भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची प्रसारमाध्यमांना माहिती देणाऱ्या महिला अधिकारी कोण आहेत?
मंगळवारी रात्री (6-7 मे) पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी "दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून हल्ला केल्याचं भारताने सांगितलं आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्यानं वाढतोय. 22 एप्रिलला काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला.
त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याला उत्तर म्हणून कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं होतं.
भारतीय सैन्यानं या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव दिलं होतं. बुधवारी (7 मे) या हल्ल्याबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी सैन्याच्या दोन महिला अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.
या महिला अधिकाऱ्यांविषयी जाणून घेऊयात.
कर्नल सोफिया कुरेशी
कर्नल सोफिया कुरेशी भारतीय सैन्यातील एक अधिकारी आहेत.
2016 मध्ये पुण्यात बहुराष्ट्रीय फिल्ड प्रशिक्षण सराव झाला होता. FTXच्या 'फोर्स 18' मध्ये आसियान प्लस देश सहभागी झाले होते. भारतीय भूमीवर आयोजित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्राऊंड फोर्सेस सराव होता. यामध्ये भारतीय सैन्यातील 40 सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व सिग्नल कोअरच्या महिला अधिकारी, लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी केलं होतं.

त्यावेळेस इतक्या मोठ्या बहुराष्ट्रीय सरावात भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.
भारतीय संरक्षण मंत्रालयानं देखील सोशल मीडियावरील पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती आणि सोफिया कुरैशी यांचे फोटो प्रसिद्ध केले होते.
सोफिया कुरेशी मूळच्या गुजरातच्या आहेत. त्यांनी बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांच्या कुटुंबाला सैन्याची पार्श्वभूमी आहे.

त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते. त्यांचं लग्न मॅकेनाईझ्ड इन्फंट्रीमधील एका अधिकाऱ्याशी झालं आहे.
1999 मध्ये सोफिया कुरैशी वयाच्या 17 व्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भारतीय सैन्यात आल्या होत्या.
सहा वर्षे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेमध्ये देखील काम केलं आहे. यात 2006 मध्ये काँगोमधील एका उल्लेखनीय कार्यकाळाचाही समावेश आहे.
त्यावेळेस शांती मोहिमेमध्ये प्रशिक्षणासंबंधित योगदान देण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती.
व्योमिका सिंह
भारतीय वायू सेनेतील विंग कमांडर व्योमिका सिंह या 'ऑपरेशन सिंदूर'ची प्रसारमाध्यमांना माहिती देणाऱ्या दुसऱ्या अधिकारी होत्या.
व्योमिका सिंह भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांच्याविषयी उपलब्ध माहितीनुसार त्यांना नेहमीच पायलट होण्याची इच्छा होती.
त्यांच्या नावाचं अर्थ 'आकाशाशी जोडणारा' असा होतो आणि या नावानं त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा दिली.
व्योमिका सिंह, नॅशनल कॅडेट कोअर म्हणजे NCCमध्ये होत्या.
त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतलीय. 2019 मध्ये त्यांना भारतीय वायुदलात फ्लाईंग ब्रँचमध्ये पायलट म्हणून पर्मनंट कमिशन मिळालं होतं.

व्योमिका सिंह यांनी एकूण 2500 तासांहून अधिक उड्डाण केलं आहे.
त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील कठीण परिस्थितीत चेतक आणि चीता सारखी हेलिकॉप्टर हाताळली आहेत.
अनेक बचाव मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यात नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या एका ऑपरेशनचादेखील समावेश आहे.