एकत्र कुटुंब पद्धती : संस्कारमय पाठशाळा
एकत्र कुटुंब पद्धती : संस्कारमय पाठशाळा
भारत देश हा खेड्याखेड्यात विखुरलेला आहे.खेड्यातील सर्वधिक लोक शेती हा व्यवसाय करीत होते व आहेत.शेतात अन्नधान्यासहित कडधान्याचे देखील उत्पादन घेतल्या जात होते.संपूर्ण खेडे एक समजून परस्पर सुसंवादाने मदतीचा हात पुढे सरसावला जात असे.पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याने सहकार्याची भावना एकमेकांच्या मनात होती.एकाच कुटुंबात मागील कित्येक पिढ्यापासून एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती.कोणताही भेद,हेवेदावे न करता गुण्यागोविंदाने नांदत होते.भावकी हिस्सा वा स्वार्थभावना त्या जुन्या काळातील लोकांमध्ये कमी प्रमाणात जाणवत होती.जुन्या जाणत्या वयस्कर व्यक्तींचा आदर केला जात होता.कुटुंब प्रमुख या नात्याने सर्वांच्या अडचणी,समस्या समजून घेऊन सोडवित असायचे.आजी-आजोबा,आई-वडील,काका- काकू व त्यांची मुले एकाच घरात,कमी जागेत समाधानाने,आनंदाने,सुखाने राहत होती.'एक संयुक्त कुटुंब,एक चूल' या पद्धतीने परस्परपूरक भूमिका घेऊन गोडीगुलाबीने राहणारी कुटुंब पद्धती आज खूप कमी प्रमाणात दिसून येत आहे.खरे तर,पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेली एकत्र कुटुंब पद्धती ही एक संस्कारमय पाठशाळाच होती असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
खेड्यामध्ये अजूनही वृद्ध व्यक्तींचा आदर,सन्मान केला जातो.त्यांची काळजी घेतल्या जाते.वयस्कर आजी-आजोबा यांचे आपल्या नातवावर पुर्णपणे लक्ष ठेऊनच असायचे.शेतीत राबून म्हातारपणाची चाहुल लागताच शेतीची धुरा मुलांकडे स्वेच्छेने सोपवून नातवावर बोधकथेतून संस्काररूपी पेरणी करायचे.आई-वडिलांवर शेतीची कामे सोपविल्यामुळे मुलांकडे पाहिजे त्या प्रमाणात वेळ देता येणे शक्य नसायचे म्हणून नातवांकडे लक्ष देऊन दक्ष राहण्यासाठी आजी-आजोबा तत्पर असायचे.सकाळी उठल्यापासून तर सायंकाळपर्यंत नातवाची काळजी घेण्याची जबाबदारी आजी-आजोबांची असायची.नातवाला देखील आजी-आजोबांचा लळा, जिव्हाळा लागून असायचा.नातेवाईकाकडे जायचे असल्यास नातवाला घेऊन जात होते.आजी-आजोबांच्या सानिध्यात घालविलेले क्षण वा बालपण विसरणे शक्य नाही.आजच्या आधुनिक युगात मात्र आजी-आजोबांची रवानगी वृद्धाश्रमात केल्या जात आहे.हयातभर काबाडकष्ट करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या कुटुंब प्रमुखाला बाजूला सारणे ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील बालकांवर छोट्या-छोट्या काल्पनिक वा वास्तविक कथेतून बोध देणारी आजी-आजोबांची शाळा असायची.कुटुंबात आजी-आजोबांना आपल्या नातवांचा लाड पुरवीत वा वेळप्रसंगी कठोर होत विचारांना दिशा देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत होते तद्वतच खाण्याची,पिण्याची वा आरोग्याची काळजी घेत असत.एकाच कुटुंबापूरते मर्यादित राहायचे नाही तर शेजारची लहान मुलांना देखील विनामूल्य सांभाळण्याचे सौजन्य दाखवीत होते त्यामुळे सर्वसमावेशक,परस्परपूरक,सहकार् यवृत्ती जोपासणारी पिढी आज दुरापास्त होत असल्याचे विचित्र चित्र दिसते आहे.
आज परिस्थिती या उलट दिसून येते आहे.एकत्र कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली आहे.प्रत्येकाला मोकळीक मिळण्याच्या हिशोबाने "हम दो...हमारे दो" अशी मनोभूमिकेने विभक्त होत आहेत त्यामुळे लहान मुलांचा मनोविकास होतांना दिसत नाही.धकाधकीच्या,संघर्षाच्या काळात मुलांना वेळ देणे शक्य नाही म्हणून मुले एकाकी पडत आहेत.त्यांच्या वागण्यात चिडचिडेपणा येत आहे.मुलांची निरीक्षणक्षमता ही अफाट आहे.तंत्रज्ञान खूप वेगाने पुढे सरकत आहे तेवढ्याच गतीने मुले देखील जात आहेत.मोबाईल वरील कार्टून,गेम यामध्ये व्यस्त होऊन स्वतःची शारीरिक व मानसिक वाढ खुंटत जात आहे याकडे पालक या नात्याने लक्ष देण्यास टाळाटाळ होत आहे.फेसबुक,वॉट्सअप्प या सोशल साईट्समुळे मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत होत आहे.मैदानी खेळाचा विसर पडल्याने व आजी-आजोबापासून दूर असल्याने बालकांच्या भावविश्वाशी जुळवून घ्यायला आई-वडील समोर येत नाही.वृद्ध मंडळी व बालपण यांचे सौहार्दाचे संबंध पूर्वी जुळून येत होते पण सध्या समाजात डोकावून बघितल्यास ८० टक्के कुटुंब ही विभक्त पद्धतीने तर फक्त २० टक्के कुटुंब हे एकत्र कुटुंब पद्धतीत आचरण करीत असल्याचे दिसून येते त्यामुळे आजी-आजोबांमुळे मुलांवर होणारी संसाराची पेरणी म्हणजे एक प्रकारची पाठशाळाच होती.ती आता दिसेनाशी होत आहे.
आजी-आजोबांकडे जड कामे कोणतीही नसल्याने कुटूंबात असणाऱ्या लहान बालकांना खेळविणे हाच त्यांचा नित्याचा क्रम..वयाच्या सहा वर्षापर्यंत चालायला,बोलायला शिकविण्याचे उत्तम कार्य पालक या नात्याने करीत असायचे.सकाळी उठल्यानंतर ब्रश,नास्ता,अंघोळी पासून तर दुपारचे जेवण देण्याची सोय तसेच जीवन मूल्याची देण म्हणजे उत्कृष्ठ अशी पाठशाळाच म्हणायला हवी.समजा,जेवण करतांना केलेला हट्ट,समजविण्यासाठी केलेला लडीवाळपणा ह्या गोष्टी आजी-आजोबा करीत असे पण आता त्या बाबी दिसत नाही.सायंकाळी झोपतांना मूर्त-अमूर्त कल्पनेतून सांगणाऱ्या कथा मुलांना हव्या-हव्याशा वाटत असे.निर्जीव वस्तू लहान बालकांना देऊन त्यांचे मानसिक सबलीकरण,ताकद,संस्कार वाढविल्या जात होते व लहान मुलांचे/नातवांचे पालनपोषण करण्यात कोणतीही कसूर आजीआजोबा ठेवत नसे.लहान मुलांच्या जाणिवा,भावभावना,अभिव्यक्तीशी जुळवून घेण्याची क्षमता आजी-आजोबांकडे ठासून भरलेली होती कारण कधी काळी ते देखील लहान असतांना त्यांच्याही आजोबांनी केलेल्या संस्काराची परतफेड या नात्याने परंपरा जपल्या जात होती कारण बालक हा अनुकरणप्रिय असतो सध्याची आकर्षण केंद्रे बदललेली आहेत आणि संयुक्त कुटुंब पद्धती पासून दूर जाऊन आपल्याच मुलांची व आपली सीमा मर्यादित करीत असल्याचे दिसून येत आहे.संयुक्त कुटुंब पद्धतीची चालती-बोलती पाठशाळा काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

No comments