते म्हणाले, “द्वेषाला राजकीय शस्त्र म्हणून वापर करून सत्तेत बसणारे देशात सातत्याने भीतीचं राज्य स्थापन करत आहेत. झुंडच्या स्वरुपात लपलेला द्वेष कायदा व्यवस्थेला आव्हान देताना दिसत असून उघडपणे हिंसा पसरवली जात आहे.”

'जे माझ्यासोबत घडलं ते इतर कुणासोबतही घडू नये,' रेल्वेत मारहाण झालेल्या अश्रफ यांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत,X

2 सप्टेंबरला मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रारीत दोन अधिक कलमं जोडली. यासंदर्भात बोलताना पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली की, “बीएनएस (भारतीय न्याय संहिता) 311 आणि बीएनस 302 ही कलमे आम्ही नव्याने जोडली आहेत. तपास सुरू असून आरोपींना आम्ही पुन्हा अटक करणार आहोत.”

तसंच ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांचीही आम्ही भेट घेतली. “आमचा तपास सुरू असून आम्ही त्यांच्या घरी पोलिसांना पाठवून तक्रार नोंदवली आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत.”

तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील असून ते पोलीस भरतीच्या शारिरीक चाचणीसाठी घाटकोपर येथे चालले होते.

याआधी देखील झाल्या होत्या अशा घटना

बीफ बाळगल्याचा आरोप ठेवून जमावाकडून मारहाण झाल्याची ही गेल्या काही वर्षांतील पहिलीच घटना नाहीये. गेल्या काही वर्षात देशभरातील विविध राज्यांमधून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

अगदी दोन दिवसांपूर्वीच (1 सप्टेंबर) हरियाणात कचरा गोळा करणाऱ्या एका व्यक्तीची गोमांस शिजवून खाल्ल्याच्या संशयातून कथितरित्या बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. मूळच्या पश्चिम बंगालमधील या व्यक्तीला गोरक्षा दलाच्या काही जणांनी मारहाण केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

तर 2017 मध्ये दिल्ली-मथुरा रेल्वेतून प्रवासादरम्यान जुनैद खान या तरुणालाही मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.

तर 2015 साली उत्तर प्रदेशातील दादरी परिसरात बीफ खाल्ल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गोहत्या बंदी करण्यात आली असून महाराष्ट्रात यासाठी 10 हजार रुपयांचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

'असंच सुरू राहिलं तर ही हिंसा एकाच धर्मापुरती मर्यादित राहणार नाही'

यासंदर्भात बोलताना कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले की, "नवी कलमे लावण्यात आली असतील तर आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली पाहिजे. त्यानंतर मग पुन्हा आरोपींना जामीन द्यायचा की नाही, हे न्यायालय ठरवेल. कारण गुन्ह्याच्या वर्गवारीनुसार जामीन देण्याबाबतच्या अटी बदलत असतात. त्यामुळे त्यांना तातडीने पुन्हा अटक करणे फार आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण देणाऱ्या कायद्यानुसारही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा."

अश्रफ अली सय्यद हुसैन

फोटो स्रोत,Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन,अश्रफ अली सय्यद हुसैन

पुढे सरोदे म्हणाले की, "अशी काही शंका असल्यास संबंधित इसमास अटक करुन पोलिसांकडे प्रकरण सोपवणे हे काम महत्त्वाचे आहे. त्याऐवजी आपण स्वत:चं न्यायाधीश होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. लोकांना संशयावरुन थेट मारणं-लाथाडणं सुरु केलं जातंय. धर्मांध राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती रस्त्यावर, रेल्वेमध्ये आणि सगळीकडेच यशस्वी होताना दिसत आहे.

थोडक्यात, आक्रमक धर्मांधता वाढल्याचं दिसून येतंय. यातूनच काही लोक आम्ही हिंदुंचे गब्बर आहोत, अशा प्रकारचे विधान करताना दिसतात. हे असंच सुरू राहिलं तर ही हिंसा हिंदूंपुरती मर्यादित न राहता ते मुस्लिमांमध्येही वाढेल. त्यामुळे, महाराष्ट्रातील सामाजिक सद्भाव नष्ट करण्याचा हा प्रकार आहे."

Post a Comment

Previous Post Next Post