महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार, शाहू महाराजांची कृती व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी यातच खरा सामाजिक न्याय !
प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाडलातूर: दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, यांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड तर प्रमुख व्याख्याते श्री. अमोल मुळे (समन्वयक समाज कल्याण विभाग, लातूर ) हे होते व श्री. गंगाधर जोगदंड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ.प्रशांत दीक्षित, एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा.विलास कोमटवाड प्रा.अनिल भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.श्री. अमोल मुळे यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. अनुसूचित जाती, जमाती घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी मिळावी शिक्षणाच्या प्रवाहातून गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी भारत सरकार विविध शिष्यवृत्ती देत असते. त्यामध्ये भारत सरकार राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना व सावित्रीबाई फुले स्वाधार शिष्यवृत्तीच्या योजना राबवल्या जातात. त्यासाठी जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला असे विविध आवश्यक कागदपत्रे लागतात त्याची पूर्तता विद्यार्थ्यांनी करून शैक्षणिक जीवन यशस्वी करावे. अशी विविध शिष्यवृत्ती त्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात असे प्रतिपादन केले की,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना दिली आणि ती देशाने स्वीकारली. २६ जानेवारी १९५० पासून ती देशात लागू झाली. स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या प्रमुख घटकांनी आपली राज्यघटना तयार झाली आहे. राज्यघटनेमध्ये समाजातील घटकांचा विचार गांभीर्याने केला आहे. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्याय मिळवून दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार छत्रपती शाहू महाराज यांची कृती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी असा त्रिवेणी संगम भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विलास कोमटवाड, सूत्रसंचालन कु. स्नेहल जाधव व आभार प्रा. अनिल भुरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
लातूर