एकनाथ शिंदे वि. केदार दिघे : आनंद दिघेंच्या पुतण्याला उभं करण्याची उद्धव ठाकरेंची रणनिती यशस्वी होईल? - latursaptrangnews

Breaking

Tuesday, October 29, 2024

एकनाथ शिंदे वि. केदार दिघे : आनंद दिघेंच्या पुतण्याला उभं करण्याची उद्धव ठाकरेंची रणनिती यशस्वी होईल?

 


एकनाथ शिंदे वि. केदार दिघे : आनंद दिघेंच्या पुतण्याला उभं करण्याची उद्धव ठाकरेंची रणनिती यशस्वी होईल?


“ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा ही आनंद दिघे यांची इच्छा होती,” असं वक्तव्य यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

आता विधानसभेच्या निवडणुकीत आनंद दिघे यांच्याच पुतण्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढवायची आहे. कारण एकनाथ शिंदे ज्यांना गुरुस्थानी मानतात, अशा आनंद दिघेंच्या पुतण्यालाच उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे.

'आनंद दिघे आणि ठाणे' हे खूप जुनं राजकीय समीकरण आहे. आनंद दिघे यांचं कायम ठाण्यातील राजकारणावर वर्चस्व होतं आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ठाण्यात आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं.

परंतु, आजही एकनाथ शिंदे यांचं एकही भाषण आनंद दिघे यांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांनी आनंद दिघे यांच्या राजकीय जीवनावर गेल्या दोन वर्षांत दोन सिनेमेही प्रदर्शित केले.

केदार दिघे हे याच आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंच्या होमग्राऊंडवरचा हा राजकीय डाव कितपत यशस्वी होतो, ते पाहावं लागेल.

केदार दिघे यांच्यासाठी ही लढाई सोपी नाही. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आहेतच, पण ते 2004 पासून सलग चारवेळा या मतदारसंघातून निवडून येत आहेत. तसंच, सबंध ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नेतृत्त्व केलं आहे.

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केदार दिघे किती मोठं आव्हान उभं करू शकतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाण्यातील राजकीय समीकरणं कशी आहेत?

ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे. ठाणे हा सेनेचा गड मानला जातो. गेल्या 35 वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे.

अगदी शिवसेनेच्या जन्मापासून ठाण्यातील मतदार शिवसेनेच्या बाजूने उभे आहेत. परंतु, आता राज्यात दोन शिवसेना आहेत, म्हणजे शिवसेनेचे दोन गट आहेत. यामुळे ठाणेकर मतदार कोणत्या शिवसेनेच्या बाजूने उभे राहतात, हे पाहावं लागेल.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाण्यातून एकनाथ शिंदे यांना आपले विश्वासू आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना निवडून आणण्यात यश आलं. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली होती.

राजन विचारे हे सुद्धा ठाण्यातील शिवसेनेचा ओळखीचा चेहरा आहेत. पण तरीही नरेश म्हस्के यांना 1 लाखाहून अधिक मतं मिळाली.

आता विधानसभा निवडणूक होत आहे. विधानसभेचं आताचं पक्षीय बलाबल पाहिलं तर ठाण्यातील पाचपाखाडी मतदारसंघातून स्वत: एकनाथ शिंदे 2004 पासून आमदार आहेत.

आनंद दिघे

फोटो स्रोत,FACEBOOK

फोटो कॅप्शन,आनंद दिघे

तर ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचेचं आणि आता शिंदेंसोबत असलेले प्रताप सरनाईक 2009 पासून निवडून येत आहेत.

ठाणे विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आहेत, तर ठाण्याजवळील मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. त्यांचा भाजपला पाठिंबा आहे.

नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे. पूर्वी संदीप नाईक तर 2019 मध्ये गणेश नाईक इथून भाजपकडून निवडून आले आहेत.

तसंच, बेलापूर मतदारसंघातही भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत.

ठाणे महानगरपालिकेबाबत बोलायचं झाल्यास, महानगरापालिकेतील कार्यकाळ संपला असून निवडणूक दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. परंतु, ठाण्यात शिवसेनेचे एकूण 67 माजी नगरसेवक आहेत. यापैकी 66 नगरसेवकांनी 6 जुलै 2022 रोजी म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला होता.

उद्धव ठाकरेंनी केदार दिघेंनाच उमेदवारी का दिली?

शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची, याबाबत मतदार कोणाला कौल देतात हे सुद्धा या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. यामुळे 'शिवसेना विरुद्ध शिवसेना' अशा लढती राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतील.

यातील एक महत्त्वाची आणि लक्षवेधी निवडणूक म्हणजे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील निवडणूक होय. कारण या मतदारसंघातून शिवसेनेत बंड केलेले आणि आता धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ज्यांच्याकडे आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे निवडणूक लढवत आहेत.

एकनाथ शिंदे यांना कडवं आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिघे कुटुंबातील सदस्य शिंदेंविरोधात मैदानात उतरवला आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असल्याने एकनाथ शिंदे यांना आपण गुरू मानत असलेल्या आनंद दिघे यांच्याच कुटुंबातील सदस्याविरोधात निवडणूक लढवावी लागत आहे.

ठाण्यात शिवसेनेचा विस्तार हा आनंद दिघे यांच्या नेतृत्त्वात झाला. त्यांच्याच नेतृत्त्वात आणि राजकीय आशीवार्दाने एकनाथ शिंदे शिवसेनेत आले आणि अगदी शाखा प्रमुख या पदापासून ते आमदार आणि मंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी पूर्ण केला.

परंतु, याच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाहीत. पक्षफुटीनंतरही त्यांनी शिवसेना ठाकरे गटात राहाणं पसंत केलं. ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख या पदावर कार्यरत आहेत.

केदार दिघे

फोटो स्रोत,Kedar Dighe/Facebook

फोटो कॅप्शन,केदार दिघे

केदार दिघे यांनी यापूर्वी एकही निवडणूक लढवलेली नाही. हा त्यांचा पहिलाच अनुभव आहे. पण तरीही उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याविरोधात त्यांना संधी दिली आहे.

याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, “उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना उमेदवारी देऊन भावनिक खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. आनंद दिघे आणि ठाणेकरांचं पूर्वीपासून भावनिक नातं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना तह देण्यासाठी दिघेंच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली आहे.

"ते आनंद दिघे यांचे पुतणे असल्याने एकनाथ शिंदे यांना गुरुच्या पुतण्यासमोर उभं करून भावनिक खेळी करण्याचा हा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्यापद्धतीने पक्ष फोडला, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही आपल्याकडे घेतलं. यामुळे याबाबत भावनिक लाट असल्यास त्याचा फायदा केदार दिघे यांना होऊ शकतो, हेही गणित यामागे आहे.”

तर केदार दिघे यांना उमेदवारी दिल्याने फार काही फरक पडणार नाही, असं मत 'ठाणे वैभव' या दैनिकाचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं. ते म्हणाले, “गेल्या दोन-तीन वर्षात शिवसेना ठाकरे गटाने ठाण्यात अधिक मेहनत करणं किंवा केदार दिघे यांना अधिक बळ देणं अपेक्षित होतं. परंतु, तसं घडलं नाही. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याविरोधात लढताना केवळ 'दिघे' आडनाव आहे म्हणून फार फरक पडेल असं वाटत नाही.

"शिवाय, मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. 2019 मध्ये मनसेच्या उमेदवाराने बरीच मतं मिळवली होती. पण मनसे तर यावेळेस इथून स्पर्धेतही नाही. यामुळे एकनाथ शिंदे यांना ही लढाई सोपी झाली असं वाटतं.”

ते पुढे सांगतात, “केदार दिघे हे हळूहळू तयार होत आहेत; पण त्यांना अधिक तयार करणं गरजेचं होतं. शिवाय, पाचपाखाडी फोकस करून किंवा मतदारसंघनिहाय अभ्यास करणं आवश्यक होतं. ते आनंद दिघे यांचे पुतणे असले तरी त्यांची कार्यपद्धती किंवा शैली किंवा आतापर्यंतचे काम हे काही आनंद दिघे यांच्यासारखे नाही."

बल्लाळ पुढे सांगतात, "उलट एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं, किमान आपली प्रतिमा तरी तशी तयार केली. यामुळे त्यांच्यावर टीकाही केली जाते. पण एकूणच ठाण्यात एकनाथ शिंदे यांना पर्यायी नेतृत्त्व आतापर्यंत तयार करायला हवं होतं. किमान तुल्यबळ प्रतिस्पर्धी तरी ठाण्यात हवा. पण कोणत्याच पक्षाने हे केलेलं नाही."

एकनाथ शिंदेंसाठी 'होमग्राऊंड' आव्हानात्मक?

तीन मुख्य कारणांसाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी 2024 ही विधानसभा निवडणूक वेगळी आहे.

पहिलं कारण म्हणजे, त्यांनी जवळपास सव्वा दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे.

दुसरं कारण म्हणजे, ते आता विभागलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आहेत.

तिसरं कारण म्हणजे, त्यांच्यासमोर राज्यात शिवसेनेच्या दुसऱ्या पक्षाचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आव्हान आहे.

यामुळे केवळ पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघच नव्हे तर राज्यभरात त्यांनी निवडणुकीला मैदानात उतरवलेल्या आपल्या 65 उमेदवारांसाठीही त्यांना रणनिती आखायची आहे.

28 ऑक्टोबरला ठाण्यात आपल्या कुटुंबीयांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यामुळे आपल्या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे.

असं असलं तरी गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत. विशेषत: गेल्या अडीच वर्षात शिवसेनेचे दोन पक्ष झाले. एका पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. हा बदल झाल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.

एकनाथ शिंदेंसमोर शिवसेनेच्या दुसऱ्या पक्षाचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आव्हान आहे.
फोटो कॅप्शन,एकनाथ शिंदेंसमोर शिवसेनेच्या दुसऱ्या पक्षाचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आव्हान आहे.

संदीप प्रधान, “खरं तर या मतदारसंघातून निवडणूक जिंकण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर आहे, म्हणजे केदार दिघेंसाठी आहे. याचं कारण म्हणजे ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर सलग चारवेळा निवडून येत असलेला उमेदवार आहे.

"यामुळे निश्चितच केदार दिघे यांना संघर्ष करावा लागेल. परंतु याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्यासाठीही विजय खूप सहज आणि सोपा आहे असं नाही. कारण शिवसेना ठाण्यात खोलवर रुजलेली असताना पक्ष फोडी आणि ठाकरेंकडून पक्ष घेतल्याबाबत जर काही नाराजी मतदारांमध्ये असेल आणि याची सुप्त भावनिक लाट असेल तर एकनाथ शिंदे यांनाही फटका बसेल अशी शक्यताही नाकारता येत नाही. हे नरेटीव्ह कोण कशापद्धतीने मतदारांना पटवून देतं यावर हा विजय अवलंबून आहे.”

ते पुढे सांगतात, “एकनाथ शिंदे केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित नाहीत, तर मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी ठाण्यासाठी विकासकामांसाठी इथे निधी आणला अशी त्यांची प्रतिमा आहे. तसंच, ते 18 वर्षांचे असल्यापासून ठाण्यात राजकारणात आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. यामुळे उद्धव ठाकरे ठाण्यात आपली किती ताकद लावतात आणि त्यांच्याविषयी सुप्त भावनिक लाट असली तरच वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं असं मला वाटतं.”

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द

ठाण्यामधील कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एवढीच त्यांची ओळख नसून गेली अनेक दशके ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.

एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षं शिवसेनेत कार्यरत आहेत. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते निवडून आलेत. ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून ते विधानसभेवर निवडून जात आहेत. पण त्यांचा हा प्रवास सुरु झाला होता रिक्षाचालकापासून.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपादृष्टी झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत,Eknath Shinde

फोटो कॅप्शन,एकनाथ शिंदे

त्यानंतर 1997 मध्ये आनंद दिघेंनी शिंदेंना ठाणे महापालिकेचं तिकीट दिलं. आपल्या पहिल्याच प्रयत्नांत शिंदेंनी महापालिकेत बाजी मारली आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले.

2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. इथे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले.

2004 सालापासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेत. शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. जुलै 2022 मध्ये त्यांनी शिवसेनेत बंड केलं. उद्धव ठाकरे यांना आव्हान देत त्यांनी पक्षाचे सुमारे 40 आमदार आपल्या बाजूने केले. यानंतर 2022 पासून ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment