शरद पवार म्हणतात, 'बारामतीकरांबद्दल इतरांपेक्षा मला जास्त माहिती आहे'
युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला. यावेळी बोलताना शरद पवारांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
"महाराष्ट्राचा आढावा मी सातत्याने घेत आहे. जसं लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला, तसाच यावेळी मिळेल," असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
पवार पुढे म्हणाले की, "चार वर्ष हातात सत्ता होती, तेव्हा यांना बहिणींची आठवण नव्हती. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण झाली. लोकांनी शिकवलेला धडा हे त्यामागचं कारण होतं."
"बारामतीच्या मतदारांची मला जेवढी माहिती आहे, ती फार कमी लोकांना आहे. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणात शक्ती देण्याचं काम बारामतीकरांनी केलं. 1965 पासून आजपर्यंत ते करत आहेत. एवढ्या निवडणुका मी लढवल्या. मी इथं नसलो तरी माझी जबाबदारी ते घ्यायचे. यावेळीही महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना लोक विजयी करतील," असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
उच्चशिक्षित उमेदवार, शेती, व्यवसायाचा जाणकार असलेल्या युगेंद्र या नव्या नेतृत्वाचा स्वीकार करून त्यांच्या पाठिशी शक्ती उभी करतील, असा विश्वास असल्याचं पवार म्हणाले.

रामदास आठवले नाराज, महायुतीच्या जागावाटपात 'रिपाइं'ला एकही जागा नाही

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. 29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. असं असताना रिपब्लिकन पक्षानं जागावाटपावर आता नाराजी जाहीर केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली. रिपब्लिकन पक्ष राज्यात प्रमुख पक्ष असून जागावाटपाबाबत रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले," असं आठवले यांनी पोस्ट केलं आहे.
देवेंद्र फडवणवीस यांना भेटून राज्यात पक्षाला एकही जागा मिळाली नसल्याचं लक्षात आणून दिल्याचं आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोदींच्या नेतृत्वात एनडीएसाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याचंही आठवले यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment