एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; आता धुरा कुणाच्या खांद्यावर? सस्पेन्स कायम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राज्यपालांनी राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 288 जागांपैकी 230 जागांवर दणदणीत विजय मिळाल्याने पुन्हा एकदा युतीच्या सत्तास्थापनेचा मार्ग स्पष्ट आहे. पण निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटून गेले, तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण? याबाबत सस्पेन्स कायम आहे.
महायुतीत भाजपाचे तब्बल 132 आमदार निवडून आल्याने मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, हीच शक्यता अधिक निश्चित मानली जात असली, तरी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यासाठी दबावतंत्र वापरलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तर भाजपाचे राज्यातील काही नेते, आमदार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.
अर्थात, हा निर्णय भाजपाचे पक्षश्रेष्ठी घेणार हे उघड असलं, तरी घवघवीत यश मिळूनही मुख्यमंत्री ठरवण्यास किंवा नाव जाहीर करण्यास भाजप वेळ का घेत आहे?
तसंच, एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपचं संख्याबळ अधिक असूनही मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करून काय साध्य करू पाहत आहे? आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला तात्काळ पसंती देण्यामागचं कारण काय आहे?
या प्रश्नांची सविस्तर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या बातमीतून करणार आहोत.
मित्रपक्षांचे गटनेते ठरले, भाजपचा का नाही?
23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या पक्षाचा गटनेता ठरवण्यासाठी बैठक बोलवली. परंतु, भाजपकडून अद्याप गटनेताही ठरवण्यात आलेला नाही.
एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीत रविवारी (24 नोव्हेंबर) मुंबईतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये बैठक पार पडली. यात एकनाथ शिंदे यांना एकमताने गटनेते बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचाही निर्णय झाला.
तसंच, अजित पवार यांच्या सरकारी निवासस्थानीही राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी अजित पवार यांना पक्षाचा गटनेता निवडण्यात आलं.
पक्षस्थापनेचा दावा केल्यानंतर शपथविधीसाठी युतीतील दोन पक्षांचे आमदार मुंबईत दाखल होऊन 24 तास उलटले आहेत, परंतु भाजपाकडून मात्र अद्याप आपल्या आमदारांना मुंबईत येण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. यामुळे आमदारांमध्येही पक्ष नेमका वेळ कशासाठी घेत आहे अशी चर्चा सुरू आहे.
पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार भाजपचे निरीक्षक मुंबई किंवा दिल्ली येथे बैठक घेतात. या बैठकीनंतर आमदारांच्या उपस्थितीत पक्षाचा गटनेता ठरवला जातो. आणि यानंतर आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांकडे पाठवलं जातं. परंतु भाजपने अद्याप बैठकच बोलवली नसल्याने मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी
एकीकडे भाजपाचे नेते 132 आमदारांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री आपलाच होणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह दिसून येत आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मात्र शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवावं यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी तर असं म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं आणि यासाठी म्हस्केंनी बिहारच्या फाॅर्म्युल्याचा दाखला दिला.
नरेश म्हस्के म्हणाले, "बिहारमध्ये संख्याबळ कमी असताना देखील नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली गेली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद जाहीर केलं जाईल, असा ठाम विश्वास आहे."

तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही एक्स या समाजमाध्यमावर 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत' अशी पोस्ट शेअर केलीय.त्यानंतर काही मिनिटातच ही पोस्ट डिलीटही केली.
तसंच, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात साकडे आणि महिला कार्यकर्त्यांकडून महाआरती सुद्धा आयोजित करण्यात आली होती.
यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे सांगतात, "विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते. त्यांच्याच कॅप्टनशीपखाली महायुतीने निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमताने जिंकली. त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली. याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरुन यश टाकले. याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे यांना जाते. म्हणून तेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावेत."
भाजपा नेत्यांकडून फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह
23 तारखेनंतर सलग दोन दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावं अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.
तसंच फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान 'सागर' याठिकाणी राज्यातील आमदार, मंत्री आणि नेत्यांनी भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील भाजपचे आमदार, नारायण राणे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अशा अनेकांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे.

तर आमदार प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन अशा अनेक भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याची भावना व्यक्त केली.
प्रवीण दरेकर म्हणाले, "भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय. मुख्यमंत्री आमच्या महायुतीचाच होईल. कुठलेही वादविवाद नसतील. भाजपा मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याने स्वाभाविकपणे भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे वाटते."
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अद्याप यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही.
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विलंब होतोय का?
भाजपच्या कार्यपद्धतीनुसार विधिमंडळ पक्षाची बैठक ही दिल्लीहून निरीक्षक आल्यानंतरच पार पडते. अद्याप भाजपची ही बैठक झालेली नाही. यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय अडलंय? याची चर्चा सुरू आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शुभांगी खापरे यांच्यानुसार, पक्ष वेळ घेत असला तरी ही नैसर्गिक प्रक्रिया असून कोणतंही सरकार बहुमत मिळाल्यानंतर दोन दिवसांत स्थापन झालेलं नाही.
त्या पुढे सांगतात, "या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. राज्यपाल पक्षाला वेळ देऊ शकतात. भाजपकडे अपक्षांचं समर्थन मिळवून 137 आमदारांचं संख्याबळ आहे. यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच असेल यात शंका नाही. यात मित्रपक्षांसोबत भाजपा काही वाटाघाटी करेल याची शक्यता कमी आहे."
भाजपची अद्याप विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडलेली नाही. यामुळे पक्षाच्या गटनेते पदाची निवडही झालेली नाही.
शुंभांगी खापरे सांगतात, "एक शक्यता असू शकते की लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. यामुळे चर्चेला वेळ लागत असेल. तसंच मित्र पक्षांना विश्वासात घ्यावं लागेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पक्षालाही सांगावं लागेल. या प्रक्रियेला वेळ लागतो. तसंच भाजपकडून निरीक्षक येतील, ते सर्व आमदारांना बोलवतील. त्यांच्यासमोर गटनेत्याची निवड होईल. तो नेताच मुख्यमंत्री असेल असं गृहीत धरलं जातं. यामुळे केंद्राच्या नेतृत्त्वाने निर्णय घेतला असला तरी प्रक्रिया पूर्ण करायला एक आठवडा तरी लागेल."

तसंच, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "मला वाटतं भाजपा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला वेळ देत आहे. त्यांनी स्वतःहून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्त्व मान्य करावं यासाठी त्यांना काही वेळ दिला जात आहे. तसंच, जिल्हावार मंत्रिपदं ठरवण्यासाठीही नियोजन सुरू असावं. भाजपला बहुमत स्पष्ट असल्याने ते कोणतीही घाई करू इच्छित नाहीत असं एकंदरीत दिसत आहे."
यासंदर्भात आम्ही भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशीही बोललो. ते म्हणाले, "अधिकृत राजपत्र तर रविवारी उशिरा आलं आहे. यामुळे 48 तास झालेले नाहीत. तसंच भाजपाचे आमदार आपआपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा करत आहेत. यामुळे लवकरच मुंबईत विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. ही प्रक्रिया आहे. यानंतर तिन्ही पक्षांची बैठक ठरेल. मग मुख्यमंत्रिपदाची घोषणा होईल."
'एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल'
14 व्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे.
यामुळे 26 तारखेपर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात सत्ता स्थापन न झाल्यास पुढे कायदेशीर पर्याय काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात बोलताना विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सांगतात, "कार्यकाळ ज्या दिवशी संपतो त्या दिवशी विद्यमान मुख्यमंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. यामुळे एकनाथ शिंदे यांना 26 तारखेला राजीनामा द्यावा लागेल. ते राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील."
"15 व्या विधानसभेचा निकाल स्पष्ट झाल्याने आणि बहुमत असल्याने राज्यपाल काही दिवसांचा कालावधी युतीला देऊ शकतात. तोपर्यंत शिंदे यांनाच तुम्ही राज्याचा कारभार साभांळा असं सांगितलं जाऊ शकतं. यापूर्वीही असं अनेकदा झालेलं आहे," असंही कळसे यांनी स्पष्ट केलं.
तसंच, बहुमत स्पष्ट झाल्याने राष्ट्रपती राजवट लागणार नाही असंही ते सांगतात.
No comments:
Post a Comment