काँग्रेसच्या मतदारसंघातून अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिला एबी फॉर्म - latursaptrangnews

Breaking

Tuesday, October 29, 2024

काँग्रेसच्या मतदारसंघातून अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिला एबी फॉर्म

 




काँग्रेसच्या मतदारसंघातून अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिला एबी फॉर्म

परभणी : महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच आहे आणि या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांना काँग्रेसने उमेदवारी देखील बहाल केली होती. सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म लावून आपला उमेदवारी अर्ज भरला. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना आज अचानक पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देऊन पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे आता पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पेच निर्माण झाला आहे. आता या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होते की दोघांपैकी एक जण उमेदवारी अर्ज मागे घेतो हे पाहावे लागणार आहे.

पाथरी विधानसभा मतदार सघात 2019 मध्ये काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले होते. महाविकास आघाडीमध्ये ही जागा 2024 ला देखील काँग्रेसलाच सुटली. आणि काँग्रेसकडून दुसऱ्यांदा सुरेश वरपूडकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच आहे असे स्पष्ट झाले होते. आमदार सुरेश वरपुडकर यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली. मतदारसंघात दौरे वाढवले आपला उमेदवारी अर्ज देखील भरला.
पाथरी विधानसभेची जागा काँग्रेसला सुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी अशी मागणी लावून धरली. दुरानी यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागणीचा जोर लावून धरला. पण जागा काँग्रेसकडे असल्याने आणि तेथून विद्यमान आमदार असल्याने त्यांचे तिकीट काटून दुर्राणी यांना उमेदवारी देता येत नसल्याचे संकेत पक्षाकडून मिळत होते. पण बाबाजानी दुर्राणी यांनी आपले प्रयत्न कमी पडू दिले नाहीत.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देऊन उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना केल्या. बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या समर्थकांसह पाथरी येथे भव्य असे शक्ती प्रदर्शन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करताना बाबाजानी दुर्राणी यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच असल्याचे आपल्या भाषणात संबोधित केले. त्यामुळे आता पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होते की दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागते हे मात्र येणाऱ्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. पण सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment