राज ठाकरेंच्या मनसेची 'प्रादेशिक पक्ष' म्हणून मान्यता रद्द होऊ शकते का?

 


राज ठाकरेंच्या मनसेची 'प्रादेशिक पक्ष' म्हणून मान्यता रद्द होऊ शकते का?


विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 'अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...' असे ट्वीट केले. संपूर्ण राज्यात राज ठाकरेंच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 पैकी 125 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. मात्र त्यांना एकाही जागेवर यश मिळालं नाही. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाला. शिवसेनेच्या (शिंदे गट) राजेश मोरे यांनी 66 हजार 396 मतांनी राजू पाटील यांचा पराभव केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा विचार करायचा झाला, तर मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत लवकर त्यांचे उमेदवार जाहीर केले. त्यामुळे तुलनेनं मनसेच्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचा वेळ मिळाला. राज ठाकरेंनीही राज्यभर सभांचा धडाका लावला.

असं असूनही विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या या दारुण पराभव झाल्याने आता मनसेचं भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने मनसेचं राजकीय भविष्य काय असेल याविषयी राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेतलं.

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्य यांनी राज ठाकरेंच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिकांकडे लक्ष वेधलं. तसेच या धरसोडपणामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं मत व्यक्त केलं.

संदीप आचार्य म्हणाले, "मनसेच्या स्थापनेच्यावेळी राज ठाकरेंनी मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतो अशी भूमिका शिवाजी पार्कवर घेतली होती. तसेच त्यावेळच्या सर्व पक्षांवर टीका करत मी कुणाशी युती करणार नाही, आघाडी करणार नाही, तडजोडी करणार नाही, असं जाहीर केलं होतं. त्यानंतरच्या काळात त्यांची वाटचाल वेगळ्या दिशेने झाली."

"राज ठाकरे यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा छोट्या निवडणुका लढवण्यात रस नव्हता. मुळात जेव्हा राजकीय पक्ष काढला जातो तेव्हा त्या नेत्याला राज्यातील प्रत्येक निवडणुकीत रस असावा लागतो. मात्र, राज ठाकरे यांच्या राजकारणात याविषयी सातत्यपूर्ण अभाव राहिला," असं मत संदीप आचार्य यांनी व्यक्त केलं.

"या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे मनसेचा कार्यकर्ता तुटत गेला. पक्षबांधणीत राज ठाकरे कमकुवत ठरले. पक्षबांधणीसाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. त्यांनी काही वेळा उमेदवार उभे केले नाही, काही वेळा ठराविक नेत्यांच्या विरोधातच उमेदवार दिले. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. स्वतःचा पक्ष असताना निवडणूक न लढता असा पाठिंबा देण्यामुळे त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी होत गेली," असंही आचार्य यांनी नमूद केलं.

मनसेच्या राजकीय भूमिका कशा बदलल्या?

मनसेने वेगवेगळ्या भूमिका घेऊन निवडणुका लढवल्या. 2014 लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी भूमिका घेत निवडणूक लढवले. तसेच भाजपच्या उमेदवारांविरोधात मनसेचे उमेदवार उभे केले नाहीत.

त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका भाजपविरोधात झाली. तेव्हा त्यांनी भाजपच्या प्रचंड विरोधात प्रचार केला. विशेष म्हणजे तेव्हा त्यांनी निवडणूकही लढली नव्हती. मात्र ते प्रचार करत होते. या प्रचारात त्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपविरोधात प्रचार केला होता.

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक दीपक भातुसे यांनीही हाच मुद्दा मांडत राज ठाकरेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेंवर बोट ठेवले. ते म्हणाले, "आधी भाजप विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे असं नेमकं काय घडलं असे प्रश्न उपस्थित झाले. आता या विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्र लढले. यावेळी त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार पाडायचे होते. त्यासाठी त्यांनी ही रणनिती आखली होती."

"राज ठाकरे एक स्पष्ट भूमिका घेऊन पुढे जात आहेत, असं कधीच दिसलं नाही. त्यांनी प्रत्येकवेळी भूमिका बदलली. त्यामुळे लाखोंची गर्दी होते असा करिष्मा असणारा नेता असूनही राज ठाकरेंना राज्यात त्यांचा पक्ष उभा करता आला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला आणि यावेळी एकही आमदार निवडून आला नाही. राजकारणातील या धरसोड वृत्तीचा राज ठाकरे यांना फटका बसला," असं मत दीपक भातुसे यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 नंतर आता भाजपला मनसेची गरज राहिलेली नाही, असं संदीप आचार्य यांनी सांगितलं. ते म्हणाले, "राज ठाकरेंनी आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असं म्हटलं होतं. त्यांना वाटलं होतं की, ही निवडणूक घासून होईल, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, मनसेचे 2-4 आमदार येतील. अशावेळी सत्तास्थापनेसाठी मनसेची गरज पडेल. मात्र त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. दुसरीकडे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता भाजपला राज ठाकरे आणि मनसेची गरज नाही. त्यामुळे राज ठाकरे कुणासोबत जातील काहीच सांगता येत नाही."

"भाजपला अपेक्षित होतं की, राज ठाकरेंनी त्यांच्यावर कमीत कमी टीका करावी आणि उद्धव ठाकरेंवर टीका करून मुंबईत त्यांची शक्य आहे तेवढी मतं खेचावी. यातून मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होईल आणि उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंना त्याचा फटका बसेल. त्यांचा हेतू साध्य झाला. आता महापालिका निवडणुकीत भाजपला मनसेची गरज नाही," असं मत संदीप आचार्य यांनी व्यक्त केलं.

"स्पष्ट भूमिकाच घ्यायची नाही, कधी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, कधी त्यांच्याविरोधात बोलायचं असं झालं. भूमिकेत सातत्य नसल्याने राज ठाकरे आणि मनसेवर मतदार विश्वास ठेवायला तयार दिसत नाहीत. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या विधानसभेत मनसेला मिळालेल्या मतांमध्येही घट झाली आहे. राज ठाकरे यांची तळ्यात मळ्यात भूमिका जनतेला पटलेली नाही. त्याचा त्यांना मोठा फटका बसला. मतदारांनी आम्हाला गृहीत धरू नका असं मनसेला सांगितलं आहे," असंही आचार्य यांनी नमूद केलं.

राज ठाकरे आणि मनसेचं राजकीय भविष्य काय?

राज ठाकरे

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,राज ठाकरे

राज ठाकरे आणि मनसेचं राजकीय भविष्य काय, या प्रश्नावर बोलताना दीपक भातुसे म्हणाले, "उपयोग होणार असेल तर भाजपकडून वापर होणं हेच राज ठाकरे आणि मनसेचं राजकीय भविष्य दिसतं आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या पेक्षा यावेळी त्यांच्या मतांमध्ये घट झाली आहे. यावरून मतदारही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसल्याचं दिसत आहे. त्यांचा मतदारही त्यांच्यापासून दुरावला आहे."

"प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदारांचा पाठिंबा गमावला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा राजकारणातील वैयक्तिक करिष्मा कायम राहील, पण मनसेचं भविष्य अधांतरितच राहील. या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट राजकीय भूमिका असलेले पक्षही नेस्तनाबूत झाले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी काहीही भूमिका घेतली, तरी पुढील 5 वर्षे त्यांचं भविष्य अधांतरितच असेल," असंही दीपक भातुसे यांनी नमूद केलं.

मनसेचे कुठे किती उमेदवार?

मुंबई आणि ठाण्यात 54 मतदारसंघ आहेत. मनसे या भागात प्रबळ मानली जात होती आणि यंदा या 54 पैकी 41 जागा मनसेने लढवल्या.

मनसेने मुंबईत 27 आणि ठाण्यात 14 उमेदवार दिले होते.

मनसेचे कोणते प्रमुख नेते निवडणूक रिंगणात होते?

2009 साली माहीममधून नितीन सरदेसाई मनसेचे आमदार बनले होते. त्यानंतरही दोन निवडणुका म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये मनसेने आपली मतसंख्या राखल्याचं चित्र दिसून आलं. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत मनसेला इथे 40 ते 42 हजार मतं मिळाली आणि उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिला.

यंदा राज ठाकरेंनी माहीममधून मुलगा अमित ठाकरे यांना उमेदवारी देऊनही मतांची संख्या कमी होऊन 33 हजार 62 वर पोहचली. तसेच अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेले. या मतदारसंघात शिवसेनेच्या (ठाकरे गट) महेश सावंत यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) सदा सरवणकर यांचा 1 हजार 316 मतांनी पराभव केला.

मुंबईतलाच आणखी एक मतदारसंघ म्हणजे शिवडी. इथून मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर रिंगणात होते, तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी उभे होते. विशेष म्हणजे, इथे महायुतीने उमेदवार दिला नव्हता.

त्यांनी मनसेच्या नांदगावकरांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेची ताकद वाढली होती. असं असतानाही त्यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी 7 हजार 140 मतांनी नांदगावकरांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक मारली. चौधरी यांना 74 हजार 890 मते मिळाली, तर नांदगावकरांना 67 हजार 750 मते मिळाली.

राज ठाकरे, संदिप देशपांडे आणि इतर मनसे नेते

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,राज ठाकरे, संदिप देशपांडे आणि इतर मनसे नेते

मनसेचे इतर महत्त्वाचे उमेदवार

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात तर चारही उमेदवार मातब्बर होते. बेलापूरमध्ये मनसेकडून गजानन काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संदीप नाईक आणि भाजपकडून मंदा म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर शिवसेनेचे नेते विजय नाहटा यावेळी अपक्ष मैदानात होत्या.

‘मातोश्री’च्या अंगणातील मतदारसंघ म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं, त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातली निवडणूकही रंगतदार झाली. इथून राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी, शिवसेना ठाकरे गटाने वरुण सरदेसाई, तर मनसेकडून तृप्ती सावंत मैदानात होत्या.

तसंच, शिंदे गटाचे पदाधिकारी कुणाल सरमळकर यांनीही या मतदारसंघातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत झाली.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर या भागातील मनसेचे अखिल चित्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे गाजला. आदित्य ठाकरे इथून आमदार होते. त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे आणि शिंदे गटाकडून मिलिंद देवरा रिंगणात होते.

मागील काही निवडणुकीत भांडुप, घाटकोपर पूर्व, विक्रोळी, ठाणे शहर, खडकवासला, कोथरूड अशा काही विधानसभा मतदारसंघात मनसेला निर्णयक आणि चांगली मतं पडली होती. मात्र येथेही मनसेला यश आलं नाही.

पाडवा मेळाव्यात जमलेले मनसे समर्थक

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,पाडवा मेळाव्यात जमलेले मनसे समर्थक

प्रमुख मतदारसंघातील लढती

  • ठाणे शहर मतदार संघ भाजपचे संजय केळकर वि. मनसेचे अविनाश जाधव वि. ठाकरे गटाचे राजन विचारे
  • दहिसर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या मनीषा चौधरी वि. मनसेचे राजेश येरुनकर वि. ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर
  • गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर वि. मनसे कडून वीरेंद्र जाधव वि. ठाकरे गटाचे समीर देसाई
  • चारकोप विधानसभा मतदारसंघातून भाजपचे योगेश सागर वि. मनसेचे दिनेश साळवी वि. काँग्रेसचे यशवंत सिंग
  • घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राम कदम वि. मनसेचे गणेश चुकल वि. ठाकरे गटाचे संजय भालेराव
  • कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल भातखळकर वि. मनसेचे महेश फरकासे वि. काँग्रेसचे कालू बुधेलिया
  • ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक वि. मनसेचे निलेश बानखेले वि. अपक्ष विजय चौधरी
  • बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे वि. मनसे कडून गजानन काळे वि. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून संदीप नाईक
  • मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे किसन कथोरे वि. मनसेच्या संगीता चेंदवनकर वि. शरद पवार गट शैलेश वडनेरे
  • भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महेश चौगुले वि. मनसेचे मनोज गुळवी वि. काँग्रेसचे दयानंद चोरगे
  • नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजन नाईक वि. मनसेचे विनोद मोरे वि. काँग्रेसचे संदीप पांडे
  • औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अभिमण्यु पवार वि. मनसेचे शिवकुमार नागराळे,
  • जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुरेश भोळे वि. मनसेचे डॉक्टर अनुज पाटील
  • वणी विधानसभा मतदारसंघातून संजीव रेड्डी बोर्डकुरुवार वि. मनसेचे राजू उंबरकर वि. ठाकरे गटाचे संजय देरकर

मनसेची आजवरची कामगिरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत 4 विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत.

2024 ची निवडणूक ही मनसेची चौथी विधानसभा निवडणूक आहे. मनसेच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकूया :

2009 विधानसभा निवडणुकीत मनसेने 143 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर मनसेच्या उमेदवारांना विजय मिळाला होता, तर 130 जागांवर पराभव झाला होता. मात्र, 130 जागांवर मतांची टक्केवारी चांगली होती.

2014 विधानसभा निवडणुकीत 219 जागा मनसेने लढवल्या होत्या. त्यापैकी एक जाग्यावर मनसेला विजय मिळाला आणि 218 जागांवर मनसेचा पराभव झाला.

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने 101 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर विजय मिळाला, तर 100 जागांवर अपयश मिळालं.

2024 विधानसभा निवडणुकीत 125 जागांवर उमेदवार उभे, शून्य ठिकाणी विजय

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता टिकविण्यासाठी काय असतात नियम?

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवताना निवडणूक आयोगानं घालून दिलेले निकष पूर्ण करायचे असतात. ते निकष पूर्ण केल्यानंतर निवडणूक आयोग संबंधित पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा बहाल करते. त्यासाठी नियम खालीलप्रमाणे –

  • विधानसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6 टक्के मतं आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा म्हणजेच दोन आमदार निवडून येणं गरजेचं असतं.
  • लोकसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6 टक्के मतं मिळायला हवीत.
  • विधानसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला एकूण मतांपैकी कमीत कमी 3 टक्के मतं मिळाले असतील तर त्या पक्षाचे 3 आमदार निवडून यायाला पाहिजे.

प्रादेशिक पक्षाची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला वरील नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. नाहीतर पक्षाची मान्यता रद्द होते.

मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द होईल?

महाराष्ट्रात महायुतीला कौल मिळालेला आहे. यात स्वबळावर लढणाऱ्या आणि जिंकल्यानंतर महायुतीसोबत सत्तेत बसू म्हणणाऱ्या मनसेची एकही जागा निवडून आली नाही. 2019 ला राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार होते. पण, ही जागा सुद्धा यावेळी त्यांना राखता आली नाही.

तसेच माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे स्वतः मैदानात होते. पण, त्यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. मनसेच्या एकूण उमेदवारांना मिळालेली मतं सुद्धा फक्त 1.55 टक्के आहे. निवडणूक आयोगानं ही आकडेवारी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

मनसेनं या निवडणुकीत केलेली कामगिरी ही निवडणूक आयोगानं प्रादेशिक पक्षासाठी दिलेले निकष पूर्ण करताना दिसत नाही. त्यामुळे मनसेची पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडील मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

याआधी मनसेची मान्यता टिकून होती. कारण, 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये मनसेचा एक आमदार निवडून आला होता. पण, या निवडणुकीत मनसेचा आमदारही निवडून आला नाही आणि त्यांच्या मतांचा टक्काही घसरला आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत मान्यता आणि रेल्वे इंजिन चिन्ह जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेची पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडील मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

फोटो स्रोत,ANI

फोटो कॅप्शन,मनसेची पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडील मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

मनसे हा निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला अधिकृत प्रादेशिक पक्ष आहे. त्यांना 2009 च्या निवडणुकीत रेल्वे इंजिन हे कॉमन चिन्ह देण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षाचे आमदार निवडून आले आणि त्यांनी निवडणूक आयोगाचे निकष पूर्ण केले. त्यामुळे मनसेकडे रेल्वे इंजिन अजूनही टिकून होतं.

आता या निवडणुकीत पक्षाची कामगिरी निवडणूक आयोगाच्या निकषानुसार नाही. त्यामुळे मनसेचं चिन्ह जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पण, निवडणूक आयोगानं काढेल्या एका पत्रकानुसार, एखाद्या पक्षाची मान्यता रद्द झाली तर लगेच चिन्ह जाईल असं नसतं. तो पक्ष तेच चिन्ह काही काळ वापरून आपला दर्जा परत मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो. तशी विनंती निवडणूक आयोगाला करण्याची सुविधा आयोगानं उपलब्ध करून दिली आहे. पण, पक्षाला ही सुविधा दिल्यामुळे इतर सुविधा पुरविल्या जातील असं नाही.

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांना दूरदर्शनवर आणि ऑल इंडिया रेडीओवर मोफत प्रक्षेपणासाठी वेळ मिळतो, निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्या मोफत वितरीत केल्या जातात या सुविधा पक्षांची नोंदणी रद्द झालेल्या पक्षाला मिळत नाहीत.

मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द होईल अशी चर्चा सुरू झाल्यानंतर आम्ही मनसेच्या नेत्यांसोबत संपर्क साधला.

मतांचा टक्का आणि निवडणूक आयोगाचे नियम याबद्दल पक्षातील तज्ज्ञ मंडळी राज साहेबांना भेटतील आणि माहिती देतील. त्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल, असं मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले.

Post a Comment

Previous Post Next Post