दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

 




दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर


Maharashtra board exam 2025 date : फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि दहावी म्हणजेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

ssc and hsc timetable maharashtra

व्हायरल वेळापत्रकांवर विश्वास ठेऊ नका-
या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून (दि. २१) उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असंही मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

गणित आणि विज्ञानाचे निकष पूर्वीप्रमाणेच-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पध्दतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्यावर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटक यांनी घ्यावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्डाचे वेळापत्रकही जाहीर-
बुधवारी रात्री (२० नोव्हेंबर) सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अंतिम परीक्षा ४ एप्रिल रोजी होणार आहे. CBSE Board परीक्षा २०२५ ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३३ टक्के गुण मिळवावे लागतील. उमेदवारांनी प्रत्येक विषयात वैयक्तिकरित्या पात्र असणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post