मौजे चिंचोलीराववाडी व परिसरात स्वीप कक्षाच्या माध्यमातून जनजागृती
मौजे चिंचोलीराववाडी व परिसरात स्वीप कक्षाच्या माध्यमातून जनजागृती
लातूर,दि.9 (जिमाक): जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली २३४- लातूर ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृती (स्वीप)च्या पथकाने गावातील गृहभेटी देवून घरोघरी मतदार जागृतीस सुरुवात केली आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रात्साहीत करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
चिंचोलीराववाडी मांजरा साखर कारखाना परीसरातील मतदार व तरुण - तरुणी नव-मतदार यांनी मतदानाच्या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील व स्थलांतरीत मतदारांना संपर्क करुन २० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या मतदान केंद्रावर येऊन मतदान करुन घेण्याचे यावेळी युवकांनी आश्वासित केले. या मतदान जनजागृतीमुळे मतदारामध्ये मतदान करण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे.
याप्रसंगी २३४ - लातूर ग्रामीण मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी डॉ. मारुती सलगर म्हणाले मतदारांना संविधानाने मतदानाचा आधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा हक्क आपण बजावून राष्ट्र व लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्केवारीपेक्षा आपल्या गावाची मतदानाची टक्केवारी होती. येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजीच्या विधानसभेच्या मतदानात मतदार यादीत समाविष्ट मतदारांनी मतदान करुन आपल्या गावातील सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पथकातील नोडल अधिकारी धनराज गीते, स्वीप समन्वयक मंगेश सुवर्णकार, स्वीप सदस्य हनुमंत भासिंगे, सुरेखा चंदिले, अमृतेश्वर स्वामी, जाकिर शेख, माधव बन यांनी आपल्या लोकगीत, गवळण, भारुड, पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित तरुण-तरुणी, जेष्ठ, दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांना मतदानाचे आवाहन केले.
No comments