आपल्या एका मताची किंमत काय? इतिहासात असाच एका मताने अनेकदा बसला आहे धक्का
महाराष्ट्रात विधानसभा 2024 निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला राज्यभर मतदान होणार आहे. प्रत्येकाला आपला विकास करणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची महत्त्वाची संधी मतदानाने उपलब्ध करून दिलीय. त्यामुळे हा आपला सर्वोच्च हक्क बजावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
2024 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार आणि 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार आहेत.
थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून दिव्यांग मतदारही (पीडब्ल्यूडी) 6.32 लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्ड जेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.
हे सदृढ समाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे 18-19 वयोगटातील मतदारांची संख्या 19.48 लाख आहे.
निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदान करा असं आवाहन निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्ष घरोघरी जाऊन सर्वांना करत आहे. लोकशाहीत एका मताची किंमत फार मोठी आहे. त्यामुळे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.
राज्यात सर्वांना व्यवस्थित मतदान करता यावं यासाठी आपल्या प्रशासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून राज्यात 1 लाख 186 मतदान केंद्र उभारण्यात आलेत.
शहरात 42, 585, तर ग्रामीण भागात 57, 601 मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे 23 नोव्हेंबरला जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे.
जेव्हा एका मताने पडले वाजपेयी सरकार
निवडणुकीत एक एक मत फार महत्त्वाचं आहे. याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना राजकीय जाणकार सचिन गडहिरे सांगतात की, लोकशाहीत प्रत्येकाच्या मताची किंमत फार मोठी आहे.
प्रत्येकाच्या एका मताने फरक पडतो अशी जगाच्या इतिहासात आणि राज्यात देखील अनेक उदाहरण आहेत.
लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकानी आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. जे मतदान करत नाहीत त्यांनी आपला हक्क गमावू नये. कारण तुमच्या एका मताने परिस्थिती बदलू शकते आणि व्यवस्थेवर फरक पडतो.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 1999 मध्ये सत्तेत होतं. अनेक पक्षांच्या पाठिंब्याने हे सरकार उभं होतं.
एआयएडीएमकेने पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकारला संसदेत अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला होता.
त्यावेळी झालेल्या मतदानात सरकारच्या बाजूने 269 मतं पडली तर विरोधात 270 मतं. त्यामुळे एका मताने अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं.
एका मताने बदलली अमेरिकेची राष्ट्रभाषा
1795 ला अमेरिकेची पहिली भाषा निवडली गेली. त्यावेळी जर्मनीशी संबंधित अनेक श्रीमंत लोक अमेरिकेत होते. त्यामुळे जर्मन ही अमेरिकेची पहिली भाषा झाली असती. पण नंतर त्याला विरोध झाल्यावर एक सर्व्हेक्षण झालं.
या सर्व्हेक्षणात असं लक्षात आलं की, फक्त 9 टक्के लोकच पहिली भाषा म्हणून जर्मन वापरतात. बाकी सगळे जास्त इंग्रजी वापरतात.
तरीही नंतर मतदान घेण्यात आलं त्यात इंग्रजी भाषेचा एका मताने विजय झाला आणि जर्मनऐवजी इंग्रजी अमेरिकेची भाषा म्हणून निवडून आली.
सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले
राजस्थान विधानसभा निवडणूक 2008 च्या वेळी काँग्रेसचे सी. पी. जोशी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. त्या निवडणुकीत जोशींना 62 हजार 215 तर कल्याणसिंह यांना 62 हजार 216 मतं मिळाली आणि ते विजयी झाले.
महत्त्वाचं म्हणजे जोशींची आई, पत्नी आणि ड्रायव्हर यांनी त्यावेळी मतदानच केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला.
डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या पैठण नगरपालिका निवडणुकीत केवळ एका मताने नगरसेविका संगिता मापारी विजयी झाल्या होत्या.
पतंगराव कदम यांचा1980 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 86 पोस्टल मतांनी पराभव झाला होता.
1875 ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
1917 ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते.
2017 मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अतुल शाह आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर या दोन्ही उमेदवारांना योगायोगाने समान मते पडली. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 226 इतकीच मते पडली होती.
कोणाला विजयी घोषीत करायचे हा प्रश्न निर्माण झाला. अखेरीस चिठ्ठी उडवण्याचा निर्णय झाला. चिठ्ठी उडवली गेली. अशा पद्धतीने केलेल्या निवाड्यात निकाल भाजपच्या अतुल शाह यांच्या बाजूने लागला परिणामी शिवसेना पक्षाचे सुरेंद्र बागलकर पराभूत झाले.
लोकसभा निवडणुकीत वायकर 48 मतांनी जिंकले
2024 मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना 48 मतांनी पराभूत केले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत शेवटच्या मतफेरीच्या मोजणीपर्यंत कीर्तीकर एका मताने पुढे होते. मात्र पोस्टल मतांच्या फेर मोजणीत 48 मतांनी वाईकर यांनी विजय मिळवला.
मतदान आपला अधिकार आणि कर्तव्य
महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयोग अधिकारी एस चॉकल्लिंगम म्हणतात की, राज्यातील 288 मतदार संघात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. याची आवश्यक असलेली पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.
मतदान करणं हे आपलं अधिकार आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या मतानुसार आपला लोकप्रतिनिधी निवडावे.
मतदानाचा हक्क बजवावा याबाबत सुजाता सौनिक महाराष्ट्र मुख्य सचिव म्हणतात की, राष्ट्रीय कर्तव्य समजून 20 नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदान करा. 20 नोव्हेंबरला कोणताही कारण न सांगता घरातून बाहेर पडत मतदानाचा हक्क पार पाडावा.
निवडणुकीत एकेक मताची किंमत किती महत्त्वाची असते या संदर्भात शिवसेना नेते व उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, निवडणुकीत एक एक मत खूप महत्त्वाचं आहे.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माझा 48 मतांनी पराभव झाला. माझ्या जवळच असलेल्या कार्यकर्त्यांनी देखील मतदान केलं नव्हतं, असं पराभवानंतर कळलं.
त्यामुळे प्रत्येकाचं एक एक मत महत्त्वाचं आहे, सर्वांनी आवर्जून मतदान करायला हवं कारण तुमच्यामुळे एक लोकप्रतिनिधी ठरवला जातो.
महाराष्ट्र 2014 विधानसभा निवडणुकीत साडेसात कोटी कोटी मतदारांची नोंदणी झाली होती . त्यापैकी 63.08 टक्के मतदान हे झाले होते. 2019 विधानसभा निवडणुकीत राज्यात 8 कोटी 97 लाख 22 हजार 19 मतदार होते. त्यात 2019 विधानसभा निवडणुकीत 60.46 टक्के मतदान हे पार पडलं होतं.
2014 च्या तुलनेत 2019 मध्ये कमी मतदान झालं होतं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने राज्य प्रशासन प्रयत्न करत आहे.
मतदारांमध्ये उत्साह
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी नव मतदारांना त्यांचं मत किती महत्त्वाचा आहे याबद्दल काय वाटतं या संदर्भात संवाद साधला असता, 18 वर्षीय विवेक मेहतर म्हणाला की, माझ्या मताची किंमत मला माहिती आहे.
मी मतदान केलं नाही तर मला लोकप्रतिनिधीला बोलता येणार नाही. त्यामुळे मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे , त्यामुळे माझं मतदान करून मी योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणार आहे.
मतदान करण्यासंदर्भात सध्या तरी माझ्यात उत्सुकता आहे. मतदानाच्या दिवशी बाहेर पडेल आणि मतदान करेन.
89 वर्षाचे नवी मुंबईत राहणारे बापू पाटील हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "मी माझं अमूल्य मत जेव्हापासून हक्का मिळाला तेव्हापासून वाया घालवत नाही. मिळेल तसा वेळ काढून मी मतदानाला जातोच."
विचारवंत गोपाळ गुरू यांनी मतदानाचा हक्क हे वास्तव आहे पण त्यातून येणारा परिणाम हे सत्य असतं. आपल्या मतदानानं सुरक्षित आणि सूज्ञ, आपल्या प्रश्नांची उकल करणारं सरकार येत असेल तर त्यासाठी मतदान करायला हवं. ही मोठी जबाबदारी असल्याचं गुरू म्हणाले.