व्हीएस पँथर्सच्या वतीने रविवारी लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा : विनोद खटके



 व्हीएस पँथर्सच्या वतीने रविवारी लातुरात 

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा : विनोद खटके 
लातूर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही रविवार, दि. १८ मे २०२५ रोजी लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या भव्य मैदानावर व्हीएस पँथर्स युवा संघटनच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्हीएस पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी बुधवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 
             विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा अतिशय थाटामाटात साजरा होणार आहे. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात २ मुस्लिम, ११ हिंदू आणि २७ बौद्ध धर्मीय वधू  - वरांचे  विवाह होणार आहेत. प्रत्येक धर्मीय वधू - वरांचा  विवाह त्यांच्या धर्माच्या रुढी  परंपरेप्रमाणे लावून देण्यात येणार असल्याचे सांगून विनोद खटके पुढे म्हणाले की, या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एड. बाळासाहेब  आंबेडकर, भीमराव आंबेडकर,लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. हा विवाह सोहळा रविवारी, दि. १८ मे  रोजी सायंकाळी साडेसात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या भव्य प्रांगणावर होणार आहे. सध्याच्या अवकाळी पावसाचे वातावरण पाहता विवाह सोहळ्यासाठी वॉटर प्रूफ मंडप उभारला जाणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी  अंदाजे १५ ते १७ हजार वऱ्हाडी  मंडळींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वधू - वरांना कपडे, मणी मंगळसूत्र यांसह  सर्व संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. 
                         यावर्षीच्या या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात एकूण ४० जोडप्यांचा विवाह होणार असून यापैकी चार जोडपे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे या उपक्रमात काहीसा खंड पडेल होता.  दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या  सामूहिक विवाह सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. या विवाह सोहळ्यासाठी एका जोडप्याकरीता किमान पन्नास ते साठ हजारांचा खर्च अपेक्षित असल्याचे विनोद खटके यांनी सांगितले. विवाह सामूहिक सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांचे सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्हीएस पँथर्सचे जिल्हाध्यक्ष शरद किणीकर, मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे, शहराध्यक्ष असदभाई शेख, संपर्क प्रमुख आनंद जाधव, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ , विद्यार्थी आघाडीचे स्वप्नील कांबळे, मार्गदर्शक मन्सूर पठाण, रवी कुरील, संतोष मांदळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

Post a Comment

Previous Post Next Post