अजमेर शरीफ दर्गा : सूफीवाद, राजकारण आणि संत परंपरेच्या गूढवादाचा अद्भूत मिलाफ

 

अजमेर शरीफ दर्गा : सूफीवाद, राजकारण आणि संत परंपरेच्या गूढवादाचा अद्भूत मिलाफ

राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा (फाइल फोटो)

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा (फाइल फोटो)
  • Author,

"ज्यावेळेस भारतात सामाजिक न्याय नव्हता आणि अंधारयुग होतं. त्यावेळेस त्यातून मार्ग काढणारा कोणीही दिसत नव्हता. अशीवेळी गरीब आणि पीडित लोकांचं दु:ख समजून घेणारे काही संत झाले. हे संत त्या गरीब लोकांप्रमाणेच दारिद्र्यात राहायचे आणि कित्येक दिवस उपाशी राहून आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे."

- राहुल सांकृत्यायन (प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार)

राहुल सांकृत्यायन यांनी अकबर आणि त्यांच्या समकालीन परिस्थितीवर एक पुस्तक लिहिलं आहे. या प्रसिद्ध पुस्तकाचं नाव "अकबर" आहे. या पुस्तकात त्यांनी काही संतांना मुस्लिम साम्यवादी (कम्युनिस्ट) म्हटलं आहे. यात सर्वात आधी येणारं नाव म्हणजे सूफ संत आणि गूढवादी तत्वज्ञ, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती.

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा जन्म इराणमधील संजार (सिजिस्तान) मध्ये झाला होता. ते एकमात्र मुस्लिम संत आहेत, ज्यांची किर्ती आणि कार्य, धर्म-पंथ किंवा संप्रदायांची संकुचित मर्यादा ओलांडून भारतीय उपखंडाच्याही पलीकडे पोहोचली.

अजमेरमध्ये असलेला ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा भारतीय उपखंडात सर्वाधिक पूजनीय, आदरणीय आहे.

मात्र, सध्या हा दर्गा काही वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. हा एकमेव दर्गा असा आहे की जिथे मुस्लिम महिलांना मुक्तपणे प्रवेश मिळतो. शिवाय इथं बिगर मुस्लिम महिलांदेखील मोठ्या संख्येनं येतात आणि नवस करतात.

या दर्ग्याची महती इतकी आहे की, भारत, पाकिस्तान, बांगलादेशापासून दूरवरच्या अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीपर्यंतच्या राजकारण्यांना इथे येऊन चादर चढवणं आध्यात्मिकरित्या भाग पाडलं.

हा दर्गा म्हणजे सूफीवाद, राजकारण आणि संत परंपरेच्या गूढवादाचं अद्भूत ठिकाण आहे.

हे असं ठिकाण आहे ज्यानं धर्म, संप्रदाय, भौगोलिक अशा सर्वप्रकारच्या सीमा ओलांडून आपला सुगंध आणि करुणेचा प्रकाश सर्वत्र पसरवला.

'गरीब नवाज'चं आदरातिथ्य

दर्ग्याच्या इतिहासाचा कितीही शोध घेतला तरी हे ठिकाण ज्या संताच्या नावानं तयार झालं आहे, त्याबद्दल जाणून घेणं त्याहूनही रंजक आणि महत्त्वाचं आहे. "गरीब नवाज" या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या ख्वाजांचा जन्म 1142 साली झाला होता.

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती प्रसिद्ध गूढ संत ख्वाजा उस्मान हारूनी यांचे शिष्य होते. 1192 मध्ये ते आधी लाहोर मग दिल्ली आणि त्यानंतर अजमेरला पोहोचले.

याच्या आधी ते बगदाद आणि हेरात बरोबरच अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये गूढवादी तत्वज्ञांना भेटले होते.

ख्वाजा यांच अजमेरमधील आगमन तराइनच्या युद्धानंतर झालं होतं. तो असा काळ होता जेव्हा भारतात मुस्लिम राजवटीची सुरूवात होत होती. कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, आरामशाह, रुक्नुद्दीन फिरोज आणि रझिया सुलतान यांचा तो काळ होता.

ख्वाजा खूपच चमत्कारी आणि गूढवादी होते. असं म्हणतात की, त्यांची कीर्ती ऐकून एकदा इल्तुतमिश स्वत: त्यांना भेटायला आले होते.

असं म्हणतात की. रझिया सुलतान देखील इथे अनेकदा आल्या होत्या.


ख्वाजाचं वर्तन असं होतं की, जर एखाद्याला कर्म करता येत नसेल तर त्यानं अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा.

ते म्हणायचे की. माणूस कोणत्याही अन्यायाला शांतपणे खूपच चांगल्या रीतीनं प्रतिकार करू शकतो. हा असा संदेश होता ज्यासाठी त्याकाळची भारतातील जनता तहानलेली होती.

प्रसिद्ध समाज सुधारक आणि आर्यसमाजाचे अनुयायी हरविलास सारदा यांनी "अजमेर: हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह" हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी ख्वाजा यांच्या संन्यासी वृत्तीबद्दल लिहिलं आहे.

त्यांनी लिहिलं आहे की, ख्वाजा फाटके कपडे घालायचे. वर अंगरखा असायचा आणि खाली दोन तुकडे जोडून बनवलेली दुताई म्हणजे लुंगीसारखं वस्त्रं घालायचे.

या पुस्तकात हरविलास यांनी हा दर्गा म्हणजे अजमेरचं ऐतिहासिक यश असल्याचं दाखवलं आहे.

असंही म्हणतात की ख्वाजा कित्येक दिवस एकाच रोटीवर काढायचे. मात्र भूकेल्यांसाठी ते कायमच लंगर लावायचे. अनोळखी आणि भुकेल्या गरीब लोकांचं त्यांनी केलेल्या आतरातिथ्याचे अनेक किस्से खूपच प्रसिद्ध आहेत.

1236 साली ख्वाजा यांचं निधन झालं. तोपर्यंत देशभरात त्यांचं नाव खूपच प्रसिद्ध झालं होतं.

असं म्हणतात की, ते कित्येक दिवस समाधीवस्थेत जायचे. अशाच एका प्रसंगी त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला होता.

इतिहासकार राना सफवी लिहितात की, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या प्रवचनांमुळे राजे आणि शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झाले. अजमेरचं नाव ऐकताच ख्वाजा गरीब नवाज आणि त्यांचा दर्गा डोळ्यासमोर उभे राहतात. ख्वाजा समुद्राप्रमाणे उदार आणि पृथ्वीसारखं आदरातिथ्य करणारे होते.

कसा बनला दर्गा?

ख्वाजा यांचं निधन झाल्यानंतर त्याच जागी एक दर्गा बनवण्यात आला. त्याला 13 व्या शतकात दिल्ली सल्तनतचं संरक्षण मिळालं.

यानंतरचा काळ धामधुमीचा होता. त्यामुळे जवळपास दोनशे वर्षे या दर्ग्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही.

मात्र मांडूचे सुलतान महमूद खिलजी आणि त्यानंतर गियासुद्दीन यांनी पहिल्यांदा इथे पक्की समाधी बांधली आणि त्यावर एक सुंदर घुमट बांधला.

मोहम्मद बिन तुघलक बहुधा पहिले बादशाह होते ज्यांनी 1325 मध्ये साली दर्ग्याला भेट दिली होती.

मोहम्मद बिन तुघलक बहुधा पहिले बादशाह होते ज्यांनी 1325 मध्ये साली दर्ग्याला भेट दिली होती.

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,मोहम्मद बिन तुघलक बहुधा पहिले बादशाह होते ज्यांनी 1325 मध्ये साली दर्ग्याला भेट दिली होती.

तुघलक शासक जफर खान यांनी 1395 मध्ये दर्ग्याला भेट दिली होती. या भेटीच्या वेळेस जफर खान यांनी दर्ग्याशी संबंधित लोकांना बऱ्याच भेटवस्तू दिल्या होत्या.

1455 मध्ये अजमेर मांडूच्या खिलजीच्या अधिपत्याखाली आलं. त्यानंतर त्यांनी दर्ग्याला मोठ्या प्रमाणात संरक्षण दिलं. त्यांनी तिथे भव्य प्रवेशद्वार, बुलंद दरवाजा बांधला. तसंच दर्ग्याच्या परिसरात एक मशीद देखील बांधली.

त्यावेळेपर्यंत तिथे कोणतंही पक्क बांधकाम किंवा इमारत नव्हती.

इतिहासकारांनुसार, मूळ दर्गा लाकडाचा होता. नंतरच्या काळात त्याच्यावर एक दगडी छत्री बनवण्यात आली.

इतिहासकार राना सफवी यांच्या मते, "दर्ग्याच्या परिसरात बांधकामाचा पहिला भक्कम पुरावा दर्ग्याच्या घुमटात मिळतो. या घुमटाचं 1532 मध्ये सुशोभीकरण करण्यात आलं होतं. मकबऱ्याच्या उत्तरेकडच्या भिंतीवर सोनेरी अक्षरात कोरण्यात आलेल्या शिलालेखातून ते स्पष्ट होतं."

"आपल्याला दिसतो तो हा एक सुंदर घुमट आहे. इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा वापर करून घुमटाला कमळानं सजवण्यात आलं आहे. रामपूरचे नवाब हैदर अली खान यांनी भेट म्हणून दिलेला एक सोन्याचा मुकुट याच्यावर घालण्यात आला आहे."

फजुल्लाह जमाली (मृत्यू-1536) यांच्या नुसार, त्या काळी दर्गा सब्जावर, मिहना, जील, बगदाद आणि हमादान या शहरातील लोकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध होता.

जमाली यांनी शेख मोइनुद्दीन चिश्ती यांच्या अनेक 'कथां'चं संकलन केलं होतं. त्यांचं असंही म्हणणं आहे की. दर्ग्याला भेट द्यायला मोठ्या संख्येनं लोक यायचे. हिंदूंकडून मुजाविरांना भेटी देखील दिल्या जायच्या.

मुघल बादशाह अकबर यांची दर्ग्यावर होती मोठी श्रद्धा

मुघल बादशाह अकबर यांनी या दर्ग्याला पहिल्यांदा भेट दिली तोपर्यंत हे ठिकाण चिश्ती गूढवादी परंपरांबरोबरच एक लोकप्रिय तीर्थस्थळ म्हणूनही नावारुपाला आलं होतं.

राहुल सांकृत्यायन त्यांच्या "अकबर" या पुस्तकात लिहितात, "एके रात्री अकबर शिकार करण्यासाठी आग्र्याजवळच्या एका गावातून जात होते. काही गायक अजमेरी ख्वाजाचं गुणगान करत गात होतं. ते ऐकल्यावर त्यांच्या मनात ख्वाजाबद्दल भक्तीभाव निर्माण झाला. 1562 सालच्या जानेवारी महिन्याच्या मध्याच्या सुमारास काही मोजके लोक घेऊन बादशाह अकबर अजमेरला गेले."

या घटनेबद्दल अबुल फझल यांनी लिहिलं आहे की, "एका रात्री बादशाह शिकार करण्यासाठी फतहपूरला गेले असता, आग्रा ते फतहपूर रस्त्यावरील एका गावात काही लोक ख्वाजा मोइनुद्दीन यांच्या कीर्तीबद्दल आणि गुणांबद्दल सुंदर गीत गात होते. त्या गीतात ते असं म्हणत होते की ख्वाजा यांची कबर पवित्र होवो! जे हजरत अजमेर मध्ये राहतात. ज्यांच्या सिद्धी आणि चमत्कार प्रसिद्ध आहेत."

मुघल बादशाह अकबर यांचं, अजमेर मध्ये मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला दिलेल्या भेटीशी संबंधित चित्र

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,मुघल बादशाह अकबर यांचं, अजमेर मध्ये मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला दिलेल्या भेटीशी संबंधित चित्र

मुघल बादशाह अकबर यांची दर्ग्यावर प्रचंड श्रद्धा होती.

राहुल सांकृत्यायन यांनी त्यांच्या "अकबर" या पुस्तकाच्या पान क्रमांक 207 वर लिहिलं आहे की, "एप्रिल 1572 मध्ये अपत्यासाठी केलेल्या नवसासाठी बादशाह अकबर पायीच दर्ग्याच्या दर्शनासाठी निघाले. दररोज 14 मैल चालून ते 16 टप्प्यांमध्ये अजमेरला पोहोचले."

अर्थात काही संदर्भांनुसार बादशाह अकबर अपत्य प्राप्तीच्या नवसासाठी अनवाणी फतेहपूर सिक्रीला शेख सलीम चिश्तीच्या दर्ग्याला गेले होते.

बादशाह अकबर दरवर्षी आग्र्याहून अजमेरपर्यंत पायी तीर्थयात्रा करायचे. त्यांनी दर्ग्यात एक मशीद देखील बांधली. या मशिदीला अकबरी मशीद म्हणतात.

इतिहासकार अबुल फझल लिहितात, "1562 साली बादशाह अकबर यांनी पहिल्यांदा दर्ग्याला भेट दिली तेव्हा दर्ग्याला भेट देणारे ते पहिले मुघल बादशाह ठरले होते. दर्ग्याशी संबंधित लोकांना त्यांनी 'भेटवस्तू दिल्या होत्या आणि दान' केलं होतं."

1568 साली आपला नवस फेडण्यासाठी बादशाह अकबर दर्ग्याला पायीच आले होते.

बादशाह अकबर यांनी पाहिलं की. इथे हजारो गरीब आणि तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा या खर्चाची तजवीज करण्यासाठी त्यांनी अजमेर, चित्तौड आणि रणथंबोर मधील 18 गावं इनाम म्हणून दर्ग्याला दिली.

अकबरनं पाहिलं की इतक्या लोकांसाठी अन्न शिजवताना अडचणी येतात. म्हणून मग त्यांनी दर्ग्यासाठी पितळेची एक भली मोठी कढई दान म्हणून दिली. आज दर्ग्यात जी कढई आहे ती अकबरानं दिलेली कढईच असल्याचं सांगितलं जातं.

मात्र अजमेरचे रहिवासी हरविलास सारदा आपल्या पुस्तकात लिहितात की, "अकबर आणि जहांगीर यांनी दिलेल्या कढई लंगरमधील अन्न शिजवण्यायोग्य राहिल्या नाहीत. त्यामुळे मग मुल्ला मदारी या सिंधिया यांच्या एका मंत्र्यानं शेठ अखेचंद मेहता यांच्या देखरेखीखाली दोन अतिशय उत्तम कढई बनवून दिल्या. जेव्हा या कढईसुद्धा खराब झाल्या तेव्हा हैदराबादच्या निजामानं दोन अप्रतिम कढई भेट दिल्या. मात्र दर्ग्याचे सेवक सध्या तिथे असलेल्या कढई या अकबरानंच दिल्याचं सांगतात."

1614 मध्ये जहांगीर यांनी आणखी एक कढई भेट दिली होती. आज ज्या कढई आहेत, त्यात एकाच वेळी 72 हजार लोकांसाठी अन्न शिजवलं जाऊ शकतं.

बादशाह अकबर यांनी 1569 साली अजमेर मध्ये मशीद आणि खानकाह (जिथे सूफी विचारांचे लोक अध्यात्मिक चर्चेसाठी एकत्र येत) बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या. लाल बलुआ दगडाचं बांधकाम असलेली अकबरी मशीद त्यांच्याच आदेशानं बांधण्यात आली आहे.

बादशाह शहाजहान यांनी 1637 मध्ये एक सुंदर मशीद देखील बांधली होती. ही मशीद दर्ग्याच्या पश्चिमेला शाहजहानी दरवाजाजवळ आहे.

सांभर तलावातून दर्ग्याला 25 टक्के मीठ मिळायचं. यातून सात रुपये मिळायचे. एकूण पाच हजार सात रुपये दर्ग्याच्या लंगरसाठी दिले जात असत.

बैरम खान यांची राजवट संपल्यानंतर लगेचच म्हणजे 1560 ची एक सनद आहे. यामध्ये दर्ग्याच्या एका सेवकाला 20 बीघे जमीन बक्षीस म्हणून दिल्याचा उल्लेख आहे.

दर्ग्याशी मुघल बादशाहांचं घनिष्ठ नातं

बादशाह अकबर यांनी अजमेरला पहिल्यांदाच तीर्थयात्रा केल्याच्या पहिल्याच वर्षी, 1562 मध्ये दर्ग्याला संरक्षण देण्यात आलं होतं. मुघल साम्राज्य असेपर्यंत आणि त्यानंतर देखील ते मिळत राहिलं.

दर्ग्याच्या कारभारातील स्वारस्य प्रत्यक्षात भारतीय घटकांना आपल्या शासक वर्गात सामावून घेण्याच्या अकबराच्या धोरणापासूनच सुरू होतं.

काही इतिहासकारांना वाटतं की, मुघल हे पारंपारिकदृष्ट्या सूफीवादाच्या नक्शबंदी पंथाचे अनुयायी होते.

त्यांचे या पंथातील सूफींबरोबर वैवाहिक संबंध होते. हा वारसा तैमूरच्या काळापासून चालत आला होता. तैमूरनं ख्वाजा अता यांची कबर बांधली होती आणि त्यांच्या दर्ग्याचा सन्मान केला होता.

पेंटिंग

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,बादशाह अकबर यांनी आपल्या मुलांची नावं चिश्ती सूफी संतांच्या नावावरून ठेवली. शेख सलीमच्या नावावरून आपल्या मुलाचं नाव सलीम ठेवलं. नंतर सलीमनंच जहांगीर नावानं राज्यकारभार केला.

बादशाह अकबर फक्त ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यालाच नाही तर दिल्लीतील इतर चिश्ती सूफींच्या दर्ग्याला देखील भेट देत असत.

इतिहासकारांना असंही वाटतं की दर्ग्याचं महत्त्व फक्त अकबराच्या अध्यात्मिक बाबींपुरतंच नव्हतं तर यामुळे भारतात मुघल राजवटीचा स्वीकार होण्यासदेखील मदत झाली.

अकबरानं आपल्या मुलांची नावं चिश्ती सूफींच्या नावावरूनच ठेवली होती. शेख सलीमच्या नावावर सलीम आणि अजमेरच्या दर्ग्यातील सेवकांपैकी एक असलेल्या शेख दानियाल यांच्या नावावर दानियाल.

शहाजहान आणि इतर मुघल बादशाहांनी देखील दर्ग्याच्या बांधकामात योगदान दिलं. शहाजहान नं इथे संगमरवराची सुंदर मशीद बांधली. त्याला शहाजहान मशीद म्हणतात.

मुघल राज्यकर्त्यांचं दर्ग्याशी इतकं घनिष्ठ नातं होतं की दर्ग्यामध्ये त्या भिश्तीची देखील कबर आहे, ज्यानं बादशाह हुमायू यांना गंगेत बुडण्यापासून वाचवलं होतं.

याच्या बदल्यात हुमायू यांनी त्याला अर्ध्या दिवसाचा राज्यकारभार दिला होता. ज्यात भिश्तीनं चामड्याचे शिक्के चालवले होते.

सूफी राजकुमारी आणि शहाजहानची मुलगी जहाँआरा बेगमनं दर्ग्यामध्ये काही सुंदर कमानी बांधल्या होत्या.

जहाँआरा बेगम नं एक छोटासा चबुतरा देखील बांधला होता. त्याला बेगमी चबुतरा म्हणतात.

ब्रिटिश राजवटीच्या काळात देखील हा दर्गा अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र होता. मात्र त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत काही बदल झाले होते.

सर्व धर्माच्या लोकांचं श्रद्धास्थान झाला दर्गा

दर्गा सर्व धर्माच्या लोकांचं श्रद्धास्थान झालं. दर्ग्याच्या वार्षिक उर्स महोत्सवात लाखो भक्त येण्यास सुरूवात झाली. आजदेखील ते दर्ग्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्यं आहे.

आधुनिक काळात भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दर्गा आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आला आहे. आज देखील हा दर्गा धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

फक्त गरीब, निराधार किंवा धार्मिक विचारधारेच्या लोकांसाठीच हा दर्गा आश्रयस्थान किंवा दिलासा देणारा नसून राजकारणातील उच्चभ्रू आणि सर्वसामान्य जनतेमध्ये एक 'धागा' म्हणून देखील तो काम करतो आहे.

हे ठिकाण इतकं पूजनीय होतं की शत्रुत्व असतानाही स्थानिक शासक इथे येणाऱ्यांना अडवत नसत.

मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा सर्व धर्माच्या लोकाचं श्रद्धास्थान बनलं आहे

स्थापत्यकलेच्या दृष्टीनं असलेली वैशिष्ट्यं

बुलंद दरवाजा: मुख्य प्रवेशद्वार

महफिल खाना: इथे कव्वालीचं आयोजन होतं

शहाजहान मशीद: मुघल वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण

जन्नती दरवाजा: असं मानतात की याला पार केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात

आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

दर्गा सूफी प्रेम, सेवाभाव आणि एकता या मूल्यांचं प्रतीक आहे.

कव्वाली संगीत आणि सूफ साहित्याचं ते केंद्र आहे.

दर्गा सर्व धर्माच्या लोकांना आकर्षित करतो आणि सांप्रदायिक सद्भावनेचं प्रतीक आहे.

दर्ग्यात होणारे मुख्य कार्यक्रम

उर्स महोत्सव: हा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ची यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे. तो रजब या इस्लामी महिन्याच्या पहिल्या सहा तारखांना साजरा केला जातो.

मिलाद-उन-नबी: पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनी विशेष प्रार्थना आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या पुण्यतिथीचा उत्सव

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या पुण्यतिथीचा उत्सव उर्स म्हणून साजरा केला जातो

सूफीवादातील चिश्तिया पंथाच्या प्रथा आणि विचारधारा लक्षात घेता असं म्हटलं जाऊ शकतं की ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी हिंदूंसाठी पूर्वीपासूनच एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणाची निवड करून अध्यात्मिक क्षेत्रातील एक नवीन मैलाचा दगड स्थापन केला.



Post a Comment

Previous Post Next Post