वक्फ बोर्डाचा सिद्धिविनायक मंदिरावर दावा सांगणाऱ्या व्हायरल पोस्टमागचं सत्य जाणून घ्या
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डने दावा केला असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अशा प्रकारच्या दाव्याची बातमी असणारा 'सकाळ' वृत्तपत्राच्या सोशल मीडियावरील पोस्टचा स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल केला जात आहे.
याआधीही रायगड किल्ल्यावरील जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर आता सिद्धिविनायक मंदिरावरही दावा केला जात असल्याची कथित बातमी व्हायरल होत असल्याने, त्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.
वक्फ बोर्डाने सिद्धिविनायक मंदिरावर दावा केला आहे का? याआधीही रायगड किल्ल्यावरील दाव्याची कथित बातमी कितपत खरी होती? सिद्धिविनायक मंदिराचा याबाबतचा खुलासा काय आहे?
सिद्धिविनायक मंदिर, रायगड किल्ल्यावर वक्फ बोर्डाचा दावा?
सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाकडून दावा केला गेल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावरील अनेक पोस्ट्समधून तशा प्रकारची भीती व्यक्त केली जाताना दिसत आहे.
'पॉलिटीक्स-सॉलिटीक्स' या 'एक्स' अकाऊंटवर त्यासंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 'जर हे खरं असेल तर हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. जागे व्हा!' असं ट्विट करण्यात आलं आहे.
मिस्टर सिन्हा या ट्विटर अकाऊंटवरही लिहिलंय की, "आता पुरे झालं. आता ते हाताबाहेर जात आहेत. त्यांना थांबवण्याची गरज आहे."
याच दाव्याची बातमी म्हणून 'सकाळ' वृत्तपत्राच्या लोगोसहित एक स्क्रीनशॉट व्हायरल होताना दिसत होता.
याआधीही रायगड किल्ला ही आमची प्रॉपर्टी असल्याचा दावा वक्फ बोर्डाने केल्याची माहिती प्रसारित झाली होती.
अशा स्वरुपाच्या अनेक पोस्ट्स आणि ट्विट्स व्हायरल होताना दिसत आहेत.
मात्र, आमच्या नावे व्हायरल होणारे स्क्रीनशॉट बनावट असल्याची माहिती 'सकाळ'ने दिली आहे तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही बातमी 'फेक' असून 'तुमच्या मतांसाठी महाराष्ट्रात आमच्या भावना आणि भावनांशी खेळू नका,' अशी टीका भाजपवर केली आहे.
दावा कितपत खरा?
'सकाळ'च्या नावे व्हायरल होणारा हा फोटो बनावट असून 'सकाळ' वृत्तपत्राने अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केली नसल्याचा खुलासा सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन केला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "अशा प्रकारची कोणतीही बातमी आम्ही प्रसारित केली नसून, व्हायरल झालेले ते क्रिएटीव्ह बनावट आहे."
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही अशा स्वरुपाचे दावे खोटे असून निवडणुकीच्या तोंडावर मुद्दामहून प्रसारित केले जात असल्याचा आरोप करत भाजपवर टीका केली आहे.
त्यांनी आपल्या 'एक्स' या ट्विटर अकाऊंटवर लिहिलंय की, "भाजपच्या इकोसिस्टीमची ही अत्यंत घृणास्पद मानसिकता आहे. फोडा आणि राज्य करा. खोटे बोला आणि जिंकण्याचा प्रयत्न करा, असे हे धोरण आहे. निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांकडून यावर काही कारवाई होईल का? महाराष्ट्रद्वेष्टे आणि इतकी घृणा तयार करणाऱ्यांवर काही कारवाई होईल का? महाराष्ट्रामध्ये मते मिळवण्यासाठी आमच्या भावनांशी खेळू नका."
सिद्धिविनायक मंदिर आणि वक्फ बोर्ड दोघांनीही काय केला खुलासा?
सिद्धिविनायक मंदिराचे खजिनदार व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ते म्हणताना दिसतात की, "सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची आन-बान-शान आहे. संपूर्ण जगात राहणाऱ्या सर्व सनातनी व्यक्तींची सिद्धिविनायक मंदिरावर श्रद्धा आहे. म्हणूनच सिद्धिविनायक मंदिराला ताब्यात घेण्याचा दावा कोणताही बोर्ड करु शकत नाही. हे सर्व गणेश भक्तांचे मंदिर आहे आणि ते तसेच अबाधित राहिल."
यासंदर्भात बीबीसी मराठीने पवन त्रिपाठी यांच्याशी बातचित केली. वक्फ बोर्डाकडून अशा प्रकारचा लेखी दावा करण्यात आला आहे का, याची विचारणा केली असता ते म्हणाले की, "मी माझ्या व्हीडिओमध्ये कोणत्याही बोर्डाचे नाव घेतलेले नाही. मात्र, मलाही माध्यमांमधूनच अशा प्रकारचा दावा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा खुलासा म्हणून सिद्धिविनायक मंदिर कुणीही ताब्यात घेऊ शकत नाही, अशी माहिती देणारा व्हीडिओ मी केला. अद्याप वक्फ वा तत्सम कोणत्याही बोर्डाकडून याप्रकारचा कोणताही लेखी दावा केल्याची माहिती मला प्राप्त झालेली नाही."

यासंदर्भात बीबीसी मराठीने महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जुनैद सय्यद यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, "ही एक फेक न्यूज आहे. अशा प्रकारची माहिती कुठून प्रसारित झाली, काही कल्पना नाही. ही आमची प्रॉपर्टी आहे, अशा स्वरुपाचा कोणताही दावा ना आमच्याकडून करण्यात आला आहे, ना असं काही प्रसारित करण्यात आलं आहे. मात्र, हे कुठून पसरलं आहे, ते माहिती नाही. वक्फ बोर्डाकडून असा कोणताही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही, तसेच प्रोसेसमध्येदेखील अशी काही चर्चा नाही."
याआधी रायगड वा तत्सम इतर कोणत्या जागांवर अलीकडच्या काळात वक्फ बोर्डाने दावा केला आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, "या प्रकारे रायगड वा इतर जागांवर दावा करण्याबाबत प्रसारित होणारी माहिती अत्यंत चुकीची आहे. अशा प्रकारचा कोणताही दावा आम्ही केलेला नाही."
काय आहे वक्फ बोर्ड आणि तो वादात का आहे?
गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड चर्चेत आहे. वक्फ कायद्यात केंद्र सरकारकडून प्रस्तावित असणाऱ्या अनेक बदलांवर टीका केली जात आहे.
‘वक्फ बोर्ड अधिनियम- 1995’ या कायद्याचे 'एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा' असं नामकरण करण्यात आलं आहे.
दुरुस्ती विधेयकाच्या 'उद्दिष्टे आणि कारणांमध्ये' केलेल्या 'वक्फ'च्या व्याख्येनुसार किमान पाच वर्षे इस्लामचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे 'वक्फ' होय.
प्रस्तावित दुरुस्ती कायद्यात वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून घेऊन ते अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना दिले आहेत.
या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी हे बिगरमुस्लिम असावेत. नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे.