Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    सोयीचे राजकारण करणारे कराड जनतेशी प्रामाणिक राहणार का?











     सोयीचे राजकारण करणारे कराड

    जनतेशी प्रामाणिक राहणार का?

    ग्रामीण मतदारांचाच सवाल, कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचा सूर
    लातूर : प्रतिनिधी
    लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार रमेश कराड यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे. जिथे पद, उमेदवारी मिळेल, तिथे निष्ठा दाखवायची आणि ज्यांनी आपले म्हणून मान-सन्मान दिला, त्याची वेळप्रसंग पाहून साथ सोडायची, असेच त्यांचे राजकारण झाले आहे. आज ते भाजपचे निष्ठावान असल्याचे दाखवत असले तरी नेहमीच राजकीय सोय पाहून भूमिका बदलणारे कराड जनतेशी प्रामाणिक राहतील काय, असा प्रश्न मतदारांमधून उपस्थित होत आहे. त्यातच त्यांची धरसोड भूमिका आणि जे काही हवे ते मलाच, या प्रवृत्तीमुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतही नाराजी आहे. त्यामुळे कराडांसमोर स्वकीयांचे आव्हान मोठे आहे.

    एकवेळी रमेश कराड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होते. तेथे त्यांनी विविध पदांवर काम केले, तसेच उमेदवारीसाठीही प्रयत्न केले. दरम्यानच्या काळात ते भाजपमध्ये दाखल झाले. तिथे गेल्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावान म्हणून पुढे आले. त्यांच्या पश्चात त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बहीण मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. परंतु २०१९ मध्ये पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, तेव्हापासून मागची जवळपास साडेचार वर्षे त्यांना संधी नाकारली. त्यातच जेव्हा मुंडेंना विधान परिषद नाकारून कराडांना संधी मिळाली, त्यावेळी मागे-पुढे न पाहता आमदारकी स्वीकारली. त्यांना भाजपची आमदारकी मिळण्याअगोदर मधल्या काळात जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली, त्यावेळी त्यांनी उमेदवारीसाठी लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा राष्ट्रवादीची उमेदवारीची शक्यता निर्माण झाली, तेव्हा भाजप नेत्यांनी ऐनवेळी खोडा घालत आमदारकी देण्याचे आमिष दाखविले तेव्हा ऐनवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना धोका देत पुन्हा भाजपवासी झाले. हा इतिहास लातूर ग्रामीणमधील मतदारांना माहित आहे. पद आणि प्रतिष्ठेसाठी सातत्याने निष्ठा बदलण्याच्या पद्धतीमुळे ते उद्या मतदारांशी तर प्रामाणिक राहणार का, असा प्रश्न लातूर ग्रामीण मतदारसंघातील मतदार उपस्थित करीत आहेत.

    २०१९ च्या निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटला. त्यामुळे रमेश कराड यांनी पूर्ण तयारी करूनही उमेदवारीची संधी हुकली. परंतु पक्षाचा निर्णय शिरसावंद्य मानून त्यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता. परंतु त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे स्वार्थाआड येणाºया प्रत्येक गोष्टीच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलायचे, अशीच त्यांची भूमिका राहिलेली आहे. यावेळीदेखील भाजपकडून अनेकजण उमेदवारीसाठी दावेदार होते. कराड यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकी असल्याने लातूर ग्रामीणमधून वेगळा उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न होता. परंतु कराड यांनी उमेदवारीचा आपला आग्रह सोडलाच नाही. त्यामुळे भाजपचे निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांत नाराजी असून, यावेळी विरोधी पक्षाच्या तगड्या आव्हानासोबतच त्यांना स्वकीयांचेदेखील मोठे आव्हान आहे.

    दोनवेळा पराभूत होऊनही मैदानात
    लातूर ग्रामीण मतदारसंघात देशमुख कुटुंबीयांच्या मांजरा परिवाराचे कार्य आणि नेटवर्क मोठे आहे. परंतु त्यांना मीच तोडीस तोड आव्हान देऊ शकतो, असे सांगत भाजपकडून उमेदवारी मिळविण्यात रमेश कराड यशस्वी ठरतात. परंतु त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागतो. या मतदारसंघातून त्यांना दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागला. परंतु तसे असताना दुसºयांना संधी देण्याऐवजी पुन्हा त्यांनीच उमेदवारी मिळविली. परंतु यावेळी पक्षांतर्गत वाढलेली नाराजी आणि मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी साथ सोडून कॉंग्रेस पक्षात केलेला प्रवेश पाहता ही निवडणूक त्यांना जड जाणार असल्याची मतदारसंघात चर्चा आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad