मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोण? कुणाकडे सोपवलं जाईल राज्याचं नेतृत्व?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असा आहे. सध्या महायुती 225 जागांवर तर महाविकास आघाडी 55 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 8 जागांवर आघाडीवर आहेत.
चित्र पुरेसं स्पष्ट आहे. 15 व्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता असणार आहे.
अर्थातच, आता सर्वांत मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तो मुख्यमंत्रिपदाचा. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांपैकी कुणाला मुख्यमंत्रिपद मिळणार आणि कोण उपमुख्यमंत्रिपदी राहणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
एकनाथ शिंदे आपलं मुख्यमंत्रिपद सोडणार का? देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सत्ता सोपवली जाणार की भाजप आपल्या पक्षातील एखाद्या नव्या चेहऱ्याला पुढे करणार?
काहीतरी वेगळा धक्का म्हणून अजित पवार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा वेगळा डाव महायुती टाकेल का?
सध्या ना-ना प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नेमकं कोण आहे आणि कुणाच्या हातात मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाऊ शकते, याचा हा धांडोळा.
दोन्ही आघाड्यांमध्ये जाहीर केला नव्हता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
खरं तर निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दोन्हीही आघाड्यांकडून जाहीर करण्यात आलेला नव्हता. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यावरुन मोठी धुसफूसही दिसून आली.
उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे येण्यास उत्सुक होते खरे मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या उर्वरित दोन पक्षांनी तसं होऊ दिलं नाही.
महायुतीमधूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नव्हता. मात्र, त्यांच्यामध्ये याबद्दलची धुसफूस निवडणुकीपूर्वी दिसून आली नाही.
यासंदर्भात बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भात तीन शक्यता बोलून दाखवल्या.
ते म्हणाले की, "आताचे आकडे पाहता भाजपला स्वत:कडे मुख्यमंत्रिपद घेण्यामध्ये सध्या अडचण दिसत नाही. मात्र, पुढच्या काळात मुंबईसह राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकींना सामोरं जाण्यासाठी चेहरा नवीन आणायचा की आहे तोच चेहरा तात्पुरता ठेवून तो नंतर बदलायचा अशीही एक शक्यता आहे.
त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयातून येणं यासाठी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे. दुसरी शक्यता म्हणजे फडणवीसांची 'पुन्हा येईन'ची प्रतिज्ञा पूर्ण करु देणे. तिसरी शक्यता म्हणजे भाजपचाच मुख्यमंत्री करायचा पण नवा चेहरा द्यायचा आणि फडणवीसांना केंद्रात घ्यायचं. यातील एकनाथ शिंदे आणि फडणवीस या दोघांपैकीच कुणीतरी एक मुख्यमंत्री होईल, असं मला वाटतं."
एकनाथ शिंदे
शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. 2022 साली त्यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि आपल्यासोबत 40 आमदार घेऊन ते गुवाहाटीला गेले. या 'गुवाहाटी बंडा'मुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
तेव्हाही सर्वांनी अशीच अपेक्षा व्यक्त केली होती की, या नव्या सरकारचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसचं असतील. मात्र, अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली गेली.

'एकनाथ शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री असतील, मात्र खरी सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या हातातच आहे', अशा स्वरुपाचं नरेटीव्ह विरोधकांकडून मांडण्यात आलं. मात्र, आपण स्वतंत्रपणे राज्य चालवू शकतो, हे त्यांनी गेल्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात सिद्ध करण्यात यश मिळवलं.
लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेला 7 जागा मिळवून देण्यात यश मिळवलं होतं.
आता त्यांच्या शिवसेनेला 55 जागांवर आघाडी असून दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाविकास महाविकास आघाडीला 51 जागा मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, निश्चितच मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुन्हा घेतलं जाऊ शकतं.
त्यांच्या शिवसेनेमध्ये त्यांच्याशिवाय इतर कोणतंही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत नाही. इतर नावांच्या चर्चेची शक्यताही दिसत नाही.
मात्र, निकालानंतर पत्रकारांशी झालेल्या संवादात मुख्यमंत्रिपदाबाबत ते म्हणाले की, "आधी अंतिम आकडेवारी येऊ द्या, त्यानंतर तिन्ही पक्षाचे लोक एकत्र बसतील. ज्या पद्धतीने आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या, त्याचप्रमाणे एकत्र बसून निर्णय घेऊ."
देवेंद्र फडणवीस
सर्वांत मोठं आणि चर्चेत सर्वांत आघाडीवरचं नाव आहे ते देवेंद्र फडणवीस यांचंच.
खरं तर 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन युतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
मात्र, आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आलं आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नुकतंच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अशाच स्वरुपाचं भाष्य केल्याने ही शक्यता अधिक अधोरेखित होताना दिसत आहे.
ते म्हणालेत की, "महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.”
मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे.
ते म्हणालेत की, "मुख्यमंत्रीपद कोणत्याही निकषावर अवलंबून नाही. तिन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेते एकत्र येतील आणि निर्णय घेतील त्याबद्दल कोणताही वाद नाही. निवडणुकानंतर तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेतील असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल."
अजित पवार
महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा आणि सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रिपदी राहिलेले नेता म्हणजे अजित पवार होय.
2022 साली एकनाथ शिंदेंनी यशस्वीपणे पक्ष फोडून सत्तेत भागीदारी घेतल्यानंतर, 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही तोच कित्ता गिरवला.
आपल्या काकांना म्हणजेच शरद पवारांना चॅलेंज करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार घेऊन सत्तेत जाणं पसंत केलं.
अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले खरे पण मुख्यमंत्री पदावर येण्याबाबतची त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये.

या नव्या सरकारमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होऊच शकणार नाहीत, अशी खात्री कुणीही देऊ शकत नाही. कारण, एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री होतील, असं कुणालाही वाटलेलं नव्हतं.
त्यामुळे, आता अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचं धक्कातंत्रही महायुतीकडून खेळलं जाऊ शकतं, ही शक्यता कुणाही नाकारु शकत नाही.
या झाल्या 'जर-तर'च्या गोष्टी. त्या जरी बाजूला सारल्या तरी अजित पवार मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेलं आघाडीचं नाव आहे, एवढं नक्की.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षांमध्ये अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वगळता त्यांच्या पक्षातील इतर नावे फारशी चर्चेत नाहीत.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात बोलताना अभय देशपांडे म्हणाले की, "अजित पवार बहुदा तहहयात उपमुख्यमंत्रिपदीच राहतील, असं दिसतंय. ते उपमुख्यमंत्रिपदीच कायम राहतील. मात्र, भाजपने मुख्यमंत्रिपद घेतलं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेतील, अशी शक्यता कमी दिसत आहे. जरी फडणवीस मुख्यमंत्रिपदी राहून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सरकारमध्ये आले असले तरीही त्यांच्याप्रमाणेच आता शिंदेही तसं करतील असं काही सांगता येत नाही. तशी वेळ आलीच तर ते दुसऱ्या कुणाला तरी उपमुख्यमंत्री करतील, पण स्वत: उपमुख्यमंत्री होतील, असं मला वाटत नाही. मात्र, किमान आणखी एक वर्षभर तरी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहू शकतात, असंच वाटतं."
ही आहेत चर्चेतील इतर नावे
सत्ता आली की अगदीच चर्चेत नसलेला आणि एखादा नवाच चेहरा मुख्यमंत्रिपदी आणायचा डाव भाजपने गेल्या काही निवडणुकांनंतर टाकला आहे.
छत्तीसगडमध्ये विष्णूदेव साई, राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा तर मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांना भाजपकडून मुख्यमंत्री करण्यात आलं.
महाराष्ट्रामध्ये हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- विनोद तावडे
भाजप पक्षामध्ये मात्र मुख्यमंत्रिपदाच्या नावांसाठी अनेकांची चर्चा होऊ शकते.
त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे विनोद तावडे होय. राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात 'पाठवले' गेलेले विनोद तावडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 2014 सालापासूनच आहेत.
ते या सरकारचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? खरं तर निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी विनोद तावडे गोरेगावमधील विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटण्याच्या आरोपांवरुन बहुजन विकास आघाडीकडून घेरले गेले.

हे प्रकरण बरंचसं गाजलं. त्याचा फटका स्वत: विनोद तावडे आणि भाजप पक्षाला बसेल, असंही म्हटलं गेलं.
या प्रकरणाच्या काही दिवस आधीच महायुती सत्तेत आली तर जुना एखादा चेहरा पुन्हा आणला जाऊ शकतो किंवा संपूर्णपणे नवा चेहराही दिला जाऊ शकतो, असं विधान विनोद तावडे यांनी केलं होतं.
त्यांच्या या विधानानंतर बरीच चर्चा झाली होती. स्वत: विनोद तावडे मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत, याचे कयासच या विधानातून बांधण्यात आले होते.
मात्र, आता विनोद तावडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतील का, हे येणारा काळच ठरवेल.
- पंकजा मुंडे
2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत होती.
एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. भाजपमध्ये परतण्याची त्यांची इच्छा असली तरीही ते मुख्यमंत्री होतील, ही शक्यता धुसर आहे.

पंकजा मुंडे यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकेल का? हा प्रश्न चर्चेत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे परळीमधून पराभूत झाल्या खऱ्या पण तरीही भाजपमधील एक प्रमुख आणि मुख्यमंत्रिपदासाठी अधिक चर्चेत असलेला महिला चेहरा म्हणून त्यांचंच नाव घ्यावं लागतं.
भाजपकडून नव्या चेहऱ्याचा प्रयोग महाराष्ट्रातही राबवला जाईल का, या प्रश्नाबाबत बोलताना अभय देशपांडे म्हणाले की, "छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. तिथे फक्त दोन पक्षांमध्येच लढाई होती. इथे फारच जटील परिस्थिती असल्यामुळे आघाडी सांभाळण्याची कुवत असणारा नवा चेहरा देणं भाजपसाठी आव्हानात्मक असेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्याची परिस्थिती हाताळणारा नेता भाजपला द्यावा लागेल. मात्र, तसं होण्याची शक्यता कमी दिसत आहे."
मुख्यमंत्रिपदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडते, हे पाहणं निर्णायक ठरेल, हे नक्की!