उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं भवितव्य आता काय असेल?

 


उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं भवितव्य आता काय असेल?


खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय जनतेच्या न्यायालयाच होईल, असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणत होते, त्यासाठी ते विधानसभेच्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होते. आता जनतेनं कौल दिला आहे आणि एकनाथ शिंदेंच्या पदरात भरभरून मतांचं दान टाकलं आहे.

मग शिंदेंची शिवसेनाच खरी आहे हे लोकांनी मान्य केलंय का? उद्धव ठाकरेंना लोकांनी पूर्णपणे नाकारलं आहे का? झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना जे जमलं ते उद्धव ठाकरे यांना का जमलं नाही, ते आता पुढे काय करतील.

त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे यांचं भवितव्य आता काय असेल असे अनेक प्रश्न या निकालातून उपस्थित होत आहेत. आपण त्यांचं उत्तर या लेखात शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या निकालांनंतर उद्धव ठाकरेंना त्यांच्या रणनितीत 180 अंशात बदल करावा लागेल याच शंका नाही. गद्दार आणि खोके नरेटिव्ह काम करत नसल्यानं नवीन मुद्दे शोधून काढावे लागणार आहेत.

शिवाय उद्धव ठाकरेंना सर्वांत आधी त्यांच्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल. त्या शिवाय उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण करता येणार नाही.

शिवाय मुंबईमध्ये महायुतीची सरशी होणं एक प्रकारे उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा आहे. येत्या काळात जर मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागल्या तर त्या जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंना नवी रणनिती आखावी लागेल. कारण ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं’ जुनं नरेटिव्ह आता चालेलच अशी स्थिती नाही.

तसंच उद्धव ठाकरेंपुढे आता सर्वांत मोठं आव्हान असेल ते त्यांच्या पक्षात असलेल्य नेत्यांना कायम टिकवून ठेवणं. शिंदेना मिळालेल्या यशानंतर इतर नेते त्यांच्याकडे आकर्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाकरेंशिवाय शिवसेना यशस्वी होऊ शकते हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंपुढे सर्वात मोठा कठीण काळ आहे, असं विश्लेषक जेष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.

शिवसेना भवन
फोटो कॅप्शन,शिवसेना भवन

ते सांगतात, “उद्धव ठाकरेंना आता पूर्णपणे नव्याने संपूर्ण आखणी करावी लागेल. सर्वच गोष्टींचा पुन्हा नव्याने विचा करावा लागेल, पक्ष संघटना चालवण्याची पद्धत, हिंदुत्व, काँग्रेसबरोबरची आघाडी या सर्वच गोष्टींचा नव्याने विचार करावा लागणार आहे. नाहीतर त्यांच्यासमोर पुन्हा एकदा संघटना फुटीची भीती आहे. त्यामुळे संघटना नाउमेद न होण्यासाठी त्यांना मोठं काम करावं लागेल.”

साठे यांच्या मताशी सहमती दर्शवत जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांना देखील हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वांत मोठा संघर्षाचा काळ असल्याचं वाटतं.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “नुसत्या सभांनी निवडणुका जिंकता येत नाहीत हे आता उद्धव ठाकरेंना कळून चुकलं असेल. शिवसेनेनं आतापर्यंतची सर्वांत वाईट कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्यापुढे मातोश्रीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. त्यांना आता लोकांना भेटावं लागेल. कार्यकर्त्यांना वेळ द्यावा लागेल. निवडून आलेल्या आमदारांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. त्यांना जर का उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास उरला नाही तर ते शिंदेंकडे जाण्याची भीती आहे.”


आमदार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना विधानसभेतल्या प्लोअर मॅनेजमेंटवरदेखील लक्ष घालावं लागेल. तसंच त्यांना सतत वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सतत समन्वय साधावा लागेल.

पण उद्धव ठाकरेंना त्यांचं भवितव्य टिकवण्यासाठी काँग्रेसची साथ सोडण्याचा सर्वांत मोठा धाडसी निर्णय घ्यावा लागेल, असं जेष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांना वाटतंय. लांबे सध्या दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक आहे. काही काळ ते सामानच्या छत्रपती संभाजीनगरच्या अवृत्तीचेदेखील संपादक होते.

लांबे त्यांचा मुद्दा जास्त स्पष्ट करून सांगताना हेमंत सोरेन यांचं उदाहरण देतात. ते सांगतात, “हेमंत सोरेन यांची विचारसरणी काँग्रेसला साजेशी होती. त्यामुळे तिथं त्यांनी काँग्रेसबरोबर जाणं त्यांच्या मतदारांना अयोग्य वाटलं नाही. पण शिनसेनेचा जन्मच मुळात काँग्रेसच्या विरोधात झालेला आहे. काँग्रेसबरोबर जाताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि मराठीबाणा हे त्यांचे मुख्य मुद्देच सोडले, जे लोकांना पटलेलं नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा प्रखर हिंदूत्वाची कास पुन्हा धरावी लागेल.”

शिवाय उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा विचार केला तर दोन्ही शिवसेना पुढे जाऊ शकतात, असं लांबे यांना वाटतं.

एक महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यायला पाहिजे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याचा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानादेखील त्यांची तब्येत फारशी ठिक नव्हती. त्यानंतर पक्ष फुटल्यावर ते जोमानं कामाला लागले होते. आतासुद्धा त्यांना तब्येत जपत जोमानं काम करावं लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post