EVM च्या वादावरुन सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी चर्चेत
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला असून EVM ची सत्यता तपासण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला होता.
ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली आहे. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर ( राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट) यांनी हे मतदान थांबवण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. येत्या काही दिवसांमध्ये आपण हा विषय निवडणूक आयोगासमोर मांडणार आहोत असं त्यांनी सांगितलं.
या निर्णयानंतर मारकडवाडीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याशिवाय गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.
आज 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतपत्रिकेनी मतदान घेण्याचे ग्रामस्थांनी निश्चित केले होते. त्यानुसार मतदान केंद्र, मतपत्रिका आदी तयारी ग्रामस्थांनी केली होती.
मात्र गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, गावातील प्रमुख नागरिकांना नोटीस आणि त्याशिवाय जमावबंदी आदेश लागू केल्याने, गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर EVM मशीन बाबत अनेक ठिकाणी शंका उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले.
EVM बाबत पराभूत उमेदवार अधिक आक्षेप घेत असताना माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी व त्यांच्या मतदारांनी EVM बाबत आक्षेप घेतला आहे.
आमदार जानकर हे एक लाख मताधिक्याने निवडून येणे अपेक्षित होते, असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता. मात्र ते फक्त 13 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

या गावात गेल्या तीन निवडणुकात उत्तम जानकर यांना लीड मिळाले होते पण या निवडणुकीत तसे न झाल्यामुळे हे मतदान घ्यावे असे गावकऱ्यांचे म्हणणे होते.
या निवडणुकीत जानकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विजय सिंह मोहिते पाटील हे जानकर यांच्या सोबत होते. त्यामुळे मारकडवाडी गावातून जानकर यांना 80 टक्के मतदान होणे अपेक्षित होते.
मात्र या गावात जानकर हे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या पेक्षा दीडशे मतांनी मागे होते. त्यामुळे मतपत्रिकेतून मतदान घेऊन हे तपासण्यात यावे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला.

जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे EVM मधील दोष कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
झालेल्या निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना शंका होती.मतदानाची शहानिशा करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चाने गावात मतपत्रिकेतून मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिलं होतं.
प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.