अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठीची परिस्थिती निर्माण केली जातेय का?
“मी हाडामासांचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही.”
"लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही."
पहिले विधान आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे तर दुसरे विधान आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानले जाणाऱ्या विवेक साप्ताहिकातील लेखामधले!
भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे पक्ष बहुमतात असतानाही प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय गणिते लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला बरोबर घेण्याचा निर्णय 2 जुलै 2023 साली भाजपाकडून घेण्यात आला.
मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आता भाजपा आणि शिवसेनेला (शिंदे गट) अजित पवार नकोसे झालेत का?
जी राजकीय गणिते मांडून अजित पवार यांना आपल्याबरोबर घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला, तो चुकला असल्याची उपरती त्यांना झालीये का आणि आता विधानसभेपूर्वीच अजित पवार यांना महायुतीतून स्वत:हून बाहेर पडण्यास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का, असे काही प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहेत.
याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या विश्लेषणात्मक बातमीतून करू.
'असंगाशी संग' आणि 'उलट्या'
“राष्ट्रवादीबरोबर आपले कधीही पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात,” या मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानानंतर बराच राजकीय गदारोळ पाहायला मिळाला.
विशेषत: या विधानानंतरच अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का, अशा आधी दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेला अधिक कंठ फुटला आहे.
मंत्री तानाजी सावंत यांचे विधान अगदी ताजे असतानाच "अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्दैवी आहे. खरे म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगाशी संग म्हणतात असा संग घडला आहे" असे विधान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी अजित पवार यांना बरोबर घेण्याच्या भाजपाच्या निर्णयामागे मराठा जातीचा चेहरा हे कारण मुख्य होते, असे म्हटले.
ते म्हणाले की, "भाजपाला स्वत:चा मराठा जातीचा नेता नाहीये. म्हणून त्यांनी आधी एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे ओढलं. त्यानंतर खरं तर गरज नव्हती पण एकनाथ शिंदेंचा भरवसा वाटेनासा झाला म्हणून अजित पवारांची 'निकड' हेरुन त्यांना आपल्याकडे ओढलं. म्हणजे दोन तलवारी एका म्यानात ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता; पण तो फसलेला दिसत आहे.
हे लोकसभेच्या निर्णयावरुनही भाजपाला दिसून आले. त्यामुळे, आता अपमान करायचा आणि त्यातून त्यांचा लोकांमध्ये असलेला त्यांचा प्रभाव निष्प्रभ करत जायचा, असे धोरण दिसून येते."

अजित पवारांबाबत महायुतीमध्येच केल्या जाणाऱ्या वक्तव्यांबाबत बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, "एकनाथ शिंदे गटाला अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याची गोष्टच आवडली नव्हती. कारण बहुमत असतानाही कारण नसताना त्यांना सत्तेत वाटा देणे त्यांना रुचलेले नव्हते. कारण शिवसेनेतून बाहेर पडण्यामागे कारण देतानाही एकनाथ शिंदे गटाने 'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या युती'चं कारण दिलं होतं. मात्र, जेव्हा अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत येऊन बसले, तेव्हा त्यांचा तो युक्तिवादच सफशेल अपयशी ठरला. त्यामुळे, सुरुवातीपासूनच ही अडचण होतीच."
'अजित पवारांमुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान'
लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि एकंदर कामगिरीवरून भाजपाची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपावर नाराज असल्याचे चित्र उभे राहिले होते. विशेष म्हणजे 'ऑर्गनायझर' मासिक आणि 'विवेक' या मराठी साप्ताहिकामध्ये लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी का झाली नाही, याचे विश्लेषण करताना अजित पवार यांच्यावरील टीकेचा मुद्दा समान होता.
'मोदी 3.0 कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’ या लेखामध्ये अजित पवारांमुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला तर 'राष्ट्रवादीचा समावेश महायुतीमध्ये करणे हे भाजपा कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेचे मूळ कारण' असल्याचे सांगण्यात आले.
मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाला जोरदार प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने दिली असली तरीही संघाच्या मुखपत्रातून करण्यात आलेल्या टीकेला मात्र सावध प्रतिक्रिया देण्यात आली. अजित पवार नकोसे झाल्याची विधाने भाजपाच्या नेत्यांकडूनही केली गेली आहेत.
संघाचे मुखपत्र मानल्या गेलेल्या विवेक साप्ताहिकाने याबाबत 'कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!' या लेखातील विश्लेषणात म्हटले आहे की, प्रत्येक भाजपा कार्यकर्ता लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केलेल्या युतीपासून करतो.

"हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसर्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे," असेही त्यामध्ये म्हटले आहे.
अजित पवारांनी भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याची खदखद भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी बोलून दाखवली होती.
"अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको," असेही विधान त्यांनी केले होते; तर दुसऱ्या बाजूला, “भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला सावत्र भाऊ आहे”, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्याध्यक्ष (ग्रामीण विभाग) दिलीप देशमुख यांनी केले होते.
वक्तव्यांपलीकडे जाऊन, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथेही कार्यक्रमासाठी आलेल्या अजित पवारांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न केल्याबद्दल त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
महायुतीतून येणाऱ्या अजित पवारविरोधी वक्तव्यांच्या मालिकांबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय पत्रकार विनया देशपांडे म्हणाल्या की, "अजित पवार यांना सोबत घेतले आहे तर आता त्यांना एकत्र ठेवले पाहिजे, असे कम्पल्शन भाजपाला वाटत असले तरीही भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर आहेच आहे.
संघाचाही या गोष्टीला विरोध होता. त्यामुळे, भाजपासारख्या संघटनात्मक बांधणी घट्ट असलेल्या आणि पक्षनिर्णयाच्या विरोधात सहजासहजी बोलता येत नाही, अशा पक्षामधील नेत्यांची अजित पवारांविरोधात बाहेर येणारी अंतर्गत धुसफूस पाहता सध्या भाजपाची अवस्था 'धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय' अशी काहीशी झाली आहे, असे दिसते आहे."
ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच सत्तेत सहभागी करुन घेण्यात आल्यामुळे भाजपासाठी निश्चितच 'क्रेडिबिलीटी क्रायसिस'ही निर्माण झाला आणि त्यातही त्यांना बरोबर घेतल्याचा लोकसभेला विशेष फायदा भाजपाला झाला नसल्याचे विधान अभय देशपांडे यांनी केले. ते म्हणाले की, "भाजपामध्येही एक प्रवाह असा आहे जो असे मानतो की, अजित पवार यांना बरोबर घेतले म्हणून लोकसभेमध्ये फटका बसला आहे.
अर्थात, स्वत: अजित पवार यांनी चारच आणि त्यातही बारामती आणि रायगड अशा दोन जागा ताकदीने लढवल्या. मात्र, त्यांच्या येण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मते भाजपाकडे ट्रान्सफर होतील, अशी जी अपेक्षा होती, ती पूर्णत्वास गेली नाही. एकनाथ शिंदेंच्या गटामुळे ते काही प्रमाणात का होईना पण घडल्याचे दिसून आले."
अजित पवार यांना सोबत घेणे भाजपाच्या अंगलट आले आहे, असे मत जयदेव डोळे यांनी व्यक्त केले. "शरद पवारांचे घराणे फोडले पण त्या निष्ठा हिंदुत्वाकडे ओढता येत नाहीयेत. अजित पवारांसकट सगळ्यांनी ही बाजू स्पष्ट केली आहे की आम्ही हिंदुत्ववादी नाही. त्यामुळे, तशी आमदारांच्या बेरजेमध्ये अजित दादांच्या गटाची गरज नसतानाही शरद पवारांचे नाक कापण्यासाठी आणि एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी त्यांना बरोबर घेण्यात आले. पण हा निर्णय अंगलट येत असल्याचे दिसतंय," असे बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटले.
'एकला चलो रे?'
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रूपाने दोन मुख्य विरोधी पक्षांमधील मोठे गट फोडल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे वर्चस्व आणि नेतृत्वाची ताकद कमकुवत करता येईल, असा देवेंद्र फडणवीस यांचा होरा लोकसभा निवडणुकीच्या निकालाने साफ खोटा ठरवला, असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
अजित पवार यांना बरोबर घेण्याचा भाजपाला फायदा तर सोडाच पण प्रत्यक्षात तोटाच झाल्याचे चित्र उभे राहिले. संघाशी संबंधित मुखपत्रांमध्ये आलेल्या विश्लेषणामध्ये ही गोष्ट अधिक अधोरेखित झाली. अशा पार्श्वभूमीवर या विधानांमधून अजित पवार गटाला एकटे पाडण्याचा वा महायुतीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न तीव्रतेने उपस्थित होतो.
कारण, 'शिवसेना हा पक्ष नैसर्गिकपणे भाजपाचा मित्रपक्ष आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करणे चुकीचे होते,' अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपल्याच पक्षातून फुटून भाजपाबरोबर संधान साधले. या घटनेला काही काळ जातो न जातो तोच, अगदी तसाच कित्ता पुन्हा एकदा गिरवला जाऊन अजित पवारही भाजपाबरोबर आले.
शिवसेनेबाबत बोलताना 'सासूपायी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली' असे म्हटले गेले, ते पुरेसे बोलके होते. मात्र, तरीही एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवत भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री होतील, अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र, आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हेच अजित पवार 'असून अडचण, नसून खोळंबा'प्रमाणे झाल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून अलीकडच्या काळात केलेल्या हालचालीही पुरेशा बोलक्या ठरतात आणि त्यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरतात. विधानसभा निवडणूक महायुतीतून लढवणार असलो तरीही त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढवण्याची अजित पवार गटाची घोषणा त्याचेच निदर्शक वाटते.
महायुतीमध्ये राहूनच आपली वेगळी ओळख जपण्याचे अजित पवारांचे धोरण आहे. याबाबत अभय देशपांडे म्हणाले की, "आपण शाहू-फुले-आंबेडकर-यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी सोडलेली नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी पहिल्यापासूनच घेतलेली आहे, कारण त्यांना राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार हवा आहे. भाजपाच्या विरोधात मराठा समाजामध्ये असलेला रोष आपल्या वाट्याला येऊ नये, याचीही काळजी ते घेऊन ते अंतर ठेवताना दिसत आहेत. हा त्यांच्या धोरणांचा भाग आहे. त्यामुळे, ते लगेच बाजूला जातील, असे वाटत नाही तसेच त्यांनी बाजूला जावे यासाठी कुणी प्रयत्न करत आहे, असेही दिसत नाही. अपवाद म्हणून तानाजी सावंत वगैरे जे बोलत आहेत, ती शिंदेंच्या शिवसेनेची पॉलिसी आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही."
अजित पवार यांच्या राजकारणाबाबत बोलताना जयदेव डोळे म्हणाले की, "आम्ही हिंदुत्ववादी नाही हे सांगण्यापलीकडे अजित पवार यांना स्वत:चे राजकीय तत्त्वज्ञान काहीच नाही. ते मास लीडरही नाहीत. त्यामुळे, नोकरशाहीवर उभा असलेला आणि सरकारी नीतीनियम पक्के ठाऊक असलेला नेता यापलीकडे अजित पवारांचे महत्त्व महाराष्ट्राला अजिबातच नाही. आमदारांची संख्या अधिक असली तरी ती तात्विक आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध फळी नाही. हे नेते संधीसाधू दिसतात."
याबाबत विनया देशपांडे म्हणाल्या की, "भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस असली तरीही त्यांनी सातत्याने जाहीररीत्या हे सांगितले आहे की, आम्ही अजित पवार यांना बरोबर घेतलं आहे आणि आम्ही एकत्रच निवडणूक लढवू."
अजित पवारांचं स्वतंत्र चालणं नि व्यक्त होणं
विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' लागू केल्यानंतर अजित पवार गटाने त्याआधारावर आपल्या पक्षाचा चेहरा-मोहरा 'गुलाबी' करत प्रचारास सुरुवातही केली. मात्र, 'लाडकी बहिण योजने'वरुनही महायुतीमध्ये धुसफूस पहायला मिळते आहे. सध्या अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये योजनेच्या नावातील 'मुख्यमंत्री' हा शब्द वगळून 'अजित दादांची लाडकी बहिण योजना' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरुनही श्रेयवादाचे राजकारण रंगले असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
सिंधुदूर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रतिक्रियांमध्ये सुसूत्रतेचा अभाव दिसून आला. पुतळा पडल्याप्रकरणी अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेची सर्वांत आधी माफी मागितली तर फडणवीसांसहित एकनाथ शिंदे यांनी नौदलावर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, 'शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत', असे विधान गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यानंतरही अजित पवार गटाने त्यावर आक्षेप घेतला. किंबहुना निवडणुकीत बहिणीविरोधात (सुप्रिया सुळे) पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही माझी चूक होती, अशी जाहीर कबूलीही अजित पवार यांनी दिली.

याबाबत अभय देशपांडे म्हणाले की, "अजित पवार यांना आपल्या पक्षाची ओळख आणि विचारसरणी भाजपामध्ये विलीन होऊ द्यायची नाहीये. कारण, त्यांना या महायुतीतला एक घटकपक्ष म्हणूनच रहायचे नाहीये, तर भविष्यात एक प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे यायचे असेल तर त्यांना जे सर्वसमावेशक राजकारण करायचे आहे, ती विचारसरणी ते अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आम्ही आज भाजपाबरोबर आहोत, पण आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या मार्गाने जाणार असे सातत्याने सांगतात. दुसरीकडे भाजपाबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम आपल्यावर होणार नाही, याचीही काळजी ते सातत्याने घेत राहतील. म्हणूनच त्यांनी झेंडा, रंग या गोष्टी स्वत:च्या निवडून वेगळी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते भाजपाच्या आजूबाजूलाच राहतील, पण पाणी आणि तेल मिसळू देणार नाहीत."
अजित पवार यांना महायुतीतून सहजपणे बाहेर पडता येईल, असे सध्यातरी दिसत नाही, असेच विनया देशपांडे यांनाही वाटते. त्यांनी म्हटले की, "अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तरी शरद पवार यांची दारे त्यांच्यासाठी उघडी होतील का, याबाबत फारच साशंकता आहेत. आधीच राष्ट्रवादी काँग्रेस हा खचलेला पक्ष झाला आहे. तो स्वबळावर निवडून येऊ शकणाऱ्या नेत्यांचाच पक्ष आहे. पण भाजपाबरोबर गेल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि त्याचा फायदा शरद पवार घेताना दिसत आहेत. युतीमध्ये अजित पवारांची कोंडी सध्या होत असली तरीही त्यातून बाहेर पडल्यास आता त्यांच्याकडे काही मार्ग दिसत नाही. त्यामुळे, ते महायुतीतच राहण्याची शक्यता अधिक आहे."
आगामी विधानसभा निवडणूक आणि राजकीय गुंतागुंत
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने चार जागा लढवल्या होत्या; त्यापैकी एका जागेवर त्यांना विजय मिळाला होता. 'एएनआय'शी बोलताना महायुतीच्या जागावाटपाबाबतचा फॉर्म्युला अजित पवार यांनी सांगितला.
त्यामध्ये त्यांनी म्हटले की, "आमच्या तीनही पक्षांकडे ज्या जागा आहेत त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही विद्यमान जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल." महायुती किंवा महाविकास आघाडी असो, या निवडणुकीतील सगळ्यात मोठे आव्हान हे जागावाटपाचेच असणार आहे, असे अभय देशपांडे यांनी म्हटले.
ते म्हणाले की, "अजित पवार यांना बरोबर घेण्याचा भाजपाला लोकसभेला फायदा झालेला नसला तरीही विधानसभेला होणारच नाही, असे भाजपा नेत्यांना वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे हवा कुठलीही असली तरीही निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या अजित पवार यांच्याकडे जास्त आहे. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे स्वत:च्या बळावर मतदारसंघ सांभाळणारे मातब्बर नेते त्यांच्याकडे आहेत. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी महायुती सोडायचा निर्णय घेता येईल असेही अनुकूल वातावरण त्यांच्यासाठी नाही. निवडणुकीनंतर ते पुन्हा स्वगृही परततील का, याबाबतचे अंदाज आताच बांधणे घाईचे ठरेल. कारण, ज्या कारणांसाठी ते भाजपाबरोबर गेलेत ती कारणे अद्याप संपुष्टात आलेली नाहीत. त्यामुळे, अजित पवार सोडून जातील, ही शक्यता देखील कमी वाटते."
महायुतीमध्ये जागावाटपावरुन जिथे जिथे कोंडी होईल, तिथे महाविकास आघाडी आपला फायदा करुन घेईल, असे विनया देशपांडे यांना वाटते. त्यांनी म्हटले की, "लोकसभा निवडणुकीवेळीही अजित पवार यांनी असे म्हटले होते की, आपले मुख्य ध्येय विधानसभेची निवडणूकच असेल. मात्र, या निवडणुकीच्या जागावाटपामध्ये निश्चितच ओढाताण होईल. कारण, पारंपारिकरीत्या हे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. अशात एकमेकांसाठी काम करा, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगणेही प्रत्यक्ष मैदानात किती कठीण आहे, ते लोकसभेला दिसले आहे. जिथे जिथे महायुतीमध्ये अशी कोंडी आहे, तिथे शरद पवार फायदा करुन घेतील, असे दिसते."
याबाबत बोलताना जयदेव डोळे म्हणाले की, "आता विधानसभेचे जागावाटप हाच खरा निर्वाणीचा क्षण येणार आहे. जागावाटपापर्यंत कुणीच कुणाचे डाव उघडकीस आणणार नाही. मात्र, पवार आणि ठाकरे यांची स्थिती अजून भक्कम आहे, असेच मला वाटते. विधानसभेची निवडणूक पुढे ढकलल्याने लोकांची मते बदलत नाहीत. या तिघांच्या तीन तऱ्हा असल्याने त्रिफळा उडणार हे नक्की!"