सन २०१९ पूर्वी उत्पादित जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक
• लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे सुविधा उपलब्ध
• फिटमेंट सेंटरची यादी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
लातूर, दि. 05 (जिमाका) : जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनांवर सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांवर ३१ मार्च २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील वाहनधारकांनी नजीकच्या अधिकृत फिटमेंट सेंटर येथून हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
या सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटरची यादी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या लिंकवर उपलब्ध आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी व ट्रॅक्टर संवर्गातील वाहनांना ४५० रुपये, तीनचाकी वाहनांना ५०० रुपये आणि खासगी व व्यावसायिक चारचाकी वाहंना ७४५ रुपये इतके शुल्क आकारले जाईल. हे शुल्क जीएसटी वगळून आहे. ३१ मार्च २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवून तिसऱ्या नोंदणीचे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट उत्पादक हे वाहन मालकाला निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नंबर प्लेट बसविण्याची सुविधा देवू शकतात. ही सुविधा वाहन मालकाच्या इच्छेनुसार ऐच्छिक राहणार आहे. तसेच कोणत्याही फिटमेंट सेंटरवर वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.